Wednesday, May 28, 2025

केएमसी एनसीसी कॅडेट राज्यस्तरीय कॅम्पमध्ये अव्वल

 


कॅप्टन शितल गायकवाड यांच्या मार्गदर्शन, कौशल्य आणि मेहनतीची प्रशंसा 


खोपोली/मानसी कांबळे :- 5 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन मुंबई ग्रुप A यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कॅम्प व त्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये खोपोली येथील केएमसी (KMC) कॉलेजच्या एनसीसी कॅडेट यांनी कॅप्टन शितल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग घेत एक मोठे यश मिळवले आहे. या यशाने कॅडेटच्या शिस्तबद्धता, नेतृत्व आणि देशभक्तीच्या भावनांवर प्रकाश पडला आहे. एनसीसी कॅडेटच्या या राज्यस्तरीय कॅम्पमध्ये केएमसी एनसीसी कॅडेटने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. 


दरम्यान, एनसीसी कॅडेटचा राज्यस्तरीय कॅम्पमध्ये प्रथम क्रमांक मिळविणे हे केवळ एक यश नाही, तर ते विद्यार्थ्यांच्या विकासासाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे, जे त्यांच्यात शिस्त, नेतृत्व आणि देशभक्तीच्या भावना वाढवते जो एनसीसी (NCC) च्या मुख्य मूल्यांपैकी एक आहे. एनसीसी आत्मविश्वास, शिस्त, जबाबदारी आणि स्वावलंबन यासारखे गुण जोपासते, जे कॅडेटच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, अशी प्रतिक्रिया कॅप्टन शितल गायकवाड यांनी व्यक्त केली. 


या सर्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून केएमसी (KMC) कॉलेजचे नाव उज्वल केले आहे. 2025 - 26 मध्ये ठाकूर कॉलेज (THAKUR COLLEGE) येथे नुकत्याच झालेल्या सीएटीसी (CATC) व टीएससी (TSC) या राज्यस्तरीय कॅम्पमध्ये कॅप्टन शितल गायकवाड या स्वतः विद्यार्थ्यांना घेऊन गेल्या व स्पर्धेमध्ये सीजीटी (SGT) कृष्णाई महाडिक हिने सोलो नृत्यमध्ये प्रथम पारितोषिक मिळवले. कॅप्टन शितल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कराटे डेमोस्टेशन सुद्धा सादर करण्यात आले.


यामध्ये सीजीटी (SGT) कृष्णाई महाडिक, सीपीएल (CPL) आदिनी गंभीर, सिडीटी (CDT) शिंदे, श्रेया गुरव या कराटे स्टुडंट्सने सहभाग घेतला. क्रिडा स्पर्धांमध्ये सीडीटी (CDT) अस्मिता रिंगे, सीडीटी (CDT) रेश्मा गोरे, सीडीटी (CDT) पुजा जाधव, सीडीटी (CDT) वनिता चांगले, सीडीटी (CDT) आर्या धुमाळ, सीडीटी (CDT) श्रेया गुरव, सीडीटी (CDT) प्रतीक्षा शिंदे, सीडीटी (CDT) सिमा राम या सर्व कॅडेटसने पहिला क्रमांक प्राप्त केला. ग्रुप डान्स (group dance) मध्ये सुद्धा प्रथम पारितोषिक मिळविले. यात सीजीटी कृष्णाई महाडिक, सीपीएल आदिनी गंभीर, एलसीपीएल (LCPL) संजना जोशी, एलसीपीएल (LCPL) मयूरी जाधव, सीडीटी (CDT) श्रद्धा बागल, सीडीटी (CDT) रेश्मा गोरे, सीडीटी (CDT) आसिया मनियार, सीडीटी (CDT) सलोनी चव्हाण, सीडीटी (CDT) पायल मंडल, सीडीटी (CDT) शिंदे, सीडीटी (CDT) ऐश्वर्या वालगुंडे, सीडीटी (CDT) सिद्धिका कोंडे, सीडीटी (CDT) शालिनी पवार यांचा समावेश होता. या सर्व एनसीसी कॅडेटचे केटीएसपी (KTSP) मंडल अध्यक्ष संतोष जंगम, सेक्रेटरी किशोर पाटील, केएमसी (KMC) कॉलेजचे अध्यक्ष दिलीप पोरवाल, केटीएसपी मंडल सदस्य व केएमसी कॉलेजचे प्राचार्य दयानंद गायकवाड आदींनी गुलाब पुष्प देवून सत्कार केले व कौतुकाची थाप दिली.

Monday, May 26, 2025

खोपोली शहरात खोपोली खालापूर तालूका संघर्ष समिती राबविणार नवीन संघर्ष पॅटर्न...

 


* शहराप्रती असणाऱ्या मागण्याचा गांभीर्याने विचार करून सुधारणा न केल्यास समस्याची काढणार प्रतिकात्मक अंत्ययात्रा व नागरिकांचा मोर्चा..

* सुविधा देत नसल्यास कर घेऊ नका यासाठी खोपोली शहरातील समस्यांबाबत संघर्ष समिती आक्रमक....

 *समस्या न सोडविल्यास जबाबदार अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी...


खोपोली/मानसी कांबळे :- खोपोली शहरात समस्यांचे पेव फुटलेले आहे.नागरी समस्या सोडविण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरत आहे.खोपोली खालापूर संघर्ष समितीच्या माध्यमातून नेहमीच प्रशासनाकडे विनम्र पाठपुरावा करीत असतो. परंतु बऱ्याच वेळा आश्वासन देऊन नंतर पाठ फिरविली जाते असा अनुभव वाढत आहे.तत्परतेने काम केल्यास खोपोली नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मानही समितीकडून राखला जातो.


गेल्या काही महिन्यात शहराची अवस्था दयनीय झालेली आहे. पाण्याची समस्या,रस्त्याच्या समस्या,गटाराच्या समस्या,आरोग्याच्या समस्या,वाढत्या अनधिकृत टपऱ्या समस्या,वाहतूक समस्या,घंटा गाडी समस्या,नदी प्रदूषण समस्या,पार्किंग समस्या,गार्डनची समस्या,मुलांसाठी स्विमिंग पूल,क्रिडांगण समस्या,भाड्याने दिलेल्या मिळकत वरील आकरण्यात येणाऱ्या कराची समस्या,शहरातील वृक्षतोड समस्या,नाट्यगृह यासारख्या समस्या सोडविण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे.वेळेत कर न भरल्यास दंडात्मक कारवाई करणारे प्रशासन सुविधा देण्यात कमी पडत आहे.नागरिक कर भरतात तर त्यांना सुविधा मिळणे हा हक्क आहे.नगरपरिषदेने नागरिकांची सनद म्हणून तक्रार आल्यानंतर कार्यवाही करताना निश्चित कालावधीत पूर्ण करीत नसल्याने त्या काळात ते काम न झाल्यास कर्तव्यपूर्ती न केल्याबद्दल त्या अस्थापनेस दंड म्हणून नागरिकांना आर्थिक सुट देण्यात यावी अशीही मागणी खोपोली खालापूर तालुका संघर्ष समितीच्या वतीने दिनांक 26 मे 2025 रोजी करण्यात आली.


दिनांक 27 मे 2025 रोजी संघर्ष समितीच्या वतीने काढण्यात येणाऱ्या प्रतिकात्मक अंत्ययात्रा व मोर्चा संदर्भात दिलेल्या पत्रावर खोपोली नगरपरिषदेने बोलविलेल्या 26 मे 2025 रोजीच्या विशेष चर्चा सत्रासाठी आयोजित केलेल्या मिटिंगमध्ये शहरातील सर्वच मुद्द्यावर सखोल चर्चा करण्यात आली.खोपोली नगरपालिकेने या समस्यांसंदर्भात लेखी भूमिका स्पष्ट करण्याचे मान्य केले असुन योग्य ती कारवाई न केल्यास पुन्हा मोर्चाचे आयोजन करण्यात येईल असे खोपोली खालापूर तालुका संघर्ष समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.यावेळी यावेळी खोपोली नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी रणजीत पवार,प्रभारी सभाध्यक्ष विश्वास पाटील,नगर अभियंता अनिल वाणी,सहाय्यक नगर रचनाकार साहिल गाढवे,रचना सहाय्यक प्रणयठाकूर,उपअभियंता( पाणीपुरवठा ) अविनाश भोईर,कनिष्ठ अभियंता सतीश हाडप तर खोपोली खालापूर तालुका संघर्ष समितीच्या वतीने ऍड रामदास पाटील,सुभाष पोरवाल,देवेंद्र जाखोटिया,मयूर जाखोटिया,राजेंद्र फक्के,नारायण खेडकर,प्रशांत साठे,नरेंद्र हर्डीकर,अजित ओसवाल,आशपाक लोगडे, डॉ. शेखर जांभळे,उत्तम पुनमिया,सचिन गुरसळ,मनोज खंडागळे, मोहन केदार,हितेन पाटील,दिवेश राठोड उपस्थित होते.


यावेळी घंटा गाड्यावर GPRS लावणे, घंटा गाड्या वेळेवर येत नसल्याने अस्वछता,पिण्याचे पाणी वेळेवर सोडणे,गटार वेळेत साफ न केल्याने होणारे अस्वछता,शहरात सर्व ठिकाणी लावलेले कचरा संकलन स्टिकर समस्या,दवाखान्यातील समस्या, शहरातील वाढत्या टपऱ्या, एकेरी वाहतुकीचे व्यवस्थित नियोजन, नदी प्रदूषित करणाऱ्यावर कारवाई,शहरातील पार्किंग व्यवस्था, गार्डन योग्य प्रकारे नसल्याने होणारे नागरिकांचे हाल, स्विमिंग पुलची उपलब्धता, शहरातील वाढलेले वृक्ष व वृक्षतोड,नाट्यगृहाच्या दुरावस्थेस जबाबदार असणाऱ्यावर कारवाई, क्रिडांगणाची आबाळ, रस्त्यावर पडलेले खड्डे, सर्वांना समान घरपट्टी आकारणी, दोन वेळच्या पाण्याचे नियोजन, शहरातील पाईप लाईनचे ले आऊट यासारख्या बाबींवर प्रश्नांची व भविष्यातील नियोजनाची सरबत्ती करण्यात आली.या सर्व प्रश्नांवर लेखी उत्तर देऊन भविष्यात शहर नियोजनात सतर्कतेने लक्ष दिले जाईल असे प्रशासनाने सांगितले आहे.


