खोपोलीत राष्ट्रवादीतर्फे ‘नवदुर्गा सन्मान’
साहित्य, शेती, शिक्षण, पत्रकारिता व उद्योजकतेतील महिलांना सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरव
खोपोली / मानसी कांबळे :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या संकल्पनेतून खोपोली येथे ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ आयोजित करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, खोपोली येथे शनिवार, 4 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी ५ वाजता हा सोहळा पार पडला.
साहित्य, शेती, कवितालेखन, उद्योजकता, शिक्षण, पाककला, पत्रकारिता अशा अनेक क्षेत्रांत कार्यरत महिलांचा गुलाबपुष्प व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे समाजात कार्यरत असलेल्या महिलांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे हा होता.
या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) कर्जत विधानसभा अध्यक्षा सुरेखा खेडकर, खोपोली नगर परिषदेच्या माजी नगरसेविका वैशाली जाधव, शिल्पा सुर्वे, नारायणी केदारी, अंजु सरकार, वर्षा साळुंखे, शोभा काटे तसेच युवती संघटनेच्या शिवानी मंगेश दळवी यांच्यासह महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाद्वारे विविध क्षेत्रातील महिलांनी दाखवलेले धैर्य, कर्तृत्व व कार्यशीलता अधोरेखित झाली. महिलांना समाजातील विविध क्षेत्रांत आपली छाप पाडण्यासाठी ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ हा उपक्रम नक्कीच प्रेरणादायी ठरला, असे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home