Monday, August 11, 2025

खोपोली-पनवेल मार्गांवर बसेस अपुऱ्या




खोपोली-पनवेल प्रवाशांची तारांबळ

परिवहन विभागाचा भोंगळ कारभार

खोपोली / मानसी कांबळे :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून एसटी बसेसमध्ये प्रवाशांची संख्या वाढण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहेत. महिला, ज्येष्ठ नागरिक, 12 वर्षाखालील मुलांना शासनाकडून तिकीट दरात सुट देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासी संख्या वाढली असली तरी पुरेशा सुविधा मिळत नसल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत. खोपोली-पनवेल मार्गांवर अपुऱ्या बसेस असल्याने सकाळी व संध्याकाळच्या सुमारास खोपोलीवरून खालापूरकडे ये-जा करणाऱ्या तासन्तास ताटकळत बसावे लागते. 

वेळेवर बसेस नसल्याने खोपोली-पनवेल बससाठी दररोज नागरिकांची बोंबाबोंब होत असल्याचे चित्र खोपोली बस स्थानकात दिसून येत आहे. सोमवार, 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वाजेपासून बस नसल्याने ऑफीस कर्मचारी, शाळा कॉलेजचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रचंड संताप व नाराजी दिसुन येत होती. महिला, ज्येष्ठ नागरीक, नोकरदार तसेच शासकीय कामकाजासाठी खालापूर तहसील कार्यालयात जाणारे नागरीक, विद्यार्थी व पनवेलकडे प्रवास करणारे प्रवासी यांना सकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत असतो. दुसरीकडे वाहकाकडून पैसे सुट्टे देण्यासाठी प्रवाशांसोबत विनाकारण वाद घातला जात असतो.

खोपोली ते पनवेल बसमध्ये खालापुर स्थानकात उतरल्यास महिलांना 9 रूपये तिकीट दर आहे. परंतु कोणत्याच प्रवाशांना उरलेला 1 रुपया दिला जात नाही. सुट्टे पैसे परत मागितल्यास वाहक प्रवाशी महिलांसोबत अरेरावी करीत असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. महिला वाहक ठोंबरे या तर नेहमीच प्रवाशांसोबत वाद घालत असतात...मोठमोठ्याने बोलणे, अरेरावी करणे, दमदाटी करणे, सुट्टे पैसे न देणे यासारख्या गोष्टींचा सामना प्रवाशांना दररोज करावा लागत आहे. पनवेल-खोपोली बस ही वाहक ठोंबरे यांची खासगी मालमत्ता आहे की, शासनाचा नागरीकांना लाभ देण्यासाठी असलेला उपक्रम, हेच समजत नाही ? वाहक प्रवाशांसोबत वाद घालत असतांना वरीष्ठ अधिकारी लक्ष देणार का ? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. पैसे सुट्टे नसतील तर बस थांबवते, बसमधून उतरा, अशी उत्तरे जनसेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची असतील तर नागरिकांनी बसमध्ये प्रवास सोडावा का ? असा प्रश्न खोपोली-पनवेल बसच्या प्रवाशांना पडला आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home