आज झालेल्या चर्चेत संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने प्रशासन सुविधा देत नसल्यास कर घेऊ नका यासाठी खोपोली शहरातील समस्यांबाबत संघर्ष समिती आक्रमक असुन वेळेत समस्या न सोडविल्यास जबाबदार अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी करणार असुन खोपोली शहरात खोपोली खालापूर तालूका संघर्ष समिती राबविणार नवीन संघर्ष पॅटर्न राबविणार असुन जनहीत याचिका दाखल करणार असुन शहराप्रति असणाऱ्या मागण्याचा गांभीर्याने विचार करून सुधारणा न केल्यास समस्याची काढणार प्रतिकात्मक अंत्ययात्रा व नागरिकांचा मोर्चा काढणार असल्याचे खोपोली खालापूर तालुका संघर्ष समितीने स्पष्ट केले आहे.

Sunday, May 25, 2025

खोपोलीत पार पडली पाताळगंगा आरती

 


 सहज सेवा फाउंडेशनचा उपक्रम 

महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी आरती


खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली शहराची औद्योगिक तसेच नागरी जीवनाची तहान पाताळगंगा नदीमुळे भागत आहे. आपल्या शहरात लाभलेल्या या वरदानाचे महत्त्व जनमानसात पोहोचविण्यासाठी नवीन संकल्प म्हणून खोपोली येथील गगनगिरी आश्रमासमोरील नदी भोवतालच्या पटांगणात नदीच्या स्वच्छतेबाबत जागरुकता निर्माण होण्यासाठी सहज सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून नदी आरती व पूजन महोत्सव उत्साहात पार पडले. या वेळी नदीचे संवर्धन व स्वच्छता ठेवण्याचा संकल्प करण्यात आला.


खोपोली येथील उगम पावणाऱ्या पाताळगंगा नदीपात्रात अनेक ठिकाणी कचरा टाकण्यात येतो. बऱ्याच ठिकाणी सांडपाणी नदीत सोडले जाते. कंपनीच्या दूषित पाण्यामुळे बारमाही वाहणारी पाताळगंगा नदी प्रदूषित होत चालली आहे. प्रशासनाने जागरूक राहून नदी प्रदूषित होण्यापासून कठोर पावले उचलावीत. वाया जाणाऱ्या पाण्याचे जतन करावे. नदीवर शहराच्या सौंदर्यात भर घालणारे सुशोभिकरण करावे, अशी मागणी सहज सेवा फाऊंडेशनतर्फे करण्यात येत आहे. तसेच जनसामान्यात जागरुकता येण्यासाठी 'आपली नदी, आपली जबाबदारी' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, 24 मे रोजी पाताळगंगा नदी आरती व पूजन महोत्सव उत्साहात पार पडला. त्याचबरोबर नदी घाटावर दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी पूजन करण्यात येईल, असाही संकल्प यावेळी करण्यात आला.


यावेळी नदीकिनारी दिव्यांची आरास करण्यात आली. खोपोली येथील मुक्ताई महिला भजनी मंडळाने सुरेख गीते गाऊन वातावरण भक्तिमय केले तर आनंद शाळेतील शिक्षिका राधिका खानवलकर व हभप सुधाकर पाटील यांनी पातळगंगा नदी प्रती तयार केलेल्या आरतीबद्दल सहज सेवा फाउंडेशनतर्फे सन्मान करण्यात आला. यावेळी उपक्रम प्रमुख सीमा त्रिपाठी, राजेंद्र फक्के, डॉं. सुनील पाटील, सहज सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉं. शेखर जांभळे, खालापूर तालुका प्रमुख मोहन केदार यांनी आपले विचार व्यक्त केले. या उपक्रमास विरेश्वर ग्रामस्थ मंडळ, शक्ती सेवा श्रद्धा फाउंडेशन, शिळफाटा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष अमोल शहाणे, राहुल जाधव, दिवेश राठोड, वेदा साखरे, विनोद राजपूत, संदीप दुबे, अनिता शहा, अपर्णा साठे, जगदीश जाखोटीया, मंजु उपाध्याय, नीरज राय, रुपेश देशमुख यांचे विशेष सहकार्य लाभले. या उपक्रमास समाजातील विविध क्षेत्रातील मंडळींनी आपले योगदान देऊन उपस्थित राहिल्याबद्दल सहज सेवा फाउंडेशनच्या महिला अध्यक्षा निलम पाटील, सचिव अखिलेश पाटील, खजिनदार संतोष गायकर यांनी आभार मानले.


Friday, May 23, 2025

खोपोली शहरातील समस्यांबाबत प्रतिकात्मक अंत्ययात्रा

 


* खोपोली खालापूर संघर्ष समितीचा पुढाकार


खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली शहरात समस्यांचे पेव फुटलेले आहे. नागरी समस्या सोडविण्यास खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सपशेल अपयशी ठरले आहेत. खोपोली खालापूर संघर्ष समितीच्या माध्यमातून नेहमीच प्रशासनाकडे विनम्र पाठपुरावा होत असतो, परंतु बऱ्याच वेळा आश्वासन देऊन नंतर पाठ फिरविली जाते असा अनुभव समितीस येत आहे. गेल्या काही महिन्यात शहराची अवस्था दयनीय झालेली आहे. पाण्याची समस्या, रस्त्याच्या समस्या, गटाराच्या समस्या, आरोग्याच्या समस्या, वाढत्या अनधिकृत बांधकामाच्या समस्या, वाहतूक समस्या, घंटागाडीची समस्या, नदी प्रदूषण समस्या, पार्किंग समस्या, गार्डनची समस्या, मुलांसाठी स्विमिंग पूल, शहरातील वृक्षतोड यासारख्या समस्या सोडविण्यात खोपोली नगर परिषद प्रशासन अपयशी ठरले आहे.


वेळेत कर न भरल्यास दंडात्मक कारवाई करणारे प्रशासन सुविधा देण्यात कमी पडत आहे. नागरिक कर भरतात तर त्यांना सुविधा मिळणे हा हक्क आहे. नगर परिषदेने नागरिकांची सनद म्हणून तक्रार आल्यानंतर कार्यवाही करताना निश्चित कालावधीत पूर्ण करीत नसल्याने त्या काळात ते काम न झाल्यास कर्तव्यपूर्ती न केल्याबद्दल त्या आस्थापनेस दंड म्हणून नागरिकांना आर्थिक सुट देण्यात यावी अशीही मागणी संघर्ष समितीने केलेली आहे.

प्रशासनाच्या या अपयशाने शहर जणू मृत्यू शय्येवर आहे, याचा निषेध म्हणून प्रशासनाच्या कामांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा मंगळवार, 27 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता लोहाणा समाज हॉलमार्गे खोपोली बाजारपेठ ते खोपोली नगर परिषद येथपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. यावेळी सर्व असुविधांचे निवेदन देण्यात येणार असून नगरपालिकेने या समस्यांसंदर्भात लेखी भूमिका स्पष्ट करून योग्य ती कारवाई न केल्यास लवकरच खोपोलीतील असुविधांचे प्रदर्शन भरवुन आंदोलन करण्यात येईल, असेही खोपोली खालापूर संघर्ष समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

नागरिकांच्या प्रश्नावर खोपोली खालापूर संघर्ष समिती प्रभावीपणे काम करीत असून नागरिकांच्या भावनांचा कडेलोट होत असल्याने वेळेत होत नसलेल्या कामांना मृत स्वरूपाचा दाखला देऊन प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात येत असुन नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता या मोर्चाने नक्कीच शहरात सुधारणा होतील. यातून मार्ग न निघाल्यास पुढची दिशा ठरवून निर्णय घेणार असल्याचे ऍंड. मीना बाम, ऍंड. शैलेश पालांडे, डॉं. शेखर जांभळे, मोहन केदार, उबेद पटेल, आशपाक लोगडे, नरेंद्र हर्डीकर यांनी सांगितले आहे.

Thursday, May 22, 2025

प्रदूषण नियंत्रण कार्यालयासमोर बंडखोर सेना पक्षा तर्फे जोरदार निदर्शने

 



 कोल्हापुर प्रतिनिधी/ किशोर जासुद :- कुपवाड औद्योगिक वसाहतीतील केमिकल कंपन्यांवर कारवाईच्या मागणीसाठी बंडखोर सेना पक्षातर्फे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करून संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा २७ मेपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.


कुपवाड एमआयडीसीतील बेकायदेशीर केमिकल इंडस्ट्रीजमधून सोडण्यात येणाऱ्या विषारी पाण्यामुळे सावळी,बामणोळी,काननवाडी, मिरज, कुपवाड गावांतील जमिनी खराब होत आहेत नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.यामुळे या केमिकल इंडस्ट्रीज कंपन्यांचे परवाने रद्द करावेत,अशी मागणी केली. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी संजीव रेदासनी यांना निवेदन देण्यात आले.यावेळी प्रदेश उपाध्यक्ष नीलेश मोहिते,कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विजय लोखंडे,हातकणंगले तालुका अध्यक्ष सुरेश आवळे,हातकणंगले तालुका युवक अध्यक्ष अभिषेक भंडारे,अजय साळवे,राहुल देडे, नारायन गाडे,सुशीला जाधव,गौतम कांबळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.



