पक्षी चोरीप्रकरणी कर्जत पोलिसांची मोठी कामगिरी
चेन्नईतून लाखो रुपयांचे मौल्यवान विदेशी पक्षी हस्तगत ; दोन चोरटे अटकेत
खोपोली/ खलील सुर्वे :- कर्जत तालुक्यातील मौजे टेंभरे-आंबीवली येथून चोरी गेलेल्या साडेअकरा लाख रुपयांच्या मौल्यवान विदेशी पक्ष्यांचा शोध घेऊन त्यांची सुखरूप सुटका करण्यास कर्जत पोलिसांना यश आले आहे. चेन्नई, तामिळनाडूतून हे पक्षी हस्तगत करतांना दोन चोरट्यांना अटक करण्यात आली. कर्जत पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गुन्हा आणि आरोपी :- १७ जुलै २०२५ रोजी रात्री १.१९ वाजता दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक १८४/२०२५ अंतर्गत आरोपींनी ७ आफ्रिकन ग्रे पॅरट, १ ब्ल्यू-गोल्ड मकाव आणि १ स्कार्लेट मकाव असे एकूण नऊ दुर्मिळ विदेशी पक्षी चोरीस नेले होते. या पक्ष्यांची बाजारातील किंमत तब्बल ११ लाख २५ हजार रुपये इतकी आहे.
- आफ्रिकन ग्रे पॅरट (प्रत्येकी ७५ हजार) – बुद्धिमत्ता पाच वर्षांच्या मुलाइतकी ; संवादक्षम व ४० वर्षांचे आयुष्य
- ब्ल्यू-गोल्ड मकाव (२ लाख) – उत्तम शब्दसंग्रह व ६०-७० वर्षांचे आयुष्य
- स्कार्लेट मकाव (४ लाख) – आकर्षक, बोलक्या स्वभावाचे, संग्रहालयातही मागणी
अशा मौल्यवान पक्ष्यांची चोरी केल्याप्रकरणी अनिल रामचंद्र जाधव (१९, वावंढळ, खालापूर) व राजेशसिंग माही ऊर्फ समशेरसिंग (४३, महिपालपूर, दिल्ली) या दोन आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे.
तपासाची शृंखलाबद्ध मोहीम :- गुन्ह्याच्या सुरुवातीला घटनास्थळावरील सीसीटीव्ही बंद असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले. मात्र, तपास पथकाने घटनास्थळाच्या आसपासच्या असंख्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यातून आरोपींची छायाचित्रे हाती आली. गुप्त बातमीदारांच्या मदतीने ओळख पटवून, आरोपी अनिल जाधवला २ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या आरोपीचे नाव निष्पन्न झाले. अखेर चेन्नईहून चोरी गेलेले सर्व पक्षी हस्तगत करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना पोलिस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.
रायगड पोलिस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलिस अधीक्षक अभिजीत शिवथरे, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी कर्जत विभाग राहूल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी करण्यात आली. प्रत्यक्ष कारवाई पथकाचे नेतृत्व कर्जत पोलिस ठाणे पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांनी केले. या पथकात सहा. पोलीस निरीक्षक राहूल वरोटे, पो.उ.नि. किरण नवले, सुशांत वरक, समीर भोईर, स्वप्नील येरुणकर, प्रविण भालेराव, केशव नागरगोजे, विठ्ठल घावस या पोलिसांचा समावेश होता.
जनतेस आवाहन :- कर्जत पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मौल्यवान वस्तू, प्राणी किंवा पक्ष्यांच्या सुरक्षेबाबत आवश्यक ती खबरदारी घ्यावी. तसेच हॉटेल, फार्महाऊस किंवा व्यावसायिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्यांचे डीव्हीआर (DVR) सुरक्षित ठिकाणी ठेवावेत. सीसीटीव्ही व्यवस्थित कार्यरत आहेत का, याची वेळोवेळी खात्री करणे ही आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home