कोट्यावधींचा खर्च तरी शहरात स्वच्छतेची बोंबाबोंब ?
रिकाम्या तळ्यात, कचऱ्याचा साठा...बहिरा म्हणतो वार्ता काय, आंधळा म्हणतो नाचते गाय...खोपोली शहरात नक्की चाललंय तरी काय ?
खोपोली / खलील सुर्वे :- खोपोली शहरात समस्यांचा डोंगर उभा आहे...कचरा, पाणी, खड्डे, अस्वच्छता आणि बेसुमार भष्ट्राचार, अशा परिस्थितीत मुख्याधिकारी रायगड जिल्ह्यातील' बेस्ट सिओ' ठरले आहेत. नेमका पुरस्कार मिळाला कसा... पुरस्कार देतांना कोणत्या कामाचे मोजमाप झाले आणि पुरस्कार घ्यायला गेले कसे ? हा खरे तर संशोधनाचा विषय आहे. पण मिळाला, तो मिळाला...त्यासाठी खोपोली करांनी साहेबांचे अभिनंदन करायलाच हवे...आणि पुरस्कारातून बाहेर येवून साहेबांनी आता खोपोली शहरातील समस्यांचा डोंगर भुईसपाट करावा, अशी अपेक्षा खोपोलीकर सुज्ञ जनतेतून होत आहे.
स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे विविध आजार पसरतात, आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो आणि पर्यावरणाचीही हानी होते. यामध्ये वैयक्तिक स्वच्छता न राखणे, परिसर अस्वच्छ ठेवणे, प्लास्टिकचा वापर आणि कचरा योग्य ठिकाणी न टाकणे...संसर्गजन्य रोग, हवामानातील बदल आणि एकूणच जीवनशैलीवर गंभीर परिणाम होतात. खोपोली शहरात अनेक शाळांसमोर घाणीचे ढीग साचलेले असल्याने शाळेत जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे बोलले जात आहे. शहरात स्वच्छता करण्यासाठी खोपोली नगर परिषदेने ठेकेदारी दिली आहे. स्वच्छतेवर लाखो, कोट्यवधी रुपये खर्च होतात. तरी शहरातील गल्लोगल्ली..पटांगण, चौकाचौकात...शाळेसमोर..रस्त्यांवर.. मोकळ्या जागेत...बस स्टॅन्डसमोर...रेल्वे स्टेशन परिसरात...रहदारी परिसरात.. दुकानांसमोर...रिक्षा स्टॅन्ड समोर...भाजी मार्केट, मटण मार्केट परिसरात... बाजार पेठ परिसरात... जिथे नजर जाईल तिथे प्लास्टिकच्या पिशव्याने चमकणारा कचरा.. नटलेला.. सजलेला... घाणीचा ढीग पहावयास मिळत आहे. मात्र, शहरात कुठे व कोणत्या ठिकाणी ठेकेदारी दिलेला ठेकेदार स्वच्छता करतो ? लोकप्रतिनिधीचा बंगला परिसर स्वच्छ झाला की शहर स्वच्छ, सुंदर व रोगराई मुक्त होतो का ? असा प्रश्न खोपोलीकरांनी उपस्थित केला आहे.
एकेकाळी शहर स्वच्छ, सुंदर, रोगराई मुक्त असल्याने पुरस्काराने खोपोली नगर परिषदेला सन्मानित देखील करण्यात आला होते. मात्र, आता शहरात जागोजागी घाणीचे साम्राज्य पसरले असल्याचे चित्र दिसून येत असल्याने पुरस्कार मिळणे ही नशिबाची साथ...आणि जादूची कांडी तसेच साहेबी कमाल लागेल, उघड सत्य आहे. डासांना जगातील सर्वात धोकादायक किटकांपैकी एक मानले जाते. हे लहान दिसणारे कीटक दरवर्षी लाखो लोकांना डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आणि झिकासारख्या आजारांनी आजारी पाडतात. डास नेहमी साचलेल्या पाण्यात आणि अस्वच्छतेत वाढतात. जर आपण आपल्या परिसरात स्वच्छता राखली, तर डासांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी करता येते असे मानले जात आहे. वेळेवर शहरात स्वच्छता होत नसेल घंटा गाडी येत नसेल तर नागरिकांनी किती दिवस घाण घरात ठेवावी ? या आधी शहरात ठिकठिकाणी कचराकुंडी (डस्टबीन) ठेवण्यात आले होते. घंटागाडी वेळेवर आली नाही किंवा घरातील नोकरीवर जाणारे कुटुंब उशिरा आले की घरातला कचरा कचरा कुंडीमध्ये टाकला जात होता, पण ही सुविधा राहिली नसल्यामुळे कचरा कुठे टाकायचा ? असा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित होत आहे. उघड्यावर टाकण्यात आलेला कचरा वेळेवर उचलला जात नसेल तर नगर परिषदेने प्रत्येक घराला मच्छरदाणी आणि सरकारी खाजगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळणारा हेल्थ कार्ड वाटप करून द्यावा ? अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक खोपोली शहरात फिरून शहराचा आढावा का घेत नाही ? आपल्या कार्यालयाचे लोकसेवक...कर्मचारी वर्ग...आपल्या कामांची जबाबदारी ईमानदारी पार पडतात का? हे का पहिले जात नाही ? नगर परिषदेच्या डोळ्यांदेखत लाखो रुपये खर्च केलेला शौचालय चोरीला गेल्याच्या टीव्ही चैनलपासून ते वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध होतात तरी चोराचा शोध का लागत नाही ? नवीन शौचालय बांधण्यासाठी निधी मंजूरी एका वार्डामध्ये होतो आणि दुसऱ्या ठिकाणी शौचालय का बनविण्यात येते ? खालापूर तालुक्यातून जाणाऱ्या एक्सप्रेस वेवर एका खासगी हॉटेल परिसरात स्वखर्चाने स्वच्छतेवर काटेकोरपणे लक्ष देत संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवण्यात येतो. मात्र, शासनाकडून सर्व सोयी सुविधा देऊन लाखो, कोट्यवधी रुपये खर्च करून देखील शहरात स्वच्छता का होत नाही ? असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home