सम्राटबाबा महाडीक यांनी घेतले डॉ. नायकवडी समाधीचे दर्शन; गौरवभाऊ नायकवडी यांच्याकडून सत्कार*

 


वाळवा प्रतिनिधी/किशोर जासूद :- भाजप सांगली जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड झालेल्या मा. सम्राटबाबा महाडीक यांनी वाळवा येथे पद्मभूषण क्रांतीवीर डॉ. नागनाथ आण्णा नायकवडी यांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करत दर्शन घेतले आणि अभिवादन केले. त्यांच्या या सन्मानपर भेटीने राजकीय वर्तुळात सकारात्मक चर्चेला उधाण आले आहे.

या प्रसंगी शिवसेना इस्लामपूर विधानसभा प्रभारी मा. गौरवभाऊ नायकवडी यांनी स्वतः पुढे येऊन सम्राटबाबांचा सन्मान केला व त्यांना शुभेच्छा देत राजकीय पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या सौहार्दपूर्ण वातावरणात एकोप्याचा संदेश दिला गेला.

कार्यक्रमाला मा. नंदू पाटील, मा. पिंटू माळी, डॉ. राजेंद्र मुळीक, मा. इसाकभैय्या वलांडकर, उमेशभैया घोरपडे, मा. सनी अहिर यांचीही विशेष उपस्थिती होती.

सम्राटबाबांच्या या साधेपणाच्या आणि संस्कारित राजकारणाच्या शैलीला स्थानिक कार्यकर्त्यांनी भरभरून दाद दिली.या भेटीने फक्त भाजपच नव्हे तर संपूर्ण सांगली जिल्ह्यातील राजकीय वातावरणात एक सकारात्मक ऊर्जा संचारली आहे, हे निश्चित!


आंचल दलाल रायगडच्या नव्या पोलिस अधीक्षक

 



 पोलिस अधीक्षक घार्गे यांची अहिल्यानगरला बदली


 कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्गच्या एसपी देखील बदलले


 राज्य पोलिस दलातील 22 अधिकाऱ्यांची खांदेपालट 


खालापुर/ प्रतिनिधी :- राज्य पोलिस दलातील 22 पोलिस अधीक्षक आणि पोलिस उपायुक्त पदांवरील बदल्या करण्यात आल्या आहेत. कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे पोलिस दलात उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. साताऱ्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलिस दलात उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. रायगड पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची अचानक बदली करण्यात आल्याने भूवया उंचावल्या आहेत. रायगड पोलिस अधीक्षकपदी पुण्याच्या पोलिस बल गट क्रमांक 1 मधील आचल दलाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रायगडचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची अहिल्यानगर पोलिस अधीक्षकपदी निवड करण्यात आली आहे. 


लोकाभिमुख आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सोमनाथ घार्गे ओळखले जायचे. आपल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी पोलिस दलाच्या अधुनिकीकरणावर मोठा भर दिला. जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना स्मार्ट पोलिस ठाणे बनविण्यासाठी त्यांनी व्यापक प्रयत्न केले. पोलिसांना अत्याधुनिक वाहने उपलब्ध व्हावीत यासाठी प्रयत्न केले. पोलिस प्रशासनाला लोकाभिमुख करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शिस्तप्रीय आणि मितभाषी अधिकारी म्हणून ते ओळखले गेले. त्यांच्या कार्यकाळात सिसीटीएनएस प्रणालीत रायगड पोलिसांची कामगिरी सातत्याने अव्वल राहिली. 


आंचल दलाल या रायगडच्या नव्या पोलिस अधीक्षक असणार आहेत. पुण्यातील राज्य राखीव पोलिस दलाच्या समादेशक म्हणून त्या कार्यरत होत्या. त्या रायगड पोलिस दलाची नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी असणार आहेत. त्या 2018 वर्षीच्या भरतीतील पोलिस सेवेतील अधिकारी आहे. त्यांनी यापुर्वी सातारा जिल्ह्यात अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे.


दरम्यान, धाराशिवचे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची देखील बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सांगली येथील अप्पर पोलिस अधीक्षक रितू खोकर यांची धाराशिव जिल्हा पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. नवीन जिल्हा पोलिस अधीक्षक रितू खोकर यांना तुळजापूर ड्रग्ज प्रकरण आणि जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीचे आव्हान असणार आहे. माजी जिल्हा पोलिस अधीक्षक संजय जाधव यांना नवीन नियुक्ती मिळालेली नाही. स्वतंत्रपणे त्यांचा नियुक्ती देण्यात येणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. 




Saturday, May 17, 2025

खोपोली शहरात एकेरी वाहतूक सुरू

 


* सूचना, हरकतींची वाट न पाहता पोलिसी बळाचा वापर करीत एकेरी वाहतुकीची अमंलबजावणी

खोपोली / खलील सुर्वे :- खोपोली शहरात वाहतूक कोंडी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर खोपोली नगर परिषद प्रशासनाकडून खोपोली बाजारपेठ परिसरात एकेरी वाहतुकीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अधिसूचना जारी केल्यानंतर 30 दिवसांत लेखी स्वरूपात हरकती व सूचना सादर कराव्यात, त्यानंतर या वाहतूक नियमाची अमंलबजावणी करण्यात येईल, असे आवाहन करण्यात आले होते. परंतु अधिसूचना जारी झाल्यापासून 10 दिवस उलटत नाही, तोच आज शनिवार, 17 मे 2025 पासून खोपोली शहरात एकेरी वाहतूक नियमनाची अमंलबजावणी सुरू करण्यात आली आहे. 


15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. यानंतर लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशातील सर्व संस्थाने रद्द करीत भारत देशात सामावून घेतली. त्यानंतर महामानव डॉं. बाबासाहेब यांनी जगातील सर्वात मोठी राज्यघटना लिहिली आणि 26 जानेवारी 1950 पासून भारत देश प्रजाकसत्ताक म्हणून गणला जावू लागला. पण आज 67 वर्षानंतर संपूर्ण खोपोली शहराला प्रश्न पडला आहे की, खरंच खोपोली शहर लोकशाही देशात अथवा राज्यघटना मानली जाणाऱ्या देशात आहे का ? 30 डिसेंबर 2023 रोजी खोपोली नगर परिषदेची मुदत संपली आणि प्रशासकाच्या हातात शहराचा कारभार आला. त्या दिवसापासून खोपोली शहरात हुकूमशाही...राजेशाही सुरू झाल्याचे दिसून येत आहे. प्रशासक मनमानीपणे वागत असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. आज पुन्हा ते अधोरेखित झाले आहे. खोपोली शहरातील नागरीक, नेते, आजी-माजी लोकप्रतिनिधी यांच्या मताला शून्य किंमत देत प्रशासक डॉं. पंकज पाटील यांनी पोलिसी बळाचा वापर करीत एकेरी वाहतूक व्यवस्था राबविण्यास सुरूवात केली आहे. 


ठिकठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांना तैनात करीत आज एकेरी वाहतूक व्यवस्था राबविण्यात आली. अचानक सुरू करण्यात आलेल्या नियमनामुळे नागरीकांची चांगलीच तारांबळ उडालेली दिसून आली. खालची खोपोली कमानी जवळ पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते, हे कर्मचारी खोपोली पोलिस स्टेशनकडे वाहन धारकांना पाठवित होते. अरूणा बार शेजारील रस्त्यांवर देखील दोन महिला पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. दिपक हॉटेल चौक, डिजी 1 येथे ही पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते आणि ते वाहन धारकांना नव्या मार्गांने पाठवित होते. 


* वाहनधारक मतदार नाहीत का? 

खोपोली नगर परिषद बरखास्त झाल्यापासून प्रशासक खोपोली शहराचा कारभार पाहत आहेत. मनमानीपणे निर्णय घेत खोपोलीकरांना त्रास देण्यात आला आहे. त्यात आता एकेरी वाहतूक व्यवस्था राबवित खोपोलीकरांना बंदीस्त करण्यात येत आहे. नव्या नियमनामुळे खोपोली करांना मनस्ताप होणार असला तरी याकडे नेते, आजी-माजी लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. खोपोली शहरात एकेरी वाहतुकीमुळे ज्या वाहन धारकांना त्रास होणार आहे, ते वाहनधारक मतदार नाहीत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 


खोपोली नगर परिषद निवडणूक काही महिन्यांवर येवून ठेपली आहे, अशा परिस्थितीत आजी-माजी व भावी लोकप्रतिनिधी, नेते एकेरी वाहतूक व्यवस्थेबाबत आवाज का उठवत नाहीत ? असा प्रश्न खोपोली करांना पडला आहे. एकेरी वाहतूक व्यवस्था संपूर्ण खोपोली शहरातील नागरीक व नेते, लोकप्रतिनिधी यांना मान्य आहे का? प्रशासक यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे, असे सर्व खोपोली करांना वाटत आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. एकाही नागरीक, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, नेते, लोकप्रतिनिधी यांनी एकेरी वाहतूक व्यवस्थेबाबत हरकत घेतलेली नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


* पोलिसी बळाचा वापर नाही, ट्रायल :- 

खोपोली बाजार पेठेमध्ये एकेरी वाहतूक व्यवस्था राबविण्यास आज संध्याकाळपासून सुरूवात झाली. याबाबत पत्रकारांनी सोशल मिडीयावर मेसेज केल्यावर खोपोली पोलिस स्टेशनचे अधिकारी यांनी पत्रकार यांना फोन करून हा असा मेसेज का केला असा प्रश्न विचारला. हा पोलिसी बळाचा वापर नसून उद्या प्रत्यक्षात वाहतूक व्यवस्था राबविण्यात आल्यानंतर काय काय अडचणी येवू शकतील, याची ट्रायल घेण्यात आली, असे सांगण्यात आले. 


