Thursday, August 28, 2025

आंदोलक नवी मुंबईत दाखल होण्यास सुरुवात

 


मराठा आंदोलन : एपीएमसीत मुक्कामाची सोय

 महापालिका-सिडकोकडून अद्याप सहकार्य नाही

वाहनांमुळे खोपोली व खालापुरात वाहतूक कोंडी 

खोपोली / मानसी कांबळे :- मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची भूमिका ठाम ठेवत मनोज जरांगे पाटील आणि आंदोलनकर्ते मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. राज्यभरातून लाखो मराठ्यांनी त्यांना पाठींबा दिला असून अनेकजण या आंदोलनात सहभागी होताना दिसत आहेत. शुक्रवार, 29 ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील बेमुदत आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. त्यांचा ताफा लवकरच मुंबईत पोहचणार आहे. आंदोलक खोपोली, खालापूर मार्गे नवी मुंबई व मुंबईत प्रवेश करीत आहेत.

हजारों मराठा आंदोलक बोरघाटातून खोपोलीत उतरल्याने खोपोली शहर व शिळफाटा येथे काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. सकल मराठा मोर्चाच्या निमित्ताने वाहतुकीचे नियोजनाचे अवलोकन करण्यासाठी खालापूर तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण, निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्यासमवेत खोपोलीचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी दौरा केला होता. तसेच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खालापूर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉं. विशाल नेहूल यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली पोलिस निरीक्षक सचिन हिरे, खालापूर पोलिस निरीक्षक सचिन पवार, रसायनी पोलिस निरीक्षक संजय बांगर आदींनी वाहतूक व कायदा सुव्यवस्थेची काळजी घेतली.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातून निघालेल्या आंदोलनकर्त्यांचा लोंढा नवी मुंबईमार्गे मुंबईकडे रवाना होणार आहे. गुरुवार, २८ ऑगस्ट मध्यरात्रीपासून आंदोलक नवी मुंबईत दाखल होऊ लागले असून, शुक्रवारी पहाटेपर्यंत मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते येण्याची शक्यता आहे. या सर्व आंदोलनकर्त्यांच्या राहण्या-जेवणाची जबाबदारी सकल मराठा समाजाने स्विकारली आहे. वाशी एपीएमसी कांदा-बटाटा बाजार परिसरातील लिलाव गृहात मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली असून येथे जेवण, न्याहारी, पाणी आणि स्नानगृहाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याकरीता एपीएमसी प्रशासन आणि पोलिस यंत्रणेकडून सहकार्य मिळत आहे. मात्र नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको प्रशासनाकडून अद्याप कोणतेही सहकार्य न मिळाल्याने सकल मराठा समाजाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. 

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आझाद मैदानावरील आंदोलनाला मुंबई पोलिसांनी सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातून आंदोलक मोठ्या संख्येने नवी मुंबईत दाखल होत आहेत. समाजमाध्यमांच्या माध्यमातून आंदोलक आपला प्रवास, हवामान, वाहतूक कोंडी आदी माहिती सतत शेअर करीत असून, कितीही अडचणी आल्या तरी मुंबई गाठणारच, असा उत्साह आंदोलनकर्त्यांमध्ये दिसून येत आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home