खोपोली शहरातील समस्यांबाबत प्रतिकात्मक अंत्ययात्रा
* खोपोली खालापूर संघर्ष समितीचा पुढाकार
खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली शहरात समस्यांचे पेव फुटलेले आहे. नागरी समस्या सोडविण्यास खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सपशेल अपयशी ठरले आहेत. खोपोली खालापूर संघर्ष समितीच्या माध्यमातून नेहमीच प्रशासनाकडे विनम्र पाठपुरावा होत असतो, परंतु बऱ्याच वेळा आश्वासन देऊन नंतर पाठ फिरविली जाते असा अनुभव समितीस येत आहे. गेल्या काही महिन्यात शहराची अवस्था दयनीय झालेली आहे. पाण्याची समस्या, रस्त्याच्या समस्या, गटाराच्या समस्या, आरोग्याच्या समस्या, वाढत्या अनधिकृत बांधकामाच्या समस्या, वाहतूक समस्या, घंटागाडीची समस्या, नदी प्रदूषण समस्या, पार्किंग समस्या, गार्डनची समस्या, मुलांसाठी स्विमिंग पूल, शहरातील वृक्षतोड यासारख्या समस्या सोडविण्यात खोपोली नगर परिषद प्रशासन अपयशी ठरले आहे.
वेळेत कर न भरल्यास दंडात्मक कारवाई करणारे प्रशासन सुविधा देण्यात कमी पडत आहे. नागरिक कर भरतात तर त्यांना सुविधा मिळणे हा हक्क आहे. नगर परिषदेने नागरिकांची सनद म्हणून तक्रार आल्यानंतर कार्यवाही करताना निश्चित कालावधीत पूर्ण करीत नसल्याने त्या काळात ते काम न झाल्यास कर्तव्यपूर्ती न केल्याबद्दल त्या आस्थापनेस दंड म्हणून नागरिकांना आर्थिक सुट देण्यात यावी अशीही मागणी संघर्ष समितीने केलेली आहे.
प्रशासनाच्या या अपयशाने शहर जणू मृत्यू शय्येवर आहे, याचा निषेध म्हणून प्रशासनाच्या कामांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा मंगळवार, 27 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता लोहाणा समाज हॉलमार्गे खोपोली बाजारपेठ ते खोपोली नगर परिषद येथपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. यावेळी सर्व असुविधांचे निवेदन देण्यात येणार असून नगरपालिकेने या समस्यांसंदर्भात लेखी भूमिका स्पष्ट करून योग्य ती कारवाई न केल्यास लवकरच खोपोलीतील असुविधांचे प्रदर्शन भरवुन आंदोलन करण्यात येईल, असेही खोपोली खालापूर संघर्ष समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
नागरिकांच्या प्रश्नावर खोपोली खालापूर संघर्ष समिती प्रभावीपणे काम करीत असून नागरिकांच्या भावनांचा कडेलोट होत असल्याने वेळेत होत नसलेल्या कामांना मृत स्वरूपाचा दाखला देऊन प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात येत असुन नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता या मोर्चाने नक्कीच शहरात सुधारणा होतील. यातून मार्ग न निघाल्यास पुढची दिशा ठरवून निर्णय घेणार असल्याचे ऍंड. मीना बाम, ऍंड. शैलेश पालांडे, डॉं. शेखर जांभळे, मोहन केदार, उबेद पटेल, आशपाक लोगडे, नरेंद्र हर्डीकर यांनी सांगितले आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home