दरम्यान, अद्याप हरकती व सूचना यांना वेळ असतांना तसेच पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कामाचा एवढा भार असतांना एकेरी वाहतूक व्यवस्था राबविण्यासाठी त्यांना कामाला लावणे, इतके आवश्यक आहे का ? खोपोली शिळफाटा येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित असतांना बाजार पेठेमधील एकेरी वाहतूक व्यवस्था राबविण्यावर भर का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. खोपोली पोलिस प्रशासनाला नवीन वाहतूक व्यवस्था राबविण्यासाठी रायगड जिल्हा पोलिस अधिक्षक, खालापूर उपविभागीय पोलिस अधिकारी किंवा रायगड जिल्हाधिकारी यांच्या परवानगीची गरज नाही का? की पोलिस निरीक्षक निर्णय घेत आपल्या मनाने वाहतूक व्यवस्था राबवू शकतात का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Friday, May 16, 2025

एकेरी वाहतूक : आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी

 



* वाहतूक कोंडी फोडायची आहे की, खोपोलीकरांना बंदीस्त करायचे आहे ? 


* अतिक्रमण हटविण्याची हिंमत नाही मात्र छोट्याशा शहरात जागोजागी नो एंट्री ?


खोपोली/प्रतिनिधी :- खोपोली बाजारपेठेतील वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर खोपोली नगर परिषदेकडून उपाय योजना करण्यात येत असून त्याच अनुषंगाने खोपोली बाजार पेठ परिसरात एकेरी वाहतूक राबविण्याची संकल्पना समोर आली आहे. या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली असून 1 महिन्याच्या आत नागरीकांनी हरकती व सूचना लेखी स्वरूपात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परंतु अजून सूचना व हरकतींसाठी वेळ शिल्लक असला तरी खोपोली नगर परिषद प्रशासनाकडून शहरात ठिकठिकाणी 'नो एंट्री'चे फलक लावण्यास सुरूवात करण्यात आली आहे. अर्थात खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉं. पंकज पाटील व खोपोली पोलिस प्रशासन बळजबरी व दमदाटी करीत शहरात 'एकेरी वाहतूक' राबविणारच असे दिसून येत आहे. 


नविन एकेरी वाहतूक संदर्भातील अधिसुचनेनुसार खोपोली बाजार पेठेमध्ये प्रवेश करण्याचे फक्त दोन मार्ग ठेवण्यात आले आहेत. यातील एक मार्ग म्हणजे खोपोली पोलिस स्टेशन समोरून आणि दुसरा मार्ग आहे वरची खोपोली मार्गे. तर बाहेर पडण्यासाठी अनेक बाजूंनी अर्थात खालची खोपोली कमानी, सिओ बंगला समोरील रस्ता, शिशु मंदिर भुयारी मार्ग...आता प्रश्न निर्माण होतो की, खोपोली बाजार पेठ परिसरात नेमकी वाहतूक कोंडी होते कुठे ? तर एक आहे दिपक हॉटेल चौक...दिपक हॉटेल चौक ते सागर प्लाझा हॉटेल पर्यंत आणि दुसरे महत्वाचे म्हणजे शाळा सुटण्याच्या वेळेस जनता स्कूल, शिशू मंदिर परिसर ते जुनी नगर परिषद पर्यंत आणि भाजी मार्केट परिसर...या भागात नेहमीच वाहतूक कोंडी असते, ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी संपूर्ण खोपोली बाजार पेठेमध्ये जाणारे रस्ते एकेरी करणे उपाय आहे का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.


खोपोली शहरात प्रवेश करण्यासाठी आज पाच ते सहा मार्ग आहेत. ज्यात खालची खोपोली कमानी, सिओ बंगला समोरील रस्ता, शिशु मंदिर भुयारी मार्ग, अरूणा बार शेजारील रस्ता, खोपोली पोलिस स्टेशन व वरची खोपोली रस्ता...आता या सर्व रस्त्यांवरील भार पोलिस स्टेशन समोरील रस्ता व वरची खोपोलीतील रस्त्यांवर टाकला जात आहे. लौजी, चिंचवली, शिळफाटा आणि खालापूर ग्रामीणमधील ग्रामस्थ हे खोपोली बाजार पेठेमध्ये प्रवेश अधिकतर खालची खोपोली कमानी मार्गांने करतात. तसेच भानवज, शास्त्री नगर आणि तत्सम परिसरातील नागरीक खोपोली पोलिस स्टेशन व सिओ बंगला समोरील रस्त्याचा वापर करतात. उर्वरीत नागरीक शिशु मंदिर भुयारी मार्ग, अरूणा बार शेजारील रस्ता व वरची खोपोली मार्गे ये-जा करतात. एकेरी वाहतूक उपक्रम राबविल्यानंतर वरची खोपोली मार्गे ये-जा करणारे त्याच मार्गे येतील-जातील पण खालची खोपोली कमानी, सिओ बंगला, शिशु मंदिर भुयारी मार्ग व अरूणा बार शेजारील रस्त्याने जाणारी वाहने खोपोली पोलिस स्टेशन मार्गे वळविण्यात येत आहेत. 


शाळा सुटण्याच्या वेळेस जनता स्कूल, शिशू मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. त्यात आता याच मार्गे शहरातील 60 ते 70 टक्के वाहतूक बाजार पेठेमध्ये प्रवेश करणार असल्याने दिपक हॉटेल चौकात होणाऱ्या वाहतुकीपेक्षा मोठी वाहतूक कोंडी होणार नाही का ? तसेच भाजी खरेदीला निघालेल्या लोकांचाही खोपोली पोलिस स्टेशन समोर दररोज तळ निर्माण होवू शकतो. ऐवढेच नव्हे तर डॉं. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ कार्यक्रम असल्यावर वाहनांची गर्दी कशी हाताळणार ? याचा विचार करण्यात आला आहे का ? 


आता मूळ मुद्दा असा की, एकेरी वाहतूक केल्यावर खरंच खोपोली बाजारपेठेतील वाहतूक कोंडी फुटणार आहे का ? दिपक हॉटेल चौकात वाहतूक कोंडी होते कारण या चौकात चारही बाजूंनी येणारी वाहने...नंतर जवळ असलेला रिक्षा स्टँड तसेच लोकल येण्या-जाण्याच्या वेळेस प्रवाशी व वाहनांची होणारी गर्दी, आजूबाजूला विक्रीस बसणारे विक्रेते...आता एकेरी वाहतुकीने सर्वच समस्या सुटणार आहेत का ? खोपोली रेल्वे स्टेशनकडून येणारे प्रवाशी व वाहने तशीच असणार, ही वाहने जैन मंदिराकडे वळणार... डॉं. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सागर प्लाझाकडून येणारी वाहने खालची खोपोली कमानीकडे, जैन मंदिराकडे व खोपोली रेल्वे स्टेशनकडे वळणारच...आजूबाजूला विक्रीस बसणारे विक्रेते देखील असणार, मग फक्त खालची खोपोली कमानीकडून येणारी वाहने या चौकात आली नाहीत म्हणून या ठिकाणी वाहतूक कोंडी होणे बंद होईल, याबाबत नगर परिषद प्रशासन ठाम आहे का ? यानंतर रेल्वे स्टेशन येथील वाहन धारकाला शिळफाट्याकडे जातांना गल्लीबोळातून फिरून जावे लागेल, त्यातून शिशू मंदिर परिसर व खोपोली पोलिस स्टेशन, भाजी मार्केट येथे वाहतूक कोंडीत हे वाहन अडकले तर तो वाहन चालक सुटकेचा नि:श्वास कसा सोडणार...


भाजी मार्केट परिसरात होणारी गर्दी व वाहतूक कोंडी, खोपोली शहरातील एकेरी वाहतुकीतून सुटेल, असे वाटते का ? या भागात संपूर्ण खोपोलीतून नागरीक खरेदीसाठी येतात, हातगाड्या रस्त्यांवर उभ्या असतात...पार्किंग सुविधा नसल्याने जागा मिळेल तिथे वाहने लावून अथवा वाहनांवर बसूनच खरेदी केली जाते. आता एकेरी वाहतूक केल्यावर नक्की चित्र कसे पालटणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. एकेरी वाहतूक व्यवस्थेतून पार्कींगची समस्या सुटणार आहे का ? रस्त्यांवर उभ्या असलेल्या हातगाड्या कमी होणार आहेत का ? उलटपक्षी आता खोपोली पोलिस स्टेशन व शिशू मंदिर परिसरातील वाहने या गल्लीत जास्त संख्येने शिरतील, मग कोंडी फुटणार की वाढणार ? हा नेमका प्रश्न आहे. 


हा झाला वाहतुकीचा प्रश्न... उद्या खोपोली शहरातील सर्वच वाहने खोपोली पोलिस स्टेशन समोरून जाणार असल्याने सकाळ-संध्याकाळ या ठिकाणी नाकाबंदी करीत वाहतूक शिस्तीच्या नावावर तपासणी सुरू झाल्यावर वाहन धारकांना मनस्ताप होणार, त्याचे काय ? खोपोली शहराला झालेला एक छोटासा आजार दूर करण्यासाठी अख्ख्या खोपोली शहरातील वाहतूक व्यवस्थेची शस्रक्रिया करणे कितपत योग्य आहे. एका चौकातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी संपूर्ण खोपोली शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडवून देणे शहाणपणाचे आहे का ? खालची खोपोली कमानीपासून ते दिपक हॉटेल चौकापर्यंत असलेल्या दुकानात 10 रूपयांच्या खरेदीसाठी देखील मुंबई-पुणे महामार्ग आणि संपूर्ण खोपोली धुंडाळून यावे लागणार...मग या वैतागवाडीला त्रासून नागरीकांनी इतर भागातील दुकानांवर खरेदी सुरू केल्यास या व्यवसायिकांच्या नुकसानीचे काय ? आजी-माजी नगरसेवक, नेते, सामाजिक कार्यकर्ते यांना याबाबत खरंच देणे-घेणे नाही का ? नागरीकांना होणाऱ्या त्रासाबाबत आवाज कौन उठविणार...पोलिस अधिकारी असो की, खोपोली नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचारी 3 वर्षांनी अथवा कधी तरी बदली होवून जाणार आहे, पण नागरी समस्यांचा त्रास हा येथील मतदार व नागरीकाला होणार आहे. 


