पैसे घेतांनाचा शासकीय अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल
संबधित अधिकाऱ्याची चौकशी करा !
पत्रकार राजेंद्र जाधव यांची मागणी
कारवाई न झाल्यास आमरण उपोषण
कर्जत/ विशेष प्रतिनिधी :- सोशल मीडियावर कर्जतमधील एका सरकारी कनिष्ठ अभियंत्यांचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओत हे अधिकारी महाशय थेट कार्यालयाच्या बाहेर एका व्यक्तीकडून पैसे घेत असल्याचे दिसून येत आहे. मागील काही महिन्यापासून कर्जत तालुक्यात लाचखोरीच्या घटना वाढल्या आहेत. सरकारी अधिकारी सर्रासपणे लाच मागत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. त्यांच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक पथक लाचखोर अधिकाऱ्यांच्या मुसक्या देखील आवळत आहेत. तरीही लाचखोरीचे प्रमाण काही थांबण्याचे नाव घेत नाहीये.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत तालुक्यातील एक कनिष्ठ अभियंता कर्जत पंचायत समिती परीसरात या व्हिडीओत पैसे घेताना दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित खात्याचे वरिष्ठ अधिकारी आता तरी 'त्या' व्हिडीओ व अधिकाऱ्याची चौकशी करणार का ? असा प्रश्न अनेकजण उपस्थित करीत आहेत. कुणालाही न जुमानता उघडपणे पैसे घेणारे हे अधिकारी नेमके कुणाच्या पाठिंब्याने सर्वसामान्य जनतेची पिळवणूक करून भ्रष्टाचाराचा मार्ग पत्करत पैसा कमवत आहेत ? असा सवाल ही अनेकांनी उपस्थित केला आहे. अशा अधिकाऱ्याची चौकशी होऊन सत्य बाहेर येणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे रायगड जिल्हाध्यक्ष राजेंद्र शिवाजी जाधव यांनी व्यक्त केली आहे.
कर्जत तालुक्यातील कनिष्ठ अभियंता केलेल्या कामांचे ठेकेदाराकडून पैसे घेताना प्रसारित झालेल्या व्हिडिओवरून संबंधित अधिकाऱ्यांच्या सर्व कामांची चौकशी करावी, असे लेखी निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वरिष्ठ कार्यालयांना देवून न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे रायगड जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी आंदोलन व आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कर्जत येथील एक कनिष्ठ अभियंता यांनी ग्राम पंचायत व पंचायत समिती, जिल्हा परिषद आदी मंजुर झालेल्या बांधकाम कामाच्या सत्यतेबद्दल आम्हाला संशय आहे. कामे झालेली नसतांना देखील बिले पास करून घेतले जात असतात, असा आम्हाला संशय आहे. संबधित अधिकाऱ्याचा पैसे घेतांनाचा एक व्हिडिओ आमच्या जवळ आला असून शासकीय कार्यालयात बसून पैसे घेत असल्याचा हा व्हिडीओ आहे. त्या व्हिडीओची उच्च स्तरावरून चौकशी करण्यात यावी. ऐवढेच नव्हे तर शासकीय कागदपत्रे, निविदा, एमबी पुस्तक आणि पत्रक ठेकेदारांकडे बाहेर देण्यात असल्याची ही चर्चा आहे, तरी त्याचीही चौकशी होणे महत्वाचे आहे. ठेकेदार यांच्यासोबत साटेलोटे करून अनेक चुकीची कामे, अनधिकृत कामे संबधित कनिष्ठ अभियंता करीत आहेत. प्रशासनाने त्यांच्या चलअचल संपत्तीची चौकशी करावी, अशी आमची मागणी आहे, असे पत्रकार जाधव म्हणाले.
पत्रकार राजेंद्र जाधव यांनी माहिती देतांना सांगितले की, संबधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी कार्रवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत. निवेदन देवून दोन महिने उलटून ही या प्रकरणाची चौकशी होत नाही म्हणजे याच्या मागे अजून मोठे मासे असू शकतील, असा आम्हाला संशय आहे. येत्या दोन दिवसांत संबंधित कनिष्ठ अभियंत्याची चौकशी करून कार्रवाई करण्यात आली नाही तर आमच्या आंदोलनाला कर्जत पंचायत समिती, रायगड जिल्हा परिषद व महाराष्ट्र शासन यांची कायदेशीर परवानगी आहे, असे समजून कर्जत पंचायत समिती कार्यालयाच्या चौथऱ्यावर आमरण उपोषणास सुरुवात करण्यात येईल, अशा इशारा पत्रकार राजेंद्र जाधव यांनी दिला आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home