पत्रकार प्रथमेश कुडेकर हल्ला प्रकरण
सात दिवस उलटुनही आरोपी मोकाट; पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
आरोपींना अटक न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
नरेश जाधव / कर्जत: - दि. १ ऑगस्ट २०२५ रोजी कर्जत मधील निर्भीड पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावर कर्जत चार फाटा येथे अज्ञात हल्लेखोरांनी भ्याड हल्ला केला. पत्रकार कुडेकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याला सात दिवस पुर्ण होऊनही अद्याप कर्जत पोलीसांना हल्लेखोरांचा मागमुस लागलेला नसल्यामुळे तालुक्यातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, पत्रकार संघटना ह्या कर्जत पोलीस प्रशासनावर प्रचंड प्रमाणात नाराज असल्याचे चित्र दिसत आहे.
पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावर हल्ला झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी कर्जत खालापूर तालुक्याचे आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप भोसले यांची भेट घेऊन हल्लेखोरांना लवकरात लवकर जेरबंद करण्याच्या सुचना दिल्या तर शिवसेना (शिंदे गट), कर्जत प्रेस क्लब, कर्जत प्रेस असोसिएशन, व्हाॅइस ऑफ मेडिया आदी संघटनांच्या वतीने कर्जत पोलीसांना निवेदने देऊन आरोपी हल्लेखोरांना न पकडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा थेट इशाराही दिला गेला. परंतु, घटनेला सात दिवस उलटुनही कर्जत पोलीसांना हल्लेखोरांना पकडण्यात यश आलेले नाही.
ह्याच पार्श्वभूमीवर प्रथमेश कुडेकर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया - कर्जत तालुका यांच्या वतीने देखील आज पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
या निवेदनात, चार दिवसांच्या आत हल्लेखोर आरोपींना अटक न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्याच्यावर झालेला हल्ला म्हणजे लोकशाहीवरचाच हल्ला आहे, असे स्पष्ट करत संबंधितांना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कर्जत तालुका अध्यक्ष मनोज गायकवाड, जिल्हा महासचिव सुनील सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष जयेश शिंदे, प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड. उत्तम गायकवाड, शहराध्यक्ष अरविंद मोरे, युवक सचिव राहुल गायकवाड, तसेच किशोर जाधव, दीपक भालेराव, राजू जगताप, संतोष जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home