रात्रीस कार्डधारकांचा 'अंगठा' घेण्याचा प्रताप !
* सुभाषनगरच्या रेशन दुकानदाराचा मनमानी कारभार
* हमालांच्या संपामुळे उशिरा धान्य आले - तहसिलदार
* तहसिलदार, कोकण आयुक्त यांच्याकडून दखल
* तालुका पुरवठा अधिकारी मनोज पवार कोमात ?
खोपीली / प्रतिनिधी :- केंद्र व राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, तहसील कार्यालय, पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्था आदी विविध उपक्रम राबवित नागरीकांचे 'भले' करण्यासाठी प्रयत्नशील आहे. भारत सरकार नागरिकांसाठी अनेक योजना राबवते. देशातील गरीबातील गरीब नागरीकाला दोन वेळच्या जेवणाची चिंता भासू नये, यासाठी स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून धान्य वितरण केले जाते. या सरकारी योजनांचा लाभ देशातील कोट्यवधी नागरिकांना मिळत आहे, परंतु सुभाषनगर परिसरात रेशन दुकानदाराचा मनमानी कारभार सुरु असल्याचे दिसुन येत आहे. 30 एप्रिल रोजी सायंकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत थम्ब (अंगठा) घेण्यासाठी नागरिकांची रेशन दुकानात मोठी गर्दी झाली होती. सुत्रांच्या माहितीनुसार धान्य वाटप देखील रेशन दुकानदाराच्या सोयीनुसार रविवार किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी व सोयीच्या वेळेत केले जाते. काही जणांचा अंगठा (थम्ब) येत नसल्याने त्यांना धान्य दिले जात नाही. यासोबतच अरेरावी देखील केली जात असल्याच्या तक्रारी वारंवार नागरीक करीत असले तरी तालुका पुरवठा अधिकारी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत असतांना पुरवठा निरीक्षक व अधिकारी यांचे दुर्लक्ष करण्याचे कारण काय ? असा प्रश्न नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे.
अंगठा (थम्ब) घेण्यासाठी अन्न पुरवठा विभागाने महिना अखेरपर्यंत कालावधी दिलेला असतो. परंतु नागरिकांना त्यावेळी सर्वर डाऊन आहे, लाईट (वीज) बंद आहे, अशी विविध कारणे देवून टाळले जाते. यापूर्वी देखील अनेक वेळा सायंकाळी 6 नंतर धान्य वितरण करण्यात आले आहे. रेशन दुकानदाराच्या दुकानाबाहेर दुकान सुरू व बंद होण्याचे कोणतेच वेळापत्रक नाही. वेळ मिळेल तेव्हा अंगठा घेणे, रेशन वितरीत करणे असे मनमानी काम सुरू असतांना पुरवठा निरीक्षक, तपासणी अधिकारी, नायब तहसिलदार दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. यामागे काही 'अर्थ' लपला आहे का ? रेशन दुकानदार शासनाचे काम करतो की खासगी ? नागरीकांना रेशन वाटप करणे म्हणजे नागरीकांवर उपकार आहेत का ? रेशन दुकानदारांसाठी काही नियमावली आहे की नाही ? असेल तर या नियमावलीची अमंलबजावणी होत आहे की नाही, हे पाहण्याची जबाबदारी नेमकी कुणाची? की आंधळा दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय, अशी अवस्था तर नाही ना ? असा प्रश्न नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे.
एप्रिल महिना संपला असून 30 एप्रिल रोजी महिना अखेर असल्याने रेशन दुकानदाराने जागे होत थम्ब (अंगठा) घेण्यासाठी सायंकाळी 6 ते रात्री 11 या वेळेत रेशन दुकान सुरू ठेवले होते. महिन्याभराचा वेळ असूनही रेशनधारकांने थम्ब (अंगठा) का घेतला गेला नाही ? तसेच नागरिकांना धान्य कधी वाटप केले जाते, याची काही कल्पना नसते. रेशन दुकानात धान्य दर, धान्य मिळण्याचे दिनांक, दुकान सुरू व बंद होण्याची वेळ, तक्रार कुठे करायची त्यांचे नाव, पद, नंबर याचे फलक लावण्यात आलेले नाहीत. रेशन दुकानदार थम्ब (अंगठा) घेण्यासाठी आपल्या सोयीनुसार कधीही बोलवू शकतो का ? रेशन दुकानाचा टाईमटेबल नसतो का ? कि दुकानदार आपल्या मर्जीनुसार कधीही दुकान सुरु व बंद करू शकतो ? रेशन दुकानदारांना नियमावली नाही का ? जर गावामध्ये यादी 300 घरांची आहे तर 300 लोकांना रेशन मिळाले की नाही याची पडताळणी धान्य पुरवठा विभाग करीत नाही का ? जे लोक दुकानदाराच्या सोयीनुसार उपलब्ध नसतील त्यांचे धान्य महिनाअखेर पुरवठा विभागाला परत जाते का ? की काळ्या बाजारात ? याचा तपास कौन करणार, याची