खोपोली शहराला सध्या अतिक्रमणाच्या विळख्याने घेरले आहे. शहरातील बाजार पेठेत दुकानदारांनी मनमानी केलेले अतिक्रमण व वाहतूक कोंडीचा त्रास सर्वसामान्य नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे तर आता दुसरीकडे नगर परिषदेने येथून 'एंट्री' तर येथून 'नो एन्ट्री'चे झेंडे गाडण्यास सुरूवात केली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. रस्त्यांवर...गटारांवर... दुकानदारांच्या वाढलेल्या अतिक्रमणामुळे हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची वाहने कुठे पार्किंग करावी ही एक मोठी समस्या झाली आहे. खोपोली शहरातील बाजार पेठेतच हॉस्पिटल असल्यामुळे आता येथून 'एन्ट्री' आणि तिथून 'नो एंट्री' हा विचार करीत हॉस्पिटलमध्ये जाणारा एखादा रुग्ण दगावल्यास जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी अतिक्रमण हटविण्याची हिंमत का करीत नाहीत ? रस्ते मोठे झाल्यास पार्किंगची सुविधा आपोआप होईल 'एन्ट्री' अथवा 'नो एंट्री'चा प्रश्न आपोआप सुटेल. महात्मा फुले भाजी मार्केट व पोलिस स्टेशन परिसरामध्ये असणाऱ्या रस्त्यावर हातगाड्यांच्या अतिक्रमणामुळे रस्ता अडविला गेला आहे, हे नगर परिषद प्रशासनाला दिसून येत नाही का ? शहरात जागोजागी दुकाने उभारून अतिक्रमण केले जाते, पण त्यांच्यावर कारवाई होत नाही ? आधी अतिक्रमण हटवा त्यानंतर 'एन्ट्री' अथवा 'नो एंट्री'चे प्लॅन करा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 




* नागरीकांच्या हरकती व सूचनांना केराची टोपली ? 

खोपोली नगर परिषदेकडून एकेरी वाहतूक संदर्भात अधिसूचना जारी करून 30 दिवसांत लेखी स्वरूपात हरकती व सूचना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे, पण मुळात खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना खोपोली शहरातील नागरीकांच्या हरकती व सूचनांची गरज नसल्याचे दिसून येत आहे. कारण अजून सूचना व हरकतींसाठी जवळजवळ 13 - 14 दिवसांचा कालावधी शिल्लक असला तरी खोपोली शहरात ठिकठिकाणी 'नो एंट्री'चे फलक लावण्यात आले आहेत. 


याचा अर्थ खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांना लोकशाही मार्गांवर विश्वास नाही. अजून नागरीकांच्या हरकती व सूचनांचा कालावधी शिल्लक असतांना त्यांनी मनमानीपणे या एकेरी वाहतूक उपक्रमाची अमंलबजावणी करण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत.




Thursday, May 15, 2025

हळद रक्ताने रंगली..!

 


* नाचण्यावरील वादातून एकाचा जीव गेला

खोपोली / खलील सुर्वे :- खोपोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बीड गावाच्या इस्टूल वाडीमध्ये काल रात्री लग्न समारंभात डीजेच्या तालावर कपडे काढून बेधुंद नाचणाऱ्यांना अडविणे दोन भावांना महागात पडले असून झालेल्या भांडणात एका भावाचा जीव गेला तर दुसरा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, या प्रकरणी खोपोली पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दुसरा अद्याप फरार असून त्याचा शोध सुरु आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 13 मेच्या रात्री बीड गावाच्या आदिवासी वाडीत लग्नसमारंभानिमित्त हळदीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात बाळू मुकणे आणि प्रकाश पवार मंदधुंद होऊन नाचत होते व त्यांनी नाचताना शर्ट काढला. ते अती उत्साहात नाचू लागले म्हणून आदिवासी वाडीतील विलास वाघमारे यांनी त्यांना अडवले व येथे मुली, महिला नाचत आहेत. त्यामुळे तुम्ही कपडे काढून नाचू नका, असे सांगितले. तेव्हा त्या गोष्टीचा मनात राग धरून बाळू मुकणे व प्रकाश पवार यांनी विलास वाघमारे याला मारहाण करायला सुरुवात केली. तेव्हा विलास वाघमारे याचा भाऊ अनंता वाघमारे हा भांडण मिटवायला मध्ये पडला, तेव्हा प्रकाश पवार याने बाजूला पडलेला भात शिजवायचा भला मोठा कालता (उलथने) उचलला व विलास वाघमारे याच्या डोक्यात व हातावर मारायला सुरूवात केली. त्या माराने विलासच्या डोक्यात मोठी जखम झाली व तो रक्तबंबाळ होऊन बाजूला पडला व भांडणे मिटवायला आलेला विलासचा मोठ्या भाऊ अनंताच्या छातीवर जोरदार त्या कालत्याने उपटी टाकल्या.


दरम्यान, दोन्ही भावांना रिक्षाने खोपोलीत आणण्यात आले पण यात मोठा भाऊ अनंता वाघमारे हा रुग्णालयात पोहचायच्या आत त्याची प्राणजोत मालवली. तर विलास वाघमारे याच्या डोक्यात सहा टाके पडले. ही घटना खोपोली पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा आरोपी तेथून पसार झाले होते. बाबू मधुकर मुकणे यास केळवली रेल्वे स्थानकात पोलिसांनी पकडले पण दुसरा आरोपी प्रकाश रमेश पवार हा काही मिळून आला नाही त्याचा शोध खोपोली पोलिस घेत आहेत.



खालापुरात एक दिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर संपन्न

 


खालापूर / प्रतिनिधी :- रायगड जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड अलिबाग यांनी उपनियंत्रक नागरी संरक्षण दल उरण यांच्या पथकामार्फत खालापूर तालुक्यात एक दिवसीय आपत्ती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन सरनौबत नेताजी पालकर सभागृह येथे आयोजित केले होते. या शिबिराचे उद्घाटन खालापूर तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी केले. नागरी संरक्षण दल उरणचे प्रशिक्षक शशिकांत शिरसाट यांनी शिबिरार्थींना युद्धजन्य परिस्थितीत कोणकोणत्या उपाययोजना राबवाव्यात याबाबतीत तंत्रशुद्ध मार्गदर्शन करताना दृकश्राव्य प्रणालीचा वापर केला. आपत्तीचे विविध प्रकार विस्तृतपणे समजावून सांगताना प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले. प्रथमोपचार आणि कोणत्या प्रसंगी कसे मदतकार्य करायचे याबाबतीत प्रशिक्षणार्थींना सहभागी करून मार्गदर्शन केले.


कोणत्याही आपत्तीला सामोरे जाण्यासाठी मनाच्या तयारीसोबत तांत्रिक बाबींचे ज्ञान असणे आवश्यक असल्याने अशा शिबिराचे आयोजन केल्याचे सांगत तहसीलदार अभय चव्हाण यांनी या शिबिरानंतर शिबिरार्थींची सामाजिक जबाबदारी वाढली असल्याची जाणीव करून दिली.


खालापूर तालुक्यातील महसूल कर्मचारी, खोपोली नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी, खोपोली नगरपालिका फायर ब्रिगेडचे सदस्य, तालुक्यातील पोलिस पाटील, आपदा मित्र आणि सखी, हेल्प फाउंडेशनचे पदाधिकारी यांनी या प्रशिक्षण शिबिरात सहभाग घेतला. विविध संसाधनांचे प्रदर्शन आणि वापर याबद्दल मार्गदर्शन केले गेले.



Wednesday, May 14, 2025

साप्ताहिक खालापूर वार्ताचा 5 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

 


* न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वितरण

* महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुधीर माने यांचा अभिष्टचिंतन सोहळा

* खालापूर तालुक्यातील मान्यवरांचा पुरस्कार देवून सत्कार


खालापूर / मानसी कांबळे :- साप्ताहीक खालापूर वार्ताचा 5 वा वर्धापन दिन सोहळा, संपादक तथा न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुधीर गोविंद माने यांचा 55 वा वाढदिवस तसेच न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान सोहळा खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉं. सुनील गोटीराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बौध्द पौर्णिमेदिवशी वावोशी फाटा येथील हरीओम मंगल कार्यालयात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटक खोनपचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती मधुकर किसन दळवी होते. 


यावेळी व्यासपिठावर न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्वे, शिवसेना रायगड जिल्हा महिला प्रमुख सुप्रिया साळुंखे, शिवसेना खालापूर तालुका अध्यक्ष एकनाथ पिंगळे, न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन राष्ट्रीय संघटक तथा उपक्रम प्रमुख डॉं. शेखर जांभळे, आम आदमी पार्टी खोपोली शहर अध्यक्ष गयासुद्दीन खान, जेष्ठ पत्रकार दिनकर भुजबळ, शिवाजी जाधव, मुख्याध्यापक मारुती दासरे, बहुजन संकल्पचे संपादक तय्यब खान, महाराष्ट्राची भूमीचे संपादक डॉं. रविंद्र विष्णू जाधव, न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन ठाणे जिल्हा संयोजक श्रीकांत म्हात्रे, रोहा तालुकाध्यक्ष याकुब सय्यद, पोलिस पाटील मनोज पारठे आदी उपस्थित होते. 



