कर्जत पोलिसांची मोठी कामगिरी
राजस्थानातून इनोव्हा कार सह चोरट्यांना अटक, चोरीची कार हस्तगत
कर्जत/नरेश जाधव :- कर्जत शहरातील इनोव्हा कार चोरी प्रकरणाचा यशस्वी तपास करत कर्जत पोलिसांनी दोन सराईत व कुख्यात आरोपींना राजस्थान येथून अटक केली आहे. या कामगिरीदरम्यान चोरीस गेलेली इनोव्हा क्रिस्टा कार तसेच गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर कार जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. या बाबत आज दि,४ सप्टेंबर २०२५ रोजी कर्जत पोलिस ठाण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते .
कर्जत येथील रहिवासी सद्दाम अश्फाक मिस्त्री यांच्या मालकीची सुमारे १० लाख रुपये किंमतीची इनोव्हा कार (क्रमांक MH-46-BF-0088) ही कार अनोळखी चोरट्यांनी दि. २१ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १ ते २ च्या दरम्यान छत्रपती संभाजी महाराज चौकातील त्यांच्या शोरुमसमोरून चोरून नेली होती. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
वरिष्ठ पोलीस अधीकारी मा. आँचल दलाल (पोलीस अधीक्षक, रायगड), मा. अभिजीत शिवथरे (अपर पोलीस अधीक्षक, रायगड) व मा. राहुल गायकवाड (उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदिप भोसले यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. सपोनि. राहुल वरोटे, पोसई सुशांत वरक आणि गुन्हे प्रगटीकरण पथकाने अविरत मेहनत घेऊन कर्जत, खालापूर, खोपोली, नेरळ परिसरातील असंख्य सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक तपास व मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार तपास पथक राजस्थानला रवाना करण्यात आले
सपोनि. राहुल वरोटे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने राजस्थानातील बाडमेर व जालौर जिल्ह्यात छाननी करत दोन आरोपींना अटक करण्यात यश मिळवले. अटक करण्यात आलेले आरोपी :
ओमप्रकाश सवाईराम बिश्नोई (वय ३४, रा. बाडमेर, राजस्थान) अशोक कुमार ईसराराम बिश्नोई (वय ४७, रा. जालौर,(राजस्थान)
या दोघांच्या ताब्यातून चोरीची इनोव्हा क्रिस्टा व गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर कार जप्त करण्यात आली. आरोपी हे सराईत असून राजस्थान राज्यात खुनाचा प्रयत्न, चोरी, फसवणूक, खंडणी, बनावट कागदपत्रे, गंभीर दुखापत, बलात्कार, शस्त्रास्त्र कायदा व अंमली पदार्थविरोधी कायदा अशा तब्बल १७ गुन्ह्यांमध्ये त्यांच्यावर खटले दाखल आहेत.
सदर आरोपींना दि. ३ सप्टेंबर रोजी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या अन्य गुन्ह्यांबाबतही सखोल तपास सुरू आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी पो.नि. संदिप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. राहुल वरोटे, पोसई सुशांत वरक, पोहवा संतोष खाडे, पोहवा स्वप्नील येरुणकर, पोहवा सागर शेवते व पोकों. विठ्ठल घावस यांनी केली. कर्जत पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे..


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home