आंचल दलाल रायगडच्या नव्या पोलिस अधीक्षक
पोलिस अधीक्षक घार्गे यांची अहिल्यानगरला बदली
कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्गच्या एसपी देखील बदलले
राज्य पोलिस दलातील 22 अधिकाऱ्यांची खांदेपालट
खालापुर/ प्रतिनिधी :- राज्य पोलिस दलातील 22 पोलिस अधीक्षक आणि पोलिस उपायुक्त पदांवरील बदल्या करण्यात आल्या आहेत. कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे पोलिस दलात उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. साताऱ्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलिस दलात उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. रायगड पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची अचानक बदली करण्यात आल्याने भूवया उंचावल्या आहेत. रायगड पोलिस अधीक्षकपदी पुण्याच्या पोलिस बल गट क्रमांक 1 मधील आचल दलाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रायगडचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची अहिल्यानगर पोलिस अधीक्षकपदी निवड करण्यात आली आहे.
लोकाभिमुख आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सोमनाथ घार्गे ओळखले जायचे. आपल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी पोलिस दलाच्या अधुनिकीकरणावर मोठा भर दिला. जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना स्मार्ट पोलिस ठाणे बनविण्यासाठी त्यांनी व्यापक प्रयत्न केले. पोलिसांना अत्याधुनिक वाहने उपलब्ध व्हावीत यासाठी प्रयत्न केले. पोलिस प्रशासनाला लोकाभिमुख करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शिस्तप्रीय आणि मितभाषी अधिकारी म्हणून ते ओळखले गेले. त्यांच्या कार्यकाळात सिसीटीएनएस प्रणालीत रायगड पोलिसांची कामगिरी सातत्याने अव्वल राहिली.
आंचल दलाल या रायगडच्या नव्या पोलिस अधीक्षक असणार आहेत. पुण्यातील राज्य राखीव पोलिस दलाच्या समादेशक म्हणून त्या कार्यरत होत्या. त्या रायगड पोलिस दलाची नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी असणार आहेत. त्या 2018 वर्षीच्या भरतीतील पोलिस सेवेतील अधिकारी आहे. त्यांनी यापुर्वी सातारा जिल्ह्यात अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे.
दरम्यान, धाराशिवचे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची देखील बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सांगली येथील अप्पर पोलिस अधीक्षक रितू खोकर यांची धाराशिव जिल्हा पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. नवीन जिल्हा पोलिस अधीक्षक रितू खोकर यांना तुळजापूर ड्रग्ज प्रकरण आणि जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीचे आव्हान असणार आहे. माजी जिल्हा पोलिस अधीक्षक संजय जाधव यांना नवीन नियुक्ती मिळालेली नाही. स्वतंत्रपणे त्यांचा नियुक्ती देण्यात येणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home