Friday, September 26, 2025

मालमत्ता करावरील शास्ती माफी योजनेला कर्जत नगरपालिकेकडून सुरुवात

 

आमदार महेंद्र थोरवे आणि संकेत भासे यांच्या पाठपुराव्याला यश

कर्जत/सुधीर देशमुख :-नागरिकांना दिलासा देणारा निर्णय अखेर अमलात येत असून कर्जत नगरपरिषदेत मालमत्ता करावरील शास्ती माफी (अभय योजना) लागू करण्यात आली आहे. आमदार महेंद्र थोरवे यांच्या पुढाकारातून आणि माजी नगरसेवक संकेत भासे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही योजना कर्जत नगरपालिकेत प्रत्यक्षात राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नगरपरिषदेकडून घरपट्टी (मालमत्ता कर) आकारणी नियमित केली जाते. मात्र एखाद्या वर्षी किंवा अनेक वर्षे कर न भरल्यास थकबाकीवर दरमहा २ टक्के दंड आकारला जातो. कोरोनाच्या काळातील आर्थिक संकट, बंद पडलेले व्यवसाय आणि बिकट परिस्थितीमुळे अनेक नागरिक कर भरू शकले नाहीत, परिणामी थकबाकी आणि त्यावरील शास्ती मोठ्या प्रमाणात वाढली. राज्य शासनाने १९ मे २०२५ रोजी परिपत्रक काढून मालमत्ता करावरील दंड माफ करण्याच्या सूचनांसह अभय योजना लागू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु कर्जत नगरपरिषदेत या योजनेची अंमलबजावणी अनेक महिन्यांपासून प्रलंबित होती. या विलंबाबाबत संकेत भासे यांनी वारंवार मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन देत पाठपुरावा केला.

शेवटी आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून हा विषय वरिष्ठ पातळीवर नेण्यात आला आणि कर्जत नगरपरिषद प्रशासनाने योजना राबविण्याचा निर्णय घेतला. २४ सप्टेंबर ते २३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत नगरपरिषद कर विभागात अर्ज स्वीकारले जाणार असून १९ मे २०२५ पर्यंतच्या मालमत्ता करावरील थकबाकीवरील शास्ती पूर्णपणे माफ केली जाणार आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, वेळेत अर्ज करून थकबाकी निकाली काढावी, असे आवाहन आमदार महेंद्र थोरवे व माजी नगरसेवक संकेत भासे यांनी केले आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home