तहसील पुरवठा विभागात दलालांचा सुळसुळाट ?
कर्जतच्या पुरवठा विभागात भोंगळ कारभार
सर्वसामान्य नागरीकांची होतेय आर्थिक लूटमार
अधिकारी करतात जाणीवपूर्वक डोळेझाक
तहसिलदारांकडे तक्रारीनंतर पत्रकाराच्या घरी धाव
कर्जत / विशेष प्रतिनिधी :- रेशन कार्ड हे महत्त्वाचे दस्तऐवज आहे. रेशन कार्ड असलेल्या लोकांना परवडणाऱ्या किंमतीत विशिष्ट प्रमाणात आणि चांगल्या गुणवत्तेचे अन्नधान्य सरकारकडून दिले जाते. कर्जतच्या तहसील विभागात अनागोंदी कारभार सुरू असल्याचे दिसून येत असून या ठिकाणी अनधिकृतपणे काही लोक महसूल कर्मचारी असल्याचा वाव आणत जनसामान्य लोकांची विविध कामासाठी अर्थिक लूटमार करीत असल्याचे समोर आले आहे. सरकारी टेबलवर बसणाऱ्या खासगी व्यक्तींना त्याच विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पाठबळ मिळत असल्याची चर्चा रंगू लागली असून त्याच्या वरकमाईत आर्थिक समभाग असल्याचे समजत आहे. या सर्व प्रकारची चौकशी करण्याची मागणी नागरिक करू लागले आहेत.
काही सामान्य व्यक्ती रेशनकार्ड संदर्भात पुरवठा विभागात गेल्यास अपुऱ्या कागदपत्रामुळे अधिकारी वर्गांकडून माघारी पाठविण्यात येते. यावेळी मात्र तेथील टेबलवर काम करणारे लोक अधिकाऱ्यांची नजर चुकवून या लोकांचा पाठलाग करून माझ्याकडे एवढे पैसे व कागदपत्रे द्या, मी तुमचे काम करून देतो असे सांगण्यात येते. यामुळे पुरवठा विभागात अपुरी कागदपत्रे असले तरी देखील पैशांच्या जोरावर कामे करून दिली जात आहेत. असंख्य नागरिकांना रेशनकार्डसाठी आर्थिक लूटमार होत असल्याचा प्रत्यक्ष अनुभव आलेल्या नागरिकांनी माहिती दिली. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुरवठा विभागाची तात्काळ चौकशी करून अशा दलाल व कर्मचाऱ्यांना वेसन घालण्याची नितांत गरज भासू लागली आहे. तसेच ताबडतोब रेशन कार्ड मिळविण्यासाठी तीन हजार रुपये द्यावे लागत असून पैसे दिले नाहीत तर 'तारीख पे तारीख' मिळत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
प्रशासकीय भवनातील पुरवठा विभागात रेशनकार्डच्या विविध कामांसाठी हजारो रुपये उकळले जात असल्याच्या अनेक तक्रारी सर्वसामान्य नागरिक करू लागले आहेत. तर पुरवठा विभागात शासकीय नेमणूक नसतांना देखील खासगी व्यक्तीला अनधिकृतपणे टेबल समोर काम करण्यासाठी परवानगी दिली जात असल्याचे समोर आले आहे. पुरवठा विभागात सर्वसामान्य नागरिकांची लुटमार केली जात असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. तर पुरवठा विभागात किरकोळ कामकाजासह रेशनकार्ड काढण्यासाठी अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात असे सांगून सर्वसामान्य लोकांकडून हजारो रुपये घेतले जातात. यामुळे कर्जतच्या प्रशासकीय भवनात सध्या भोंगळ कारभार सुरु असल्याचे समोर आले आहे. पुरवठा विभागात सर्वसामान्य व्यक्ती तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून रेशनिंगचे विभक्त, दुबार, नाव कमी करणे, नाव वाढविणे यासाठी कामे घेऊन येत असतात. मात्र, कमी खर्चात होणाऱ्या कामांसाठी हजारो रुपये लुटले जातात, यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचे दिसून आले आहे. तर जे पैसे देतील त्या नागरिकांना तातडीने रेशन कार्डाची कामे करून दिली जातात, तर पैसे न देणाऱ्या नागरिकांना जाणीवपूर्वक खेटे घालण्यासाठी भाग पाडले जात आहे. यामुळे आता सर्वसामान्य जनतेची हेळसांड व लुटमार करणाऱ्यांना जरब बसविण्यासाठी अधिकारी याबाबत काय निर्णय घेतात याकडे आता लक्ष लागून आहे.
पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार आर. पी. दळवी यांना रेशनकार्ड किती दिवसांत मिळतो आणि त्यासाठी शासनाच्या नियमानुसार किती पैसे भरावे लागतात याची माहिती विचारली असता नवीन रेशन कार्डसाठी 20 रुपये आणि दुय्यमसाठी 40 रुपये लागतात व एक ते दोन किंवा त्यापेक्षा जास्त महिने लागू शकतात. कारण कर्जत तालुका खूप मोठा आहे आणि आम्हाला ही खूप काम असते. आता तुम्ही मला माहिती विचारता त्यामुळे किती वेळ गेला, दिवसभर असे किती लोक येतात त्यामुळे वेळ मिळत नाही अशी उडवाउडवीची उत्तरे देत दळवी यांनी पत्रकारांना माहिती देतांना सांगितले.
एका व्यक्तीला अंदाजे अर्ज करून वर्ष झाला तरी रेशन कार्ड मिळाला नसून अर्ज ही पुरवठा विभागात मिळत नसल्याची तक्रार पत्रकारांकडे केली आहे. तसेच तहसीलदार यांना याबाबत माहिती देण्यात आली. पत्रकार तथा न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे रायगड जिल्हाध्यक्ष राजेंद्र शिवाजी जाधव यांनी तहसिलदार व संबधित अधिकारी यांच्याकडे तक्रार केल्याने पुरवठा विभागात खळबळ उडाली आहे. पुरवठा विभागाच्या एका लोकसेवकाने पत्रकार राजेंद्र जाधव यांच्या घरी जावून मी पैसे घेतले नाही असे सांगितले. त्यामुळे आता वरिष्ठ अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती द्यायची की नाही ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशा बेजबादार..काम शून्य...कामचुकार अधिकाऱ्यावर वरिष्ठ अधिकारी कार्रवाई करतील का ? की भ्रष्टाचाराच्या गंगेत सर्वांनीच आंघोळ केली आहे का ? असा संतप्त सवाल पत्रकार राजेंद्र जाधव यांनी उपस्थित केला आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home