Wednesday, September 17, 2025

अखेर बेपत्ता नौसैनिकाचा मृतदेह शोधण्यात यश

 


 पाली भुतवली डॅम परिसरातील जंगल भागात आढळले शव !

 सह्याद्री रेस्कीव टीम व नेरळ पोलिस पथकांच्या प्रयत्नांना यश ! 

कर्जत /नरेश जाधव :- मुंबई कुलाबा येथील डॉकयार्ड नौदलातील कार्यरत जवान सूरजसिंग चौहान हा काही दिवसांपासून रहस्यमयरीत्या बेपत्ता होता. सदर जवानाचे फोन लोकेशन हे कर्जत तालुक्यातील भिवपूरी रेल्वे स्थानक ते पाली भुतिवली डॅम परिसरातील जंगल भागात दिसून येत होते. 33 वर्षीय सुरजसिंग अमरपालसिंग चौहान हे भिवानी, राजस्थान येथील रहिवासी असून ते मुंबई येथील कुलाबा डॉकर्याड एफटीटीटी नौदल विभागामध्ये मास्टर चीफ इएआर क्लास दोन या पदावर सेवेत कार्यरत होते. 7 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 5 वाजेच्या सुमारास ते घरामधून निघून गेले होते. त्याचा नौदलाच्या जवानांनी सकाळपासून शोध घेतला व त्यांच्या फोनवर संपर्क केला असता, त्यांचा फोन बंद लागत असल्याने नौदलाने कफ परेड पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. सदर बेपत्ता जवान सुरजसिंग अमरपालसिंग चौहान यांच्या फोनचे लोकेशन हे कर्जत तालुक्यातील नेरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भिवपूरी रेल्वे स्थानकांच्या ते पाली भूतिवली धरण परिसरातील जंगल भागामध्ये दाखवत होते. नौदल व नेरळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने या परिसरात शोधमोहीम सुरू केली होती. 

या मोहिमेत वैभव नाईक यांच्या सह्याद्री मित्र माथेरान रेस्क्यू टीम, एमएमआरसीसी रेस्क्यू सदस्य व ग्रामस्थांनीही सहभाग घेत भिवपूरी रेल्वे स्टेशन परिसरातील व रहदारीच्या ठिकांणाचे सीसीटीव्ही फुटेज तपासून तसेच धरण परिसर, जंगल, डोंगर भागात या पथकांद्वारे गेली सात ते आठ दिवस शोध मोहीम सुरू होती. 14 सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास या जंगल परिसरात एक बॉडी दिसल्याची माहिती ही मुंबई येथील ट्रेकर व सायकलींग करणारे अर्थव घाटे (वय वर्ष 22) यांनी नेरळ पोलिस ठाण्यात देताच दुसऱ्या दिवशी अर्थात 15 सप्टेंबर 2025 रोजीच्या शोधमोहीमे दरम्यान सह्याद्री मित्र आपतकालीन संस्था माथेरान, नेरळ पोलिस टीम व नौदलाच्या टीमला या बेपत्ता जवानाचा मृतदेह हा सापडून आला. सदर जवानाचा मृतदेह हा संध्याकाळी मुंबई येथील जे.जे हॉस्पिटल येथे शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आले. या शोधमोहिमेमध्ये नेरळ पोलिस टीमला व नौदलाच्या टिमला सह्याद्री मित्र आपतकालीन संस्था माथेरानचे सदस्य वैभव विकास नाईक, संदीप रघुनाथ कोळी, धीरज वालेंद्र, किशोर कांबळे, महेश काळे, सुनील कोळी, सुनील ढोले, चेतन कळंबे यांची मोलाची मदत लाभली. या शोध मोहिमेत कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी राहूल गायकवाड व नेरळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक शिवाजी ढवळे व त्यांच्या पोलिस टीमने अथक मेहनत घेतली.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home