Thursday, September 18, 2025

लालपरीची बससेवा खोपोलीकरांसाठी डोकेदुखी

 


 खोपोली–पनवेल मार्गांवरील एसटी बससेवा प्रवाशांसाठी त्रासदायक अनुभव 

प्रवाशांकडून आंदोलनाचा इशारा

खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली येथून खालापूर, पनवेल, वाशी या मार्गांवर सुरू असलेली महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची (एसटी) बससेवा प्रवाशांसाठी मोठा डोकेदुखीचा विषय ठरत आहे. शहर व ग्रामीण भागातील शेकडो प्रवासी दररोज या बससेवेवर अवलंबून असले तरी बस वेळेवर न येणे, चालक-वाहकांची अरेरावी, प्रवाशांना वाईट वागणूक, सुट्ट्या पैशांवरून होणारे वाद असे अनेक गैरप्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत.

 वेळेवर न येणाऱ्या बसेस :- प्रवाशांच्या मते, खोपोली ते पनवेल दरम्यानच्या बसेसकडून वेळापत्रकाचे पालन होत नाही. बसेस ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा येतात किंवा काही वेळा अजिबात येत नाहीत. परिणामी, विद्यार्थ्यांना शाळा–कॉलेजला उशीर होतो तर नोकरदार वर्गांलाही दररोजच्या प्रवासात प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागते.

 चालक–वाहकांची मनमानी :- या मार्गांवर कार्यरत असलेले काही चालक व वाहक प्रवाशांशी मनमानी वर्तन करतात, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. थांब्यावर प्रवासी उभे असतानाही बस थांबवली जात नाही. बस पुढे निघून गेल्यामुळे महिला, लहान मुले आणि वयस्कर नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. काही वेळा प्रवाशांनी विनंती केली तरी चालक–वाहक वाद घालणे, अरेरावी करणे व शिवीगाळ करणे असे प्रकार घडतात.

 सुट्ट्या पैशांवरून वाद :- भाडे घेताना सुट्ट्या पैशांवरून वारंवार वाद निर्माण होतात. वाहक प्रवाशांना सुट्टे देण्याऐवजी उलट त्यांच्यावर दबाव आणतात. प्रवाशांकडे सुट्टे नसल्यास त्यांना अपमानास्पद परिस्थितीला सामोरे जावे लागते.

 महिला कंडक्टरकडूनही अरेरावी :- प्रवाशांनी केलेल्या तक्रारीनुसार, काही वेळा महिला कंडक्टरही आपल्या पदाचा गैरफायदा घेत प्रवाशांशी उद्धटपणे वागतात. महिला प्रवाशांशी सौजन्याने वागण्याऐवजी कठोर शब्दांत बोलणे, दुर्लक्ष करणे यामुळे प्रवासी नाराज आहेत.

 गावोगाव थांबे न देण्याचा प्रकार :- खोपोली ते पनवेल मार्गांवर अनेक लहान गावे व वाड्या–वस्त्या आहेत. येथे प्रवासी बस थांबविण्याची विनंती करतात. मात्र, चालक–वाहक बहुतेक वेळा बस थांबवत नाहीत. यावरून प्रवाशांशी वाद घालणे, अगदी शिवीगाळ करणे यासारखे प्रकार होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

 प्रवाशांचा संताप आणि मागणी :- या सर्व परिस्थितीमुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. प्रवाशांच्या मूलभूत सुविधांकडे व सुरक्षित प्रवासाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.

प्रवाशांची मागणी :- एस.टी. प्रशासनाने तातडीने या बाबीकडे लक्ष द्यावे. बस वेळेवर सोडल्या जाव्यात. चालक व वाहकांना प्रवाशांशी सौजन्याने वागण्याचे प्रशिक्षण द्यावे. सुट्ट्या पैशांवरील वाद कायमस्वरूपी थांबवावेत. गावोगाव थांबे देण्याबाबत स्पष्ट धोरण आखावे.

प्रशासन व जनप्रतिनिधींनी घ्यावी दखल :- या सर्व समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी परिवहन मंत्री, रायगड जिल्ह्याच्या मंत्री आदिती तटकरे, भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्रशेठ थोरवे, खासदार श्रीरंग आप्पा बारणे तसेच खोपोलीतील आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, खालापुरातील आजी - माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विविध राजकीय पक्षांचे जिल्हा, तालुका व खोपोली शहरातील नेते, तसेच सामाजिक संघटना यांनी तातडीने पुढाकार घेऊन प्रवाशांना न्याय द्यावा, अशी नागरिकांची जोरदार मागणी आहे. प्रवाशांचा इशारा आहे की, संबंधित प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलली नाहीत, तर या अन्यायाविरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले जाईल.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home