Tuesday, November 11, 2025

विधानसभा संपर्क प्रमुख पंकज पाटीलांचा पक्षत्याग

 


* पंकज पाटील व बंधू पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार

कर्जत / प्रतिनिधी :- शिवसेना शिंदे गटाला आज आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघातील शिवसेना संपर्क प्रमुख पंकज पुंडलिक पाटील यांनी मंगळवार, 11 नोव्हेंबर 2025 रोजी आपला विधानसभा संपर्क प्रमुख पदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा जाहीर केला आहे.

राजीनाम्याची माहिती देताना पाटील यांनी म्हटले की, सन्माननीय आमदार महेंद्र थोरवे साहेब आणि जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर यांनी आजवर दिलेल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार. मात्र, सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे आणि संघटनेतील दुर्लक्षामुळे मी हा निर्णय घेत आहे.

* शिवसेना शिंदे गटात खळबळ :- पाटील हे आमदार महेंद्र थोरवे यांचे विश्वासू व निष्ठावंत सहकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांनी दिलेला राजीनामा शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या घटनेमुळे स्थानिक पातळीवर अंतर्गत असंतोषाला अधिक उधाण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून “आयाराम-गयाराम” उमेदवारांना प्राधान्य दिल्याने अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. या नाराजीच्या पार्श्वभूमीवरच पंकज पाटील यांनी पक्षत्यागाचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

* राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी :- विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, 12 नोव्हेंबर 2025 रोजी पंकज पुंडलिक पाटील व बंधू पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये अधिकृतरीत्या प्रवेश करणार आहेत. या संदर्भात प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि तालुकाध्यक्ष दिपक श्रीखंडे यांच्या उपस्थितीत चर्चा झाली आहे. औपचारिक प्रवेश कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात पार पडणार असून यावेळी अनेक स्थानिक कार्यकर्तेही त्यांच्यासोबत पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

* राजकीय समीकरणात बदलाची चिन्हे :- कर्जत - खालापूर तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचे काही माजी पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. पंकज पाटील यांचा पक्षत्याग हा केवळ वैयक्तिक निर्णय नसून शिवसेनेतील अंतर्गत नाराजीचे प्रतीक असल्याचे स्थानिक राजकीय विश्लेषकांचे मत आहे. या घडामोडींमुळे कर्जत विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पंकज पाटील यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेना शिंदे गटात नाराजीचे वारे अधिक वेगाने वाहू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशामुळे कर्जतच्या राजकारणात नवे समीकरण आणि नवी राजकीय गती निर्माण होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.



0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home