संकेत घेवारे यांची 'मानवी हक्क संरक्षण फेडरेशन' रायगड कार्याध्यक्षपदी नियुक्ती
खालापूर/सुधीर देशमुख :- कर्जत तालुक्यातील तरुण पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संकेत घेवारे यांची मानवी हक्क संरक्षण फेडरेशनच्या रायगड जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. मानवी हक्कांचे जतन, सामाजिक न्यायाची जाणीव आणि वंचित, शोषित घटकांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने संस्था विविध स्तरांवर कार्यरत आहे. या कार्याला गती देण्यासाठी आणि जिल्ह्यातील जनतेशी अधिक सशक्त संवाद साधण्यासाठी घेवारे यांची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष मुनीर तांबोळी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी रायगड प्रभारी अभिजीत दरेकर, जिल्हा व तालुका पदाधिकारी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना संकेत घेवारे यांनी सांगितले की, "मानवी हक्कांच्या जपणुकीसाठी, प्रशासनासमोरील प्रश्न मांडण्यासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी मी सातत्याने काम करेन. सामान्य नागरिकांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणे ही माझी प्राथमिकता असेल."
संकेत घेवारे हे गेल्या काही वर्षांपासून पत्रकारितेसोबतच अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत. विविध सामाजिक संघटनांशी जोडून त्यांनी शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि मदत कार्य अशा अनेक क्षेत्रांमध्ये कार्य केले आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल कर्जतसह रायगड जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home