खोपोलीकरांचे 70 लाख रुपये परत करा !
* मुख्याधिकारी यांच्याविरोधात 'आप' आक्रमक
* टाटा पॉवरची परवानगी नसताना अनधिकृत बांधकाम
* उच्च न्यायालयाचा खोपोली नगर परिषदेला दणका
* अनाधिकृत बांधकामाला दिली स्थगिती
खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी नागरिकांच्या कराचे 70 लाख रुपये आपल्या खिशातून परत करावे अथवा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आम आदमी पार्टीतर्फे डॉं. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
खोपोली नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक सहा येथील शाळेच्या समोरील मैदानावर नगर परिषदेमार्फत अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. सदर मैदानावरून टाटा पावर कंपनी व मध्य रेल्वेची एक लाख दहा हजार व्होल्ट असलेली उच्चदाबाची विद्युत वाहिनी जात असून नगर परिषदेने सदर बांधकाम करण्याकरीता कोणतीही परवानगी घेतली नाही. टाटा पावर कंपनीतर्फे नगर परिषदेला सदर अनधिकृत बांधकाम हटविण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे.
नगर परिषदेने सदर बांधकाम करण्यापूर्वी टाटा पावर कंपनीची व मध्य रेल्वेची परवानगी घेणे अनिवार्य होते, परंतु तसे न केल