दिपप्रज्वलन व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली. महापुरुषांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले तसेच तसेच बौध्द पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर तथागत भगवान गौतम बुध्द यांना नतमस्तक होत विश्वशांतीसाठी प्रार्थना करण्यात आली. तद्नंतर हभप शिवाजी बुवा सुगदरे व मंडळी यांनी महाराष्ट्र गीत सादर करीत कार्यक्रमाची रौनक वाढवली. उपस्थित मान्यवरांचा साप्ताहीक खालापूर वार्ता ग्रुपकडून शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.


साप्ताहिक खालापूर वार्ताचे मुख्य संपादक सुधीर माने यांचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. प्रमुख पाहुणे तसेच उपस्थित मान्यवर यांनी मुख्य संपादक सुधीर माने यांना दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा देत त्यांच्याकडून अशीच समाज सेवा अविरत घडत राहो, अशी प्रार्थना केली. 


* न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन नियुक्ती पत्र प्रदान :- 

या कार्यक्रमात न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्वे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुधीर गोविंद माने व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. डॉं. शेखर जांभळे राष्ट्रीय संघटक तथा उपक्रम प्रमुख, मानसी कांबळे राष्ट्रीय महासचिव, ईशिका शेलार महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष, श्रीकांत म्हात्रे ठाणे जिल्हा संयोजक, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष जतीन मोरे, कर्जत-खालापूर विधानसभा अध्यक्ष संतोष मोरे, खालापूर तालुका अध्यक्ष सुधीर देशमुख, रोहा तालुका अध्यक्ष याकुब सय्यद आदींना नियुक्ती पत्र देण्यात आले. 


* मान्यवरांचा पुरस्कार देवून सत्कार :- 

खालापूर तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या मान्यवरांचा यावेळी समाज भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यात वावर्ले वस्ती शाळेचे शिक्षक भिकू नामदेव पाटेकर यांना आदर्श शिक्षक तर आदर्श शिक्षिका म्हणून पल्लवी प्रकाश चौलकर यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देण्यात आला. ग्रुप ग्रामपंचायत हाळ खुर्द येथील ग्रामसेवक सुरज मुकादम यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला. युवा किर्तनकार हभप दिलीप मारुती राणे यांना युवा कीर्तनकार, संतोष जानू पारठे यांना आदर्श पालक, ग्रामपंचायत वावोशी येथील विद्यमान सरपंच अश्विनी उदय उर्फ राजू शहासने यांना आदर्श सरपंच पुरस्काराने गौरविण्यात आले. नडोदे गावचे सुपुत्र माजी सैनिक तुषार येरूणकर, मुस्कान खालिद सय्यद, तब्बसुम शरीफ खान, गोरठण बुद्रुक ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच एडवोकेट रमेश जनार्दन पाटील, खोपोलीच्या माजी आरोग्य सभापती प्रमिला सुर्वे, आंगणवाडी सेविका लता भाऊ शिगवण तसेच साप्ताहिक बहुजन संकल्पचे संपादक तय्यब खान व आकाश जाधव यांना समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


* मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत :- 

खोपोली नगरीचे माजी नगराध्यक्ष डॉं. सुनील पाटील यांनी शुभेच्छा देत पत्रकारांच्या समस्यांबाबत ऊहापोह केला. तसेच त्यांनी सांगितले की, स्थानिक वृत्तपत्र टिकण्यासाठी त्यांना मदत केली पाहिजे. माजी आरोग्य सभापती मधुकर दळवी, शिवसेना रायगड जिल्हा महिला प्रमुख सुप्रिया साळुंखे, न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय संघटक डॉं. शेखर जांभळे, शिवसेना खालापूर तालुका अध्यक्ष एकनाथ पिंगळे, जेष्ठ पत्रकार दिनकर भुजबळ, साप्ताहीक महाराष्ट्राची भूमीचे संपादक डॉं. रविंद्र जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले.


दरम्यान, शेवटी विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मानसी कांबळे व फिरोज पिंजारी यांनी केले तर आभार सुधीर देशमुख यांनी मानले.

Tuesday, May 13, 2025

वाठार येथे रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न....



वाठार /किशोर जासूद :- वाठार येथील जनसुराज्य शक्ती पक्ष, उज्वल ध्येय युथ फाउंडेशन व उज्वल ध्येय सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने उज्वल ध्येय युथ फाऊंडेशन संस्थापक,युवा उद्योजक शरद बेनाडे यांच्या वाढदिवसानिमित्त हनुमान मंदिर येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचा उद्घाटन सोहळा  हातकणंगले मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने(बापू ) यांच्या शुभहस्ते व जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने भैय्या व युवा नेते सागर खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला .


यावेळी सरपंच सचिन कांबळे, भाजपा तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष विश्वास माने,स्विय सहायक सुहास राजमाने,ग्रा. प सदस्य सुहास पाटील, ग्रा. प सदस्य सचिन कुंभार, ग्रा. प सदस्य गजेंद्र माळी, ग्रा. प सदस्य सुरज नदाफ, ग्रा.प सदस्य संजय मगदूम यासह ग्रामस्थ रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Wednesday, May 7, 2025

खेळाडूंना क्रीडा कौशल्याच्या बळावर वेगवेगळ्या क्षेत्रांत संधी

 



* अप्पर पोलिस अधीक्षक रायगड अभिजीत शिवथारे यांचे प्रतिपादन


रायगड / प्रतिपादन :- जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय रायगड यांच्या वतीने उन्हाळी क्रीडा कौशल्य व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन अलिबाग येथील भव्य क्रीडा संकुलात करण्यात आले आहे. या शिबाराच्या उद्घाटनानिमित्त रायगडचे अप्पर पोलिस अधीक्षक रायगड अभिजीत शिवथारे, रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी (माध्य) महारुद्र नाळे यांच्या हस्ते झाले. यावेळी हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर, सामाजिक कार्यकर्ते रिकी अगरवाल हे देखील उपस्थित होते. 


साधारण दीड महिना चालणाऱ्या या शिबिरात लगोरी सारख्या पारंपारिक खेळापासून आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या नेमबाजी सारख्या विविध खेळ प्रकारांचे प्रशिक्षण तंत्रशुद्ध पद्धतीने देण्यात येणार आहे. साधारणता दीडशेपेक्षा अधिक प्रशिक्षणार्थींचा सहभाग या शिबिरात असणार आहे. यानिमित्ताने रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ यांनी अशा शिबिरातून प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींमधून उद्याचे राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू निर्माण व्हावेत याच उद्देशाने हे आयोजन असल्याचे आपल्या प्रस्ताविकात सांगितले. 


महाराष्ट्र शासनाकडून मिळणाऱ्या क्रीडा सुविधांचा फायदा तळागाळातल्या खेळाडूंना व्हावा आणि त्या माध्यमातून उद्या खेळाडूंना प्रत्येक क्षेत्रात चमकण्याची संधी मिळावी असा आशावाद व्यक्त करतांना बरेच वर्षांपासून बंद स्थितीत असलेल्या या क्रीडा संकुलाला नवीन झळाळी प्राप्त होईल, असे मनोगत व्यक्त करीत अप्पर पोलिस अधीक्षक रायगड अभिजीत शिवथारे यांनी प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या. 



शिक्षणासोबत खेळाची जोडणी अत्यंत असणे आजच्या स्पर्धेच्या युगात गरजेचे आहे असे सांगताना खेळांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राविण्य प्राप्त खेळाडूंना गुण पत्रिकेत बोनस गुणांची जोड मिळत असल्याने अशा शिबिरांचे आयोजन ही विद्यार्थ्यांना मिळाली सुवर्णसंधी आहे, असे प्रतिपादन रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी (माध्य) महारुद्र नाळे यांनी केले. 


हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर, सामाजिक कार्यकर्ते रिकी अगरवाल, पत्रकार धनजंय कवठेकर आदी मान्यवर उपस्थित होते. तर या शिबिराच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रशिक्षक


यतीराज पाटील, तपस्वी गोंधळी, संदीप गुरव, देवीदास पाटील, भरत गुरव, पुरुषोत्तम पिंगळे, संतोष जाधव, नागेश शिंदे, वीरेंद्र पवार, माधवी पवार, आदी लाड, तुशांत मढवी, सिद्धार्थ पाटील, प्रियंका गुंजाळ, दिव्या मोकल यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. प्रशिक्षक यतीराज पाटील यांनी आभार तर जगदीश मरागजे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. नेमबाजी, कराटे, लाठी काठी, लगोरी सारख्या विविध खेळांची प्रात्यक्षिके झाली तर मान्यवरांनी बॅडमिंटन खेळून खेळाडूंना प्रोत्साहित केले.

Tuesday, May 6, 2025

सहज सेवा फाऊंडेशनची स्लो सायकल स्पर्धा उत्साहात

 


                

* सहज सेवा फाऊंडेशनच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमात लहानमोठ्या सायकलस्वारांनी लुटला मनमुराद आनंद


खोपोली / मानसी कांबळे :- सहज सेवा फाऊंडेशन सातत्याने सेवाभावी उपक्रम राबवित असते. यातील एक आगळावेगळा उपक्रम म्हणजे स्लो सायकल स्पर्धा (सावकाश सायकल चालविणे स्पर्धा) 4 मे 2025 रोजी खोपोली येथील पंत मोरेश्वर पाटणकर क्रीडांगणावर उत्साहात पार पडली.


या स्पर्धा दोन वयोगटात घेण्यात आली. पहिला गट 15 वर्षांखालील स्पर्धकांचा तर दुसरा 15 वर्षांवरील म्हणजेच खुला वयोगट. विशेष म्हणजे लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला. या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्वांना संस्थेतर्फे सहभाग प्रमाणपत्र तसेच प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या स्पर्धकांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले.