नोंद कौन ठेवणार की 'हमाम में सब नंगे' अथवा 'चोर चोर मोसेरे भाई' असाच प्रकार रेशन दुकानदार व पुरवठा विभागात सुरू आहे ? असा प्रश्न सुभाषनगर ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणी अनेकांनी पुरवठा अधिकारी, तहसिलदार, प्रातांधिकारी, जिल्हाधिकारी व कोकण आयुक्त यांच्याकडे तक्रार केली असून कोकण विभागीय आयुक्त डॉं. विजय सूर्यवंशी यांनी या प्रकरणी लक्ष घालण्याचे व योग्य ती कार्रवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. तर खालापूर तहसिलदार अभय चव्हाण म्हणाले की, असे करता येत नाही. पण हमालांचा संप असल्याने या स्वस्त धान्य दुकानाला धान्य काल गेले आहे. त्याचे वितरण आज दुपारपासून चालू होते. कदाचित त्यांनी ते उशिरापर्यंत चालू ठेवले असावे, तरीही मी पाहतो. तर खालापूर तालुका पुरवठा अधिकारी मनोज पवार यांनी पत्रकारांचे फोन घेतले नाहीत तसेच मेसेज पण पाहिले नाहीत. पत्रकारांनी यापूर्वी देखील त्यांच्याकडे नागरीकांच्या व्यथा मांडल्या होत्या पण नायब तहसिलदार (पुरवठा) मनोज पवार यांनी याबाबत कोणतीच कार्रवाई केली नाही. रेशन दुकानदारांबाबत तक्रारी येत असतांना सुध्दा पवार साहेब कार्रवाई करीत नाहीत, याचा नेमका 'अर्थ' काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
* तक्रारदारांना धमकावले जाते :- सुभाषनगर येथील रेशन दुकानाचा मनमानी कारभार गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. हे रेशन दुकान नागरीकांसाठी अवघड जागेचे दुखणे झाले आहे. याबाबत अनेकांनी नाव न छापण्याच्या अटींवर सांगितले की, तक्रारांना धमकावणे...रेशन न देणे...हाकलून लावणे...हाडहुड करणे, असे अनुभव येत असतात. मोहल्ल्यातील रेशन कार्ड धारकांना तर याचा अनुभव तर नेहमीच येतो. तसेच 'महिला कार्ड' खेळत पुरूष तक्रारदारावर कायदेशीर कार्रवाईची धमकी दिली जाते, असेही काहींनी सांगितले. दुकानदाराच्या मुलाकडून ही अरेरावी केली जाते, असा आरोपही अनेकांनी केला आहे. ऐवढेच नव्हे तर पत्रकारांना सुध्दा दमदाटी करण्यापर्यंत मजल जात असल्याचे समजते.
तक्रार केली की तक्रारदाराला फोन करायचा किंवा त्याच्या घरी जावून वाद घालायचा...रेशन घ्यायला त्याच्या घरातील कुणी आले तर त्याला दमदाटी करायची...किंवा रेशन न देता हाकलून लावायचे, असे प्रकार घडत असतात. या भागात रेशन कार्ड धारकांमध्ये दहशतीचे वातावरण असल्याने कुणीही तक्रार करीत नाही...केली तर त्यावर पुरवठा विभाग कार्रवाई करीत नाही. तसेच कधी कधी तक्रारदाराची माहिती गुप्त न ठेवता ती दुकानदाराला दिली जात असल्याने भांडणे होतात. 30 एप्रिल रोजी झालेल्या घटनेनंतर एका जेष्ठ नागरिकाने तक्रार केली म्हणून त्यांना फोन करीत रेशन दुकानदार महिलेकडून त्यांची कानउघाडणी करण्यात आली आहे. तक्रारदारावर अनेक आरोप करण्यात आले आहेत, सदर मोबाईल संभाषण व्हायरल झाले आहे. तरी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी या प्रकरणी लक्ष द्यावे व रेशन दुकानदारासह कामात कसूर केल्याबद्दल खालापूर पुरवठा अधिकारी मनोज पवार यांच्यावर देखील कार्रवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
* रेशन धारकाला दमदाटी केल्यास दुकान बंद करा :- सुभाषनगर येथील घटना ही नियमबाह्य असून खालापूर तहसिलदार, जिल्हा पुरवठा अधिकारी, रायगड जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. तसेच खोपोली व खालापूर पोलिस तसेच रायगड जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी रेशनबद्दल तक्रार करणाऱ्या तक्रारदाराला दमदाटी करणाऱ्या रेशन दुकानदारावर कार्रवाई करावी. नागरीकांच्या सोयीसाठी ही दुकाने सुरू करण्यात आली आहेत, पण रेशन दुकानदार नागरीकांवर उपकार करीत आहेत, असेच वागतात. तरी सुभाषनगर, खोपोली व खालापूर तालुक्यातील सर्वच रेशन दुकानदारांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन रायगड जिल्हाध्यक्ष राजेंद्र शिवाजी जाधव यांनी केली आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home