Saturday, September 27, 2025

विश्व आयुर्वेदिक दिनानिमित्त श्रीक्षेत्र उद्धर रामेश्वर येथे आयुर्वेद दिन साजरा!

 

भारतीय किसान संघ रायगड जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने उद्धर ग्रामपंचायतीमध्ये ५००० आयुर्वेदिक वृक्षांचे वाटप,रोपण

पाली/प्रतिनिधी :- राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, आयुष भारत मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत, पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सह सुविधा केंद्र, वनस्पतीशास्त्र विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि श्री रामेश्वर महादेव देवस्थान उद्धर व भारतीय किसान संघ रायगड जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने उद्धर ग्रामपंचायतीमध्ये ५००० आयुर्वेदिक वृक्षांचे वाटप व रोपण करण्यात आले.

 दहाव्या विश्व आयुर्वेद दिनानिमित्त दि. 23 सप्टेंबर 2025 रोजी देशभरात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सदरचा कार्यक्रम 25 सप्टेंबर 2025 रोजी उद्धर रामेश्वर येथे घेण्यात आला. या कार्यक्रमात आयुर्वेद शास्त्रात वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींचे वाटप व रोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मुख्यतः चार हजार बेल व एक हजार अर्जुनाच्या औषधी वनस्पतींचा समावेश होता. या कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रमुख संशोधक डॉ. दिगंबर मोकाट सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. दिगंबर मोकाट यांच्या संकल्पनेतून एक गाव एक औषधी वृक्ष यानुसार उद्धर- रामेश्वर येथे बेल व अर्जुन या वनस्पतींची लागवड करण्यात आली.

 या कार्यक्रमासाठी उद्धर ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्थानिक आयोजन श्री रामेश्वर महादेव देवस्थान व भारतीय किसान संघ रायगड जिल्हा यांचे वतीने करण्यात आले होते.

 श्री रामेश्वर महादेव देवस्थानच्या हद्दीत शंभर एकराची देवराई आहे. हे उद्धर गावचे भूषण आहे. या देवराईत सीता अशोक, केवडा, हादगा, अर्जुन,बेल व आंबा इत्यादी प्रकारच्या नैसर्गिकपणे वाढलेल्या वनौषधी आहेत. परंतु बऱ्याच प्रकारच्या वनौषधींची नागरिकांना माहिती नाही. या करिता देवस्थानच्या वतीने पुढाकार घेऊन काही वनौषधींचा परिचय व औषधी वनस्पतींची पुढील कालावधीत मागणी पाहता लागवड करावी या उद्देशाने देवस्थानने ४००० प् बेलाची व १००० अर्जुनाच्या वृक्षांची मागणी विद्यापीठाकडे केली होती.

 या कार्यक्रमात डॉ. दिगंबर मोकाट सरांनी अत्यंत साध्या सोप्या भाषेत विविध वनौषधींची माहिती प्रत्यक्ष जंगलात जाऊन करून दिली. तसेच या औषधांचा उपयोग आपण व्यवहारात कसा करू शकतो याविषयी देखील मार्गदर्शन केले. आपल्याकडील असलेल्या शेतीमध्ये विविध कृषीवानिकी पद्धतीचा अवलंब करून वनवृक्ष लागवडीसाठी एक महत्त्वाची मोहीम समजून त्यासाठी प्रचंड काम होणे आवश्यक आहे. उपवानांची निर्मिती करणे आवश्यक आहे. भविष्यात येऊ घातलेली घातक संकटे कमी करण्यास यामुळे निश्चित मदत होणार आहे. या वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धना बरोबरच आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार व्हावा. हा मूळ हेतू होता .

  या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या पाली पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक श्रीमती हेमलता शेरेकर यांनी आपल्या मार्गदर्शनात जीवनात आयुर्वेदाचे महत्त्व थोडक्यात सांगितले. या वनऔषधीमुळे आपले गाव जगात ओळखले जाईल. तसेच यामुळे आपल्याला रोजगार कसा उपलब्ध होईल याकडे ग्रामस्थांनी लक्ष द्यावे.असे म्हटले.

 या कार्यक्रमासाठी डॉ. दिगंबर मोकाट औषधी वनस्पती क्षेत्रीय सह सुविधा केंद्र पश्चिम विभाग ( राजस्थान गुजरात महाराष्ट्र व गोवा ) तसेच इर्जिक फाउंडेशन चे जनरल मॅनेजर मा.श्री. नितीनजी पाटील, पाली सुधागड पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक मा.श्रीमती हेमलता शेरेकर, भारतीय किसान संघ रायगड जिल्हा अध्यक्ष मा.श्री प्रमोद लांगी तसेच भा. कि. संघ रायगड जिल्हा महिला प्रमुख रसिका फाटक उपस्थित होत्या.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home