Sunday, September 21, 2025

भारत भूषण पुरस्कारप्राप्त तटकरे दाम्पत्याचा कर्जत येथे भव्य नागरी सत्कार

पोलिस मैदानावर सोहळा ; पक्षातील नेते, कार्यकर्त्यांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती

 आगामी निवडणुकांची चाहूल ; डॉं. सुनिल पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने राजकीय समीकरणे बदलणार

सुधाकर घारे यांचे आवाहन : नगरपालिका असो वा जिल्हा परिषद, राष्ट्रवादी नंबर वन राहील

प्रफुल पटेल, रुपाली चाकणकर, धनंजय मुंढे यांसह अनेक दिग्गजांची उपस्थिती

युवक, महिला, विद्यार्थी, सामाजिक घटकांचा मोठा सहभाग 

स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण

कर्जत / मानसी कांबळे :- रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे लोकमत समुहाचा 'भारत भूषण' हा पुरस्कार मिळाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल दत्तात्रेय तटकरे व सौ. वरदा तटकरे यांचा नागरी सत्कार सोहळा आज कर्जत येथे पार पडला. पोलिस मैदानावर झालेला हा भव्यदिव्य सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत चांगलाच रंगला.

नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी काही महिन्यांवर आली असतानाच हा कार्यक्रम झाल्याने कर्जत-खोपोली परिसरात चांगलीच राजकीय रंगत आली आहे. विशेष म्हणजे, खोपोलीच्या राजकारणातील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व मानले जाणारे डॉं. सुनिल गोटीराम पाटील यांनी शिवसेना शिंदे गट सोडून थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या राजकीय समीकरणांत मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉं. सुनील पाटील यांच्यासह भाजपा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षा अश्विनी पाटील, भाजपा खोपोली शहर अध्यक्ष राहुल सखाराम जाधव, शिवसेना अल्पसंख्यांक रायगड जिल्हा महिला अध्यक्षा जैबूनिसा शेख, अनिता जितेंद्र शहा यांसह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

या सोहळ्यात रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुधाकर घारे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले की, कर्जत नगर पालिका, खोपोली नगर पालिका, पंचायत समिती वा जिल्हा परिषद कोणतीही निवडणूक असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्या क्रमांकावर राहील याची खात्री बाळगा.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खा. प्रफुल्ल पटेल, महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, माजी मंत्री धनंजय मुंडे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार सुनिल शेळके, माजी आमदार अनिकेत तटकरे, प्रदेश सचिव भरतभाई भगत, प्रदेश सरचिटणीस दत्तात्रेय मसुरकर, रायगड जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा उमा मुंढे, युवक अध्यक्ष अंकित साखरे, कर्जत विधानसभा अध्यक्षा सुरेखा खेडकर, खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे, खोपोली नगर परिषदेच्या माजी नगरसेविका वैशाली जाधव, माजी नगरसेवक रमेश जाधव, युवा नेते अल्पेश थरकुडे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांतील आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या कार्यक्रमात कर्जत, खोपोली, माथेरान नगर परिषद, खालापूर नगर पंचायत तसेच ग्रामपंचायतींचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, नगरसेवक, सभापती, उपसभापती, सहकारी संस्थांचे पदाधिकारी आणि विविध सामाजिक घटकांतील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. युवक, महिला, विद्यार्थी, अल्पसंख्यांक तसेच अनुसूचित जाती-जमातीतील कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला बहुआयामी रंगत आली.


या सोहळ्यात तटकरे दाम्पत्यांचा भव्य नागरी सत्कार होताच, परंतु त्याचबरोबर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चुणूकही या कार्यक्रमातून दिसून आली.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home