Tuesday, September 9, 2025

गुन्हेगारांना शोधुन नाही तर खोदुन काढले

 


खोपोली पोलिसांची प्रशंसनीय अशी मोठी चमकदार कामगिरी. 

खालापुर/सुधीर देशमुख :– खोपोली पोलिस स्टेशन गुन्हे शोध पथकाने कौशल्यपूर्ण तपास करत केवळ एका महिन्याच्या आत तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल १३ लाख ७२ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात १७ तोळे सोने व १२५० ग्रॅम चांदीचा समावेश आहे.

दिनांक ५ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे १.३० ते सकाळी ८ या वेळेत खोपोली शिळफाटा येथील डी.सी. नगरमधील जगदीश इंदरमल परमार यांच्या राहत्या घरात चोरी झाली होती. अज्ञात चोरट्यांनी कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले होते. सदर चोरीची किंमत तब्बल १२ लाख ७३ हजार रुपये इतकी होती. फिर्यादी परमार यांनी दुपारी ४.५६ वाजता खोपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

या गंभीर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई अभिजीत व्हरांबळ यांच्या पथकाने सुरू केला. रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करून कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही. त्यानंतर पोलिसांनी खोपोली, खालापूर, लोणावळा, खंडाळा, कोंढवा आणि कुसगाव टोलनाका परिसरातील सुमारे १५० सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये आरोपींनी वापरलेली स्विफ्ट डिझायर कार (एमएच-१२-वाईएच-१२७९) आढळून आली. चौकशीत ही कार "मातोश्री सेल्फ ड्राईव्ह" या कंपनीमार्फत आरोपी योगेश देवराम गोयकर याच्याकडे दिल्याचे निष्पन्न झाले. पुढील तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला.

पोलिसांनी विशेष मोहिम राबवून खालील आरोपींना ताब्यात घेतले :

१) विशाल दत्तात्रेय तांदळे (२९, रा. मंचर, पुणे)

२) योगेश उर्फ पप्पू देवराम गोयकर (२९, रा. कात्रज-कोंढवा रोड, पुणे)

३) गणेश चंद्रकांत माळवे (३५, रा. यवत, पुणे)

या तिघांकडून गुन्ह्यातील शंभर टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये ९.५४ लाखांचे सोन्याचे दागिने, २.३२ लाखांचे सोन्याचे हार, चैन व अंगठ्या तसेच ५७ हजारांचे चांदीचे दागिने असा मोठा ऐवज आहे.

आरोपी योगेश गोयकर हा पुण्यातील कोंढवा पोलिस ठाण्यातील एका अन्य गुन्ह्यात (गु.र.नं.४९२/२०२५)ही पाहिजे असल्याचे समोर आले असून त्याचा ताबा कोंढवा पोलिसांना देण्यात येणार आहे. दरम्यान, या गुन्ह्यात सहभागी असलेले अन्य आरोपी शाहू कोकरे व महेश मंगळवेढेकर यांचा शोध सुरू आहे.

ही कारवाई रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक सौ. आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. अभीजीत शिवथरे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विशाल नेहूल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. खोपोली पोलिस निरीक्षक सचिन हिरे, पोसई अभिजीत व्हरांबळ व त्यांच्या पथकातील अमित सावंत, संदीप चव्हाण, रामा मासाळ, किरण देवकते, अमोल राठोड, समीर पवार, प्रणित कळमकर आणि आकाश डोंगरे यांनी ही कामगिरी केली.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home