Sunday, May 25, 2025

खोपोलीत पार पडली पाताळगंगा आरती

 


 सहज सेवा फाउंडेशनचा उपक्रम 

महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी आरती


खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली शहराची औद्योगिक तसेच नागरी जीवनाची तहान पाताळगंगा नदीमुळे भागत आहे. आपल्या शहरात लाभलेल्या या वरदानाचे महत्त्व जनमानसात पोहोचविण्यासाठी नवीन संकल्प म्हणून खोपोली येथील गगनगिरी आश्रमासमोरील नदी भोवतालच्या पटांगणात नदीच्या स्वच्छतेबाबत जागरुकता निर्माण होण्यासाठी सहज सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून नदी आरती व पूजन महोत्सव उत्साहात पार पडले. या वेळी नदीचे संवर्धन व स्वच्छता ठेवण्याचा संकल्प करण्यात आला.


खोपोली येथील उगम पावणाऱ्या पाताळगंगा नदीपात्रात अनेक ठिकाणी कचरा टाकण्यात येतो. बऱ्याच ठिकाणी सांडपाणी नदीत सोडले जाते. कंपनीच्या दूषित पाण्यामुळे बारमाही वाहणारी पाताळगंगा नदी प्रदूषित होत चालली आहे. प्रशासनाने जागरूक राहून नदी प्रदूषित होण्यापासून कठोर पावले उचलावीत. वाया जाणाऱ्या पाण्याचे जतन करावे. नदीवर शहराच्या सौंदर्यात भर घालणारे सुशोभिकरण करावे, अशी मागणी सहज सेवा फाऊंडेशनतर्फे करण्यात येत आहे. तसेच जनसामान्यात जागरुकता येण्यासाठी 'आपली नदी, आपली जबाबदारी' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, 24 मे रोजी पाताळगंगा नदी आरती व पूजन महोत्सव उत्साहात पार पडला. त्याचबरोबर नदी घाटावर दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी पूजन करण्यात येईल, असाही संकल्प यावेळी करण्यात आला.


यावेळी नदीकिनारी दिव्यांची आरास करण्यात आली. खोपोली येथील मुक्ताई महिला भजनी मंडळाने सुरेख गीते गाऊन वातावरण भक्तिमय केले तर आनंद शाळेतील शिक्षिका राधिका खानवलकर व हभप सुधाकर पाटील यांनी पातळगंगा नदी प्रती तयार केलेल्या आरतीबद्दल सहज सेवा फाउंडेशनतर्फे सन्मान करण्यात आला. यावेळी उपक्रम प्रमुख सीमा त्रिपाठी, राजेंद्र फक्के, डॉं. सुनील पाटील, सहज सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉं. शेखर जांभळे, खालापूर तालुका प्रमुख मोहन केदार यांनी आपले विचार व्यक्त केले. या उपक्रमास विरेश्वर ग्रामस्थ मंडळ, शक्ती सेवा श्रद्धा फाउंडेशन, शिळफाटा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष अमोल शहाणे, राहुल जाधव, दिवेश राठोड, वेदा साखरे, विनोद राजपूत, संदीप दुबे, अनिता शहा, अपर्णा साठे, जगदीश जाखोटीया, मंजु उपाध्याय, नीरज राय, रुपेश देशमुख यांचे विशेष सहकार्य लाभले. या उपक्रमास समाजातील विविध क्षेत्रातील मंडळींनी आपले योगदान देऊन उपस्थित राहिल्याबद्दल सहज सेवा फाउंडेशनच्या महिला अध्यक्षा निलम पाटील, सचिव अखिलेश पाटील, खजिनदार संतोष गायकर यांनी आभार मानले.


0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home