सालवड येथे विज वाहिनी कोसळून चिमुकल्याचा मृत्यू
जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
कर्जत तालुका विज ग्राहक संघर्ष समिती व शिवसेना ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा
कर्जत/नरेश जाधव :- कर्जत तालुक्यातील सालवड गावात दि.२४ ऑगस्ट २०२५ रोजी विज वाहिनी अंगावर पडून केवळ ९ वर्षांच्या शिव रुपेश भोसले या निरागस चिमुकल्याचा मृत्यू झाला आणि संपूर्ण तालुक्यात संतापाचा भडका उडाला. गावकऱ्यांनी ही दुर्घटना केवळ अपघात नसून महावितरणच्या निष्काळजीपणाचे थेट परिणाम असल्याचे ठासून सांगितले आहे. दोन दिवसांपूर्वीच विज वाहिनीची दुरुस्ती झाली असताना थातुरमातुर व निष्काळजी कामामुळेच हा बळी गेला असून यासाठी असिस्टंट इंजिनिअर सिंग थेट जबाबदार आहेत, असा रोष व्यक्त करण्यात आला आहे. मात्र इतक्या गंभीर घटनेनंतरही पोलीस प्रशासनाने केवळ एडीआर दाखल करून मामला दडपण्याचा प्रयत्न केल्याने नागरिकांचा संताप आणखी भडकला आहे.
सोमवार, दि.२५ ऑगस्ट रोजी कर्जत तालुका विज ग्राहक संघर्ष समिती व शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने कर्जत पोलीस ठाण्यावर धडक देत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले तसेच महावितरणचे उपकार्यकारी अभियंता चंद्रकांत केंद्रे यांना निवेदन सादर केले. या निवेदनात असिस्टंट इंजिनिअर सिंग तसेच ठेकेदार यांच्यावर तातडीने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. यासोबतच मृत बालकाच्या कुटुंबाला शासनाच्या परिपत्रकानुसार २० लाख रुपयांची नुकसानभरपाई त्वरित देण्यात यावी तसेच तालुक्यातील जीर्ण अवस्थेत असलेल्या विज तारा, पोल व उपकरणे एका महिन्याच्या आत बदलण्यात यावीत, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
निवेदनात पुढे स्पष्ट करण्यात आले आहे की, ऑगस्ट २०२४ मध्ये विज ग्राहक संघर्ष समितीने आठ दिवस साखळी उपोषण करून या मागण्या मांडल्या होत्या. त्यानंतरही वेळोवेळी निवेदने देण्यात आली, परंतु महावितरणने कोणतेही पाऊल उचलले नाही. हा निष्काळजीपणा आणि ढिलाई आज एका चिमुकल्याच्या मृत्यूचे कारण ठरला असून याला महावितरणच जबाबदार आहे. गेल्या काही महिन्यांत विजेचा शॉक लागून नागरिक आणि जनावरे मृत्युमुखी पडले असून, अशा सर्वांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे.
कार्यकर्त्यांनी इशारा दिला आहे की, एका महिन्यात या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल आणि त्यातून उद्भवणाऱ्या कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नास पोलीस प्रशासन व महावितरण पूर्णपणे जबाबदार असेल. या निवेदनावेळी विज ग्राहक संघर्ष समितीचे सदस्य, सालवड ग्रामस्थ तसेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. यामध्ये ॲड. कैलास मोरे, रंजन दातार, प्रशांत सदावर्ते, अमिर मणियार, सतिश मुसळे, संजय कर्णिक, प्रशांत उगले, मुकुंद भागवत, नरेश जाधव, प्रभाकर गंगावणे, जगदिश दगडे, कैलास म्हामले, शरद वावळ, आशिष कोल्हे, पुंडलिक (बंधु) पाटील, रमेश कदम, आरिल मुजावर, हेमंत सुरावकर, अनिल भोसले, बाबु घारे, नितिन सावंत, विनोद पांडे, संतोष पाटील, बाजीराव दळवी, उत्तम कोळंबे आदींचा समावेश होता.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home