मुख्यमंत्री साहेब, तुमच्या लाडक्या बहिणींना न्याय नसेल…तर फाशी द्या!
दाभणे कुटुंबातील महिलांचा संतप्त सवाल
सांडपाण्याच्या त्रासाने दाभणे कुटुंबिय त्रस्त
नेचर बिल्डरच्या विरोधात आत्मदहनाचा इशारा
बिडीओ सुशांत पाटील हेच जबाबदार
पत्रकार राजेंद्र जाधव देखील उपोषण करणार
कर्जत / खलील सुर्वे :- कर्जत तालुक्यातील वांजळे गावातील दाभणे कुटुंबातील महिला व लहान मुले यांनी संतप्त स्वरात मुख्यमंत्री साहेब, जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्हाला आणि मुलांना फाशी द्या, असा थरकाप उडवणारा सवाल केला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून नेचर बिल्डरच्या बिल्डिंगमधून निघणाऱ्या सांडपाण्याच्या तक्रारींबाबत संबंधित अधिकारी मुकदर्शक बनले आहेत, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
सांडपाण्याच्या दुर्गंधीने जगणे कठीण - महिलांचा आक्रोश
दाभणे कुटुंबीयांनी सांगितले की, बिल्डरच्या इमारतीमधून धो-धो वाहणारे सांडपाणी थेट गावात, घरासमोर आणि देवस्थानाच्या जागेत सोडले जात आहे. त्यामुळे दुर्गंधी, मच्छर आणि रोगराईचा प्रादुर्भाव वाढला आहे. मुलाबाळांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला असूनही ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी, तहसीलदार, प्रातांधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. आम्हाला अशा रोगराईने मारण्यापेक्षा एकदाच फाशी द्या, अशी मागणी करीत दाभणे कुटुंबातील महिलांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
तक्रारींचा ढीग, पण कारवाईला शून्य प्रतिसाद!
गेल्या काही वर्षांपासून दाभणे कुटुंबाने संबंधित विभागांकडे ज्यात किरवली ग्रामपंचायत, कर्जत पंचायत समिती, तहसीलदार, प्रातांधिकारी, जिल्हाधिकारी, कोकण आयुक्त आणि मुख्यमंत्री कार्याल येथे तक्रारी व निवेदने दिली आहेत.
तहसीलदारांनी स्वतः स्थळ पाहणी करून “एनए रद्द करण्याचा अहवाल” जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला होता. त्यानंतर 16 ऑक्टोबर 2024 रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालयात चौकशीसाठी आदेशही देण्यात आला. पण आजतागायत गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायतीने कोणतीही अंमलबजावणी केलेली नाही.
गरिबाला फाशी, श्रीमंताला माफी - ग्रामस्थांचा रोष
बिल्डरांना कायद्याचा धाक नाही का ? पोलिस प्रशासन फौजदारी गुन्हा दाखल करण्याऐवजी मौन बाळगते. अधिकारी फक्त कागदोपत्री कारवाई दाखवतात, पण प्रत्यक्ष कृती शून्य आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गरिबाला फाशी आणि श्रीमंताला माफी अशी परिस्थिती निर्माण केली गेली आहे, असे म्हणत दाभणे कुटुंबाने शासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
15 दिवसात सांडपाणी बंद न झाल्यास आत्मदहन - दाभणे कुटुंबाचा इशारा
दाभणे कुटुंबाने जाहीरपणे इशारा दिला आहे की, येत्या 15 दिवसात सांडपाण्याचा बंदोबस्त झाला नाही, तसेच संबंधित बिल्डरवर कार्रवाई झाली नाही तर आम्ही सर्व कुटुंब, महिला व मुलांसोबत कर्जत पंचायत समिती परिसरात आत्मदहन करू आणि आमच्या मृत्यूस संबधित बिल्डर, ग्राम पंचायतीचे ग्रामसेवक, कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील आणि संबंधित अधिकारी आणि विभाग जबाबदार असतील.
त्यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला आहे की, मुख्यमंत्री साहेब, लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी 1500 रुपये देता, पण सांडपाण्यामुळे मरत असलेल्या बहिणींच्या समस्यांकडे पाहण्यासाठी वेळ नाही का ?
ग्रामस्थांचा सवाल — अधिकारी राजकीय दबावाखाली की भ्रष्टाचाराच्या गंगेत बुडाले ?
दाभणे कुटुंबाचा थेट आरोप आहे की, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, तहसीलदार, प्रातांधिकारी, उपजिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हाधिकारी आणि बिल्डर राजकीय दबाव किंवा आर्थिक फायद्यामुळे कारवाईपासून दूर राहिले आहेत.
गावात रोगराईने कोणी मेल्यावर मदतीचे पाच लाख देऊन फोटो काढणारे अधिकारी, आज या जिवंत कुटुंबाकडे पाहायला का येत नाहीत ? असा जळजळीत सवाल त्यांनी उपस्थित केला.
बिडीओ सुशांत पाटीलच खरे दोषी
दाभणे कुटुंबातील महिलांनी सांगितले की, नविन गटविकास अधिकारी सुशांत पाटील कार्यालयात रूजू झाल्यापासून आम्ही पत्रकारांसह त्यांच्याकडे संबधित विषय मांडला आहे. जेव्हा हा विषय मांडला तेव्हा राणा भिमदेवी थाटात बिडीओंनी कार्रवाईचे आश्वासन दिले. ताबडतोब पाहणी केली तसेच रायगड जिल्हाधिकारी, कर्जत तहसिलदार यांनी देखील कार्रवाईचे लेखी पत्र गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांना दिले आहे. सिंघम पाटील यांचा कार्रवाईचा रूबाब बिल्डर, त्याचे संबधित पंटर साहेबांना भेटल्यानंतर लगेच उतरला. सुशांत पाटील नेहमीच श्रीमंत, धनदांडग्या लोकांना पाठीशी घालत आले आहेत. या मागे काही 'अर्थ' लपला आहे का ? याची चौकशी होणे गरजेचे आहे. गरीबांवर अन्याय होत असतांना वरीष्ठ अधिकारी तोंडावर चिकटपट्टी मारून गप्प बसला असेल तर यांचा 'अर्थ' सर्वसामान्य नागरिकांना चांगलाच समजतो. दरम्यान, आम्ही आत्मदहन केले आणि यात आम्हाला काही झाले...कुणी दगावला तर वृत्तपत्रातील बातमी व आमचे निवेदन हे ग्राह्य धरीत कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करणे व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कार्रवाई करण्यात यावी, अशी आम्ही मागणी करतो, अशी प्रतिक्रिया दाभणे कुटुंबातील महिलांसह सर्वांनी एकमुखाने व्यक्त केली आहे.
पत्रकार राजेंद्र जाधव देखील उपोषण करणार
दाभणे कुटुंबातील महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन रायगड जिल्हाध्यक्ष पत्रकार राजेंद्र शिवाजी जाधव हे देखील उपोषणाला बसणार आहेत. त्यांनी सांगितले की, मागील 2-3 वर्षापासून हा लढा सुरू आहे. बिल्डर दोषी आहे हे सर्वांना माहित आहे पण बिल्डरचा पैसा, त्याचे खाल्लेले मीठ शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना कार्रवाईपासून रोखत आहे, असेच दिसून येत आहे. रायगड जिल्हा परिषद सीईओ नेहा भोसले, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, कर्जत प्रातांधिकारी प्रकाश संकपाळ याकडे लक्ष देणार का ? कार्रवाई करणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, या प्रकरणी मी 15 दिवसांत कर्जत प्रातांधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू करेल, असा इशारा पत्रकार राजेंद्र जाधव यांनी दिला आहे.
कर्जत तालुक्यातील हा प्रश्न केवळ एका कुटुंबाचा नाही, तर संपूर्ण ग्रामीण भागातील प्रशासनाच्या निष्क्रियतेचा आरसा आहे. सरकार आणि प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास, एक सामान्य कुटुंब आत्मदहनासारखे टोकाचे पाऊल उचलू शकते आणि त्याची नैतिक जबाबदारी कोणाची, हा प्रश्न अनुत्तरित राहील.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home