     

15 वर्षांखालील वयोगटात प्रथम क्रमांक देवर्ष गुरव, द्वितीय क्रमांक आरुष साळुंखे तर तृतीय क्रमांक निहारीका जांभळे हिने पटकावला. तसेच खुल्या वयोगटामध्ये प्रथम क्रमांक देव बांद्रे, द्वितीय क्रमांक युवराज साळुंखे तर तृतीय क्रमांक संदीप दुबे यांनी पटकाविला.


या स्पर्धेचे सूत्रसंचालन तुषार धुमाळ यांनी केले तर सहभागी झालेल्या स्पर्धेकांना सहज सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉं. शेखर जांभळे, प्रकल्प प्रमुख कीर्ती ओसवाल, नारायण खेडकर, सचिव अखिलेश पाटील, खजिनदार संतोष गायकर, सहज सेवा महिला अध्यक्षा निलम पाटील, तालुका प्रमुख मोहन केदार, मीनल गायकर, मार्गदर्शक राजेंद्र फक्के, दिवेश राठोड, वेदा साखरे, भास्कर लांडगे, मेघा वाडकर, विनोद राजपूत, आदित्य वळवणकर, माधवी दर्गे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पंच म्हणून नारायण खेडकर यांनी काम पाहिले.


आयुष्याच्या धावपळीत पुढे जाण्यासाठी नेहमीच धडपड सुरु असते. परंतु, शांत डोक्याने व कल्पकतेने मागे राहूनही यशस्वी होता येते. हा संदेश जणू स्लो सायकलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन प्रकल्प प्रमुख कीर्ती ओसवाल यांनी केले आहे.

Monday, May 5, 2025

खालापुरातील शिक्षक नक्षलवादी

 



* "लॅपटॉप" नक्षलवादी अखेर ठाण्यात जेरबंद

* न्यायालयाकडून 13 मेपर्यंत पोलिस कोठडी

* सहा वर्षांपासून शिक्षकी वेशात होता लपून  


खालापूर / जतिन मोरे :- राज्यातील दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) मोठी कारवाई करीत नक्षलवाद्यांशी संबंधित गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेला कुख्यात आरोपी प्रशांत जालिंदर कांबळे ऊर्फ लॅपटॉप याला अखेर अटक करण्यात आली आहे. गेल्या 6 ते 7 वर्षांपासून तो रायगड जिल्ह्यातील खोपोली, खालापूर परिसरात शिक्षकाच्या वेशात वास्तव्य करीत होता आणि खालापूर व रायगड पोलिसांना याचा थांगपत्ताच नव्हता. 

            

प्रशांत कांबळे याच्यावर मुंबईतील काळाचौकी पोलिस ठाण्यात 2011 साली भारतीय दंड विधान संहितेतील कलम 387, 419, 465, 467, 468, 120 (ब) तसेच बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम 1967 (संशोधित 2008) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात तो तब्बल 14 गंभीर कलमांखाली आरोपी होता आणि त्यास न्यायालयाने फरार घोषित करीत निरंतर अटक वॉरंट व जाहीरनामा जारी केला होता. 


एसटीएस (ATS) सूत्रांच्या माहितीनुसार, प्रशांत कांबळे हा आदिवासी पाड्यांमध्ये मुलांना शिकविण्याचे ढोंग करीत आपली खरी ओळख लपवित होता. मात्र पुणे एटीएस (ATS) युनिटने अत्यंत गुप्त पद्धतीने माहिती मिळवून 3 मे रोजी त्याच्यावर सापळा रचून त्याला ताब्यात घेतले आणि 4 मे रोजी अधिकृतपणे अटक केली. आज (5 मे) त्याला मुंबई सेशन कोर्टात हजर करण्यात आले असता, मा. न्यायालयाने त्यास 13 मे 2025 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्ह्याचा तपास सध्या दहशतवाद विरोधी पथक करीत आहे. हा आरोपी वर्षानुवर्षे पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकत शांत जीवन जगत होता, परंतु शेवटी कायद्याच्या हाताला चुकवणे अशक्यच, हे या अटकेने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या अटकेमुळे नक्षलवादी हालचालींना मोठा झटका बसला असून, आणखी काही आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी तपासाचे चक्र वेगाने फिरवले आहे.

Sunday, May 4, 2025

12 मेला साप्ताहीक खालापूर वार्ताचा 5 वा वर्धापन दिन

 



* न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन पदाधिकारी नियुक्तीपत्र वितरण

* महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुधीर माने यांचा अभिष्टचिंतन सोहळा

* खालापूर तालुक्यातील मान्यवरांचा पुरस्कार देवून सत्कार होणार


खालापूर / मानसी कांबळे :- अन्याय, अत्याचाराविरोधात पेटून उठणाऱ्या...रंजल्या गांजल्यांचा बुलंद आवाज असलेल्या साप्ताहीक खालापूर वार्ताचा 5 वा वर्धापन दिन सोहळा 12 मे 2025 रोजी वावोशी फाटा येथील हरीओम मंगल कार्यालयात साजरा होणार आहे. यावेळी न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन पदाधिकारी नियुक्तीपत्र वितरण, साप्ताहीक खालापूर वार्ताचे मुख्य संपादक तथा न्यूज जर्नलिस्ट असोसिएशन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुधीर गोविंद माने यांचा अभिष्टचिंतन सोहळा तसेच खालापुर तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार सन्मान सोहळा कार्यक्रमाचे उद्घाटक कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर (शेठ) सदाशिव थोरवे व कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय संयोजक डॉं. शरीफ बागवान यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. 


सा. खालापुर वार्ता हे साप्ताहिक कर्जत व खालापुर तालुक्यातील उपेक्षित समाज घटक, शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, अनधिकृत बांधकाम तसेच शासकीय कार्यालयातील गैरव्यवहार असे अनेक प्रश्न शासन दरबारी मांडून लोकांना न्याय देण्याचे काम मागील 5 वर्षापासून करीत आहे. तसेच न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन ही पत्रकारांसाठी काम करणारी पत्रकार संघटना आहे. साप्ताहिक खालापुर वार्ता तसेच मुख्य संपादक व न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुधीर गोविंद माने यांच्या यशस्वी वाटचालीला शुभेच्छा देण्यासाठी कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर (शेठ) सदाशिव थोरवे, न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय संयोजक डॉं. शरीफ बागवान, खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना नेते डॉं. सुनिल गोटीराम पाटील, राजिप माजी उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुधाकर परशुराम घारे, माजी आमदार सुरेश लाड, शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार गोविंद बैलमारे, शिवसेना रायगड महिला प्रमुख सुप्रिया साळुंखे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष अंकित साखरे, शिवसेना रायगड उपमहिला प्रमुख निलम चोरगे, खोनप माजी शिक्षण व आरोग्य सभापती मधुकर किसन दळवी, शिवसेना खालापूर शहर प्रमुख पद्माकर पाटील, खालापुर नगर पंचायत नगराध्यक्षा रोशना मोडवे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी खोपोली शहर अध्यक्ष अतुल पाटील, खोनप माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, शिवसेना खालापुर तालुका प्रमुख (उबाठा) एकनाथ पिंगळे, शिवसेना खालापुर शहर प्रमुख (उबाठा) संभाजी पांडुरंग पाटील, न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी, राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्वे, राष्ट्रीय मार्गदर्शक प्रविण कोळआपटे, राष्ट्रीय संयोजक डॉं. शेखर जांभळे, राष्ट्रीय महासचिव मानसी गणेश कांबळे, राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख तुषार कांबळे, महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष इशिका शेलार, रायगड जिल्हाध्यक्ष राजेंद्र शिवाजी जाधव, कायदेशीर सल्लगार धनंजय शेट्टे, साप्ताहिक महाराष्ट्राची भुमी संपादक डॉं. रविंद्र विष्णू जाधव आदी उपस्थित राहतील.

महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावरील फुले चित्रपट टॅक्स फ्री करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

 


मुंबई / प्रतिनिधी :- महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावरील 'फुले' सिनेमा हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक सिनेमा आहे. देशभरात नव्या पिढीला महात्मा फुले यांच्या जीवनकार्याची माहिती मिळणे आवश्यक आहे. जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत, त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या क्रांतीचा इतिहास नव्या पिढीला समजला पाहिजे. त्यासाठी फुले चित्रपट हा देशभरात टॅक्स फ्री झाला पाहिजे, अशी आपली मागणी असून त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.


अंधेरी येथे ना. रामदास आठवले यांच्यासाठी फुले सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग दाखविण्यात आले. फुले चित्रपट पाहिल्यानंतर ना. रामदास आठवले यांनी हा चित्रपट देशभरात पोहोचला पाहिजे, त्यासाठी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित व्हावा आणि फुले या चित्रपटाला करमुक्त करावे, अशी आपली मागणी असून त्या बाबतचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असल्याची माहिती ना. रामदास आठवले यांनी दिली.


यावेळी फुले चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन आणि निर्माते रितेश कुडेचा, रिपाइंचे शैलेश भाई शुक्ला, जतीन भुट्टा, प्रकाश जाधव आदी उपस्थित होते.


महात्मा फुले यांच्या जीवनावरील फुले हा सिनेमा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती भवनात दाखविण्यात यावा अशी विनंती दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी ना. रामदास आठवले यांना केली. त्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन ना. रामदास आठवले यांनी दिले. फुले सिनेमा सर्व सिनेमागृहात दाखविण्यात यावा. सर्वांनी फुले सिनेमा जरूर पहावा, असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी यावेळी केले. फुले चित्रपटात प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांनी मुख्य भूमिका केलेली आहे. फुले सिनेमामध्ये महात्मा फुले यांचे जीवनकार्य त्यांचे क्रांतिकारी योगदान अत्यंत उत्कृष्टपणे दाखविण्यात आले आहे, असे कौतुक ना. रामदास आठवले यांनी केले.

Thursday, May 1, 2025

रात्रीस कार्डधारकांचा 'अंगठा' घेण्याचा प्रताप !

 



* सुभाषनगरच्या रेशन दुकानदाराचा मनमानी कारभार

* हमालांच्या संपामुळे उशिरा धान्य आले - तहसिलदार

* तहसिलदार, कोकण आयुक्त यांच्याकडून दखल

* तालुका पुरवठा अधिकारी मनोज पवार कोमात ? 


खोपीली / प्रतिनिधी :- केंद्र व राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, तहसील कार्यालय, पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्था आदी विविध उपक्रम राबवित नागरीकांचे 'भले' करण्यासाठी प्रयत्नशील आहे. भारत सरकार नागरिकांसाठी अनेक योजना राबवते. देशातील गरीबातील गरीब नागरीकाला दोन वेळच्या जेवणाची चिंता भासू नये, यासाठी स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून धान्य वितरण केले जाते. या सरकारी योजनांचा लाभ देशातील कोट्यवधी नागरिकांना मिळत आहे, परंतु सुभाषनगर परिसरात रेशन दुकानदाराचा मनमानी कारभार सुरु असल्याचे दिसुन येत आहे. 30 एप्रिल रोजी सायंकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत थम्ब (अंगठा) घेण्यासाठी नागरिकांची रेशन दुकानात मोठी गर्दी झाली होती. सुत्रांच्या माहितीनुसार धान्य वाटप देखील रेशन दुकानदाराच्या सोयीनुसार रविवार किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी व सोयीच्या वेळेत केले जाते. काही जणांचा अंगठा (थम्ब) येत नसल्याने त्यांना धान्य दिले जात नाही. यासोबतच अरेरावी देखील केली जात असल्याच्या तक्रारी वारंवार नागरीक करीत असले तरी तालुका पुरवठा अधिकारी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत असतांना पुरवठा निरीक्षक व अधिकारी यांचे दुर्लक्ष करण्याचे कारण काय ? असा प्रश्न नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे. 


अंगठा (थम्ब) घेण्यासाठी अन्न पुरवठा विभागाने महिना अखेरपर्यंत कालावधी दिलेला असतो. परंतु नागरिकांना त्यावेळी सर्वर डाऊन आहे, लाईट (वीज) बंद आहे, अशी विविध कारणे देवून टाळले जाते. यापूर्वी देखील अनेक वेळा सायंकाळी 6 नंतर धान्य वितरण करण्यात आले आहे. रेशन दुकानदाराच्या दुकानाबाहेर दुकान सुरू व बंद होण्याचे कोणतेच वेळापत्रक नाही. वेळ मिळेल तेव्हा अंगठा घेणे, रेशन वितरीत करणे असे मनमानी काम सुरू असतांना पुरवठा निरीक्षक, तपासणी अधिकारी, नायब तहसिलदार दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. यामागे काही 'अर्थ' लपला आहे का ? रेशन दुकानदार शासनाचे काम करतो की खासगी ? नागरीकांना रेशन वाटप करणे म्हणजे नागरीकांवर उपकार आहेत का ? रेशन दुकानदारांसाठी काही नियमावली आहे की नाही ? असेल तर या नियमावलीची अमंलबजावणी होत आहे की नाही, हे पाहण्याची जबाबदारी नेमकी कुणाची? की आंधळा दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय, अशी अवस्था तर नाही ना ? असा प्रश्न नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे. 


एप्रिल महिना संपला असून 30 एप्रिल रोजी महिना अखेर असल्याने रेशन दुकानदाराने जागे होत थम्ब (अंगठा) घेण्यासाठी सायंकाळी 6 ते रात्री 11 या वेळेत रेशन दुकान सुरू ठेवले होते. महिन्याभराचा वेळ असूनही रेशनधारकांने थम्ब (अंगठा) का घेतला गेला नाही ? तसेच नागरिकांना धान्य कधी वाटप केले जाते, याची काही कल्पना नसते. रेशन दुकानात धान्य दर, धान्य मिळण्याचे दिनांक, दुकान सुरू व बंद होण्याची वेळ, तक्रार कुठे करायची त्यांचे नाव, पद, नंबर याचे फलक लावण्यात आलेले नाहीत. रेशन दुकानदार थम्ब (अंगठा) घेण्यासाठी आपल्या सोयीनुसार कधीही बोलवू शकतो का ? रेशन दुकानाचा टाईमटेबल नसतो का ? कि दुकानदार आपल्या मर्जीनुसार कधीही दुकान सुरु व बंद करू शकतो ? रेशन दुकानदारांना नियमावली नाही का ? जर गावामध्ये यादी 300 घरांची आहे तर 300 लोकांना रेशन मिळाले की नाही याची पडताळणी धान्य पुरवठा विभाग करीत नाही का ? जे लोक दुकानदाराच्या सोयीनुसार उपलब्ध नसतील त्यांचे धान्य महिनाअखेर पुरवठा विभागाला परत जाते का ? की काळ्या बाजारात ? याचा तपास कौन करणार, याची नोंद कौन ठेवणार की 'हमाम में सब नंगे' अथवा 'चोर चोर मोसेरे भाई' असाच प्रकार रेशन दुकानदार व पुरवठा विभागात सुरू आहे ? असा प्रश्न सुभाषनगर ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.


दरम्यान, या प्रकरणी अनेकांनी पुरवठा अधिकारी, तहसिलदार, प्रातांधिकारी, जिल्हाधिकारी व कोकण आयुक्त यांच्याकडे तक्रार केली असून कोकण विभागीय आयुक्त डॉं. विजय सूर्यवंशी यांनी या प्रकरणी लक्ष घालण्याचे व योग्य ती कार्रवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. तर खालापूर तहसिलदार अभय चव्हाण म्हणाले की, असे करता येत नाही. पण हमालांचा संप असल्याने या स्वस्त धान्य दुकानाला धान्य काल गेले आहे. त्याचे वितरण आज दुपारपासून चालू होते. कदाचित त्यांनी ते उशिरापर्यंत चालू ठेवले असावे, तरीही मी पाहतो. तर खालापूर तालुका पुरवठा अधिकारी मनोज पवार यांनी पत्रकारांचे फोन घेतले नाहीत तसेच मेसेज पण पाहिले नाहीत. पत्रकारांनी यापूर्वी देखील त्यांच्याकडे नागरीकांच्या व्यथा मांडल्या होत्या पण नायब तहसिलदार (पुरवठा) मनोज पवार यांनी याबाबत कोणतीच कार्रवाई केली नाही. रेशन दुकानदारांबाबत तक्रारी येत असतांना सुध्दा पवार साहेब कार्रवाई करीत नाहीत, याचा नेमका 'अर्थ' काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 


* तक्रारदारांना धमकावले जाते :- सुभाषनगर येथील रेशन दुकानाचा मनमानी कारभार गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. हे रेशन दुकान नागरीकांसाठी अवघड जागेचे दुखणे झाले आहे. याबाबत अनेकांनी नाव न छापण्याच्या अटींवर सांगितले की, तक्रारांना धमकावणे...रेशन न देणे...हाकलून लावणे...हाडहुड करणे, असे अनुभव येत असतात. मोहल्ल्यातील रेशन कार्ड धारकांना तर याचा अनुभव तर नेहमीच येतो. तसेच 'महिला कार्ड' खेळत पुरूष तक्रारदारावर कायदेशीर कार्रवाईची धमकी दिली जाते, असेही काहींनी सांगितले. दुकानदाराच्या मुलाकडून ही अरेरावी केली जाते, असा आरोपही अनेकांनी केला आहे. ऐवढेच नव्हे तर पत्रकारांना सुध्दा दमदाटी करण्यापर्यंत मजल जात असल्याचे समजते. 


तक्रार केली की तक्रारदाराला फोन करायचा किंवा त्याच्या घरी जावून वाद घालायचा...रेशन घ्यायला त्याच्या घरातील कुणी आले तर त्याला दमदाटी करायची...किंवा रेशन न देता हाकलून लावायचे, असे प्रकार घडत असतात. या भागात रेशन कार्ड धारकांमध्ये दहशतीचे वातावरण असल्याने कुणीही तक्रार करीत नाही...केली तर त्यावर पुरवठा विभाग कार्रवाई करीत नाही. तसेच कधी कधी तक्रारदाराची माहिती गुप्त न ठेवता ती दुकानदाराला दिली जात असल्याने भांडणे होतात. 30 एप्रिल रोजी झालेल्या घटनेनंतर एका जेष्ठ नागरिकाने तक्रार केली म्हणून त्यांना फोन करीत रेशन दुकानदार महिलेकडून त्यांची कानउघाडणी करण्यात आली आहे. तक्रारदारावर अनेक आरोप करण्यात आले आहेत, सदर मोबाईल संभाषण व्हायरल झाले आहे. तरी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी या प्रकरणी लक्ष द्यावे व रेशन दुकानदारासह कामात कसूर केल्याबद्दल खालापूर पुरवठा अधिकारी मनोज पवार यांच्यावर देखील कार्रवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. 


* रेशन धारकाला दमदाटी केल्यास दुकान बंद करा :- सुभाषनगर येथील घटना ही नियमबाह्य असून खालापूर तहसिलदार, जिल्हा पुरवठा अधिकारी, रायगड जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. तसेच खोपोली व खालापूर पोलिस तसेच रायगड जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी रेशनबद्दल तक्रार करणाऱ्या तक्रारदाराला दमदाटी करणाऱ्या रेशन दुकानदारावर कार्रवाई करावी. नागरीकांच्या सोयीसाठी ही दुकाने सुरू करण्यात आली आहेत, पण रेशन दुकानदार नागरीकांवर उपकार करीत आहेत, असेच वागतात. तरी सुभाषनगर, खोपोली व खालापूर तालुक्यातील सर्वच रेशन दुकानदारांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन रायगड जिल्हाध्यक्ष राजेंद्र शिवाजी जाधव यांनी केली आहे.