Sunday, August 17, 2025

वावोशी गावातील टिळक परिवाराची १५० वर्षांची परंपरा असणारा कृष्ण जन्माष्टमी सोहळा उत्सवात साजरा..

 

 सोहळ्यात भाजपा नगरसेविका मृणाल पेंडसे यांची विशेष उपस्थिती..

खालापुर/सुधीर देशमुख:- वावोशी गावातील टिळक कुटुंब आयोजित पारंपरिक कृष्ण जन्माष्टमी उत्सव यावर्षीही मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला. तब्बल १५० ते १७५ वर्षांची परंपरा असलेला हा उत्सव टिळक कुटुंबाच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात पार पडतो. मात्र ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग असल्याने हा खासगी उत्सव सामूहिक सोहळ्यात रूपांतरित झाल्याचे पाहायला मिळते.

     या प्रसंगी ह. भ. प. शेखर बुवा व्यास यांच्या कीर्तनासह पाळणा, न्हाऊ-माखू, कृष्ण लीला, टिपरी खेळ, तसेच “राधा कृष्ण जय कुंजविहारी” या भजनावर फेर अशा कार्यक्रमांना उपस्थितांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. मंद प्रकाशातील पारंपरिक काचेच्या हंड्यांमध्ये पार पडलेला कृष्णजन्म सोहळा अविस्मरणीय ठरला. यामध्ये तबलजी बल्लाळ ढवले यांनी दिलेली साथ आणि अनन्या अथर्व देव यांनी सादर केलेल्या अभंगामुळे कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली. या सोहळ्याला ठाणे येथील भाजपा महिला अध्यक्ष व नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. त्यांनी रविंद्र टिळक व मामा टिळक यांच्या निमंत्रणामुळे वावोशीला येण्याची संधी मिळाल्याचे सांगून, “मी देखील आता एक वावोशीकर असून यापुढे वावोशीसाठी काही करण्याची संधी मिळाली तर ती नक्कीच आवर्जून करेन,” असे मनोगत व्यक्त केले. तसेच ग्रामस्थांना जन्माष्टमीच्या शुभेच्छाही दिल्या. “परंपरा, भक्तीभाव आणि शिस्त यामुळे हा उत्सव आजही जिवंत आहे,” असे ९२ वर्षीय आजी विजया आबा टिळक यांनी आठवणी सांगताना नमूद केले. गावकऱ्यांनी व टिळक कुटुंबाने सहकार्य, सुसंवाद आणि परंपरेची सांगड घालत उत्सव यशस्वीरित्या साजरा केला. “मतभेद नाही, मनभेद नाही, फक्त परंपरा आणि उत्साह,” अशी भावना ग्रामस्थांमध्ये प्रकर्षाने दिसून आली.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home