Monday, October 6, 2025

वर्षावास समाप्ती व पौर्णिमा उत्सव सुभाषनगरात उत्साहात साजरा

 


महापुरुषांच्या पूजनाने व बुद्धवंदनेने परिसरात धार्मिकता आणि आनंदाचे वातावरण

खोपोली / मानसी कांबळे :- सुभाषनगर जयंती उत्सव समितीच्या वतीने वर्षावास समाप्ती आणि पौर्णिमा कार्यक्रम मोठ्या श्रद्धा, भक्तीभाव आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने परिसरात आनंदाचे आणि शांततेचे वातावरण पसरले होते.

कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व सुगंधी फुलांनी सजवलेल्या बुद्धमूर्तीचे वंदन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी एकसुरात बुद्धवंदना घेतली. या वेळी श्रावणेर शैलेश ओव्हाळ यांनी धम्मपूजा घेऊन उपस्थितांना धम्म, करुणा आणि मैत्रीचा संदेश दिला.

कार्यक्रमानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी रायगड जिल्हा अध्यक्ष दिपक गायकवाड, सुमेध जाधव, प्रमोद कदम, ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते संपत गाढवे, अशोक गिलबिले, उद्योजक गोकुळ सोनावणे, संतोष गायकवाड, किरण गायकवाड आणि संतोष आ. गायकवाड, गणेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाला महिला, पुरुष आणि लहान मुलांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त सहभाग होता. सर्व उपस्थित भक्तांनी धम्मसंदेश आणि करुणेचा मार्ग आचरणात आणण्याची प्रतिज्ञा केली. कार्यक्रमानंतर सर्वांसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते.

 वर्षावासाची परंपरा आणि अर्थ :- बौद्ध परंपरेनुसार, वर्षावास हा पावसाळ्यातील तीन महिन्यांचा कालावधी असतो, ज्यादरम्यान भिक्षू एका ठिकाणी राहून ध्यान, उपासना आणि धर्मप्रसार करतात. पावसाळा संपल्यावर म्हणजेच शरद पौर्णिमेच्या दिवशी, वर्षावासाची समाप्ती केली जाते. या दिवशी ‘पवारणा पूजा’ केली जाते — ज्यामध्ये भिक्षू आणि अनुयायी परस्पर क्षमा याचना करतात व जगात शांती, मैत्री आणि करुणा नांदावी अशी प्रार्थना करतात.

या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमामुळे सुभाषनगर परिसरात धम्म, ऐक्य आणि शांततेचा संदेश पोहोचला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी परिश्रम घेतले.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home