कोपरगावात देशातील पहिल्या सहकारी सीएनजी प्रकल्पाचे अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन
सहकार क्षेत्रात नव्या ऊर्जाक्रांतीची सुरुवात
विवेक कोल्हे ठरले केंद्रस्थानी व्यक्तिमत्व
कोपरगाव (जि. अ. नगर) / किरण ठाकरे :- गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज कोपरगाव येथे देशातील पहिल्या सहकारी सीएनजी (Compressed Biogas) प्रकल्पाचे भव्य उद्घाटन झाले. संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामध्ये प्रतिदिन 12 टन गॅस निर्मिती (12 TPD) क्षमता असून, हा प्रकल्प देशातील सहकार क्षेत्रासाठी एक आदर्श ठरणार आहे.
या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कोपरगाव येथे झालेल्या या ऐतिहासिक उद्घाटन सोहळ्यात शेतकरी, कार्यकर्ते आणि सहकारी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटनानंतर आयोजित शेतकरी मेळाव्याला प्रचंड गर्दी उसळली.
कार्यक्रमात विवेक कोल्हे यांच्या उत्साही आणि दमदार भाषणाने सभेला रंगत आणली. त्यांच्या भाषणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष उल्लेख करीत म्हटले की, जे तुमच्या मनात आहे, तेच अमितभाईंच्या मनात आहे, असे म्हणत त्यांनी विवेक कोल्हेंच्या राजकीय भविष्यासंदर्भात महत्त्वाचा संकेत दिला. या विधानानंतर मैदानात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हे यांच्या कार्याची दखल घेत म्हणाले की, विवेक कोल्हे आणि स्नेहलता कोल्हे यांच्या राजकीय भविष्यासाठी अमितभाई आणि आम्ही जबाबदारी घेतली आहे. विवेक कोल्हे हे नव्या कृषी आणि सहकारी क्रांतीचे प्रणेते आहेत. ते पुढे म्हणाले की, नातवाने आजोबांसारखेच कार्य करून शेतकऱ्यांच्या जीवनात आधुनिकतेचा श्वास आणला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपल्या हटके शैलीत विवेक कोल्हे यांचे कौतुक करीत म्हटले की, हे यश केवळ कोल्हे कुटुंबाचे नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राचे आहे.
केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणात संजीवनी समूहाच्या कार्याचे विशेष कौतुक करीत सांगितले की, संजीवनी समूहाचे रोपटे आता वटवृक्ष झाले आहे. देशातील पहिला सहकारी सीबीजी प्रकल्प सुरू करताना मला अत्यंत अभिमान वाटतो. विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्रात एक नवी दिशा दिसत आहे. भविष्यात सहकाराचा चेहरा म्हणून विवेक कोल्हे ओळखले जातील.
शहा यांनी पुढे जाहीर केले की, देशातील आणखी 15 सहकारी कारखान्यांना एनसीडीसीच्या माध्यमातून सहाय्य देऊन अशा प्रकारचे प्रकल्प सुरू करण्यात येतील.
अभूतपूर्व जनसमुदाय आणि भावनिक क्षण :- या सोहळ्यासाठी मैदानात अभूतपूर्व गर्दी झाली होती. सभास्थळ पूर्ण भरले असून बाहेरही शेकडो लोक उभे राहून कार्यक्रम ऐकत होते. या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे स्नेहलता कोल्हे यांच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू दाटले.
सहकार आणि राजकारणात “कोल्हे घराण्याचे पुनरागमन” :- या कार्यक्रमाद्वारे कोल्हे कुटुंबाने महाराष्ट्राच्या सहकार आणि राजकीय क्षेत्रात पुन्हा एकदा आपले वेगळेपण ठसवले. संजीवनी समूहाच्या या उपक्रमामुळे केवळ ऊर्जाक्षेत्रातच नव्हे तर शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणातही एक नवे पर्व सुरू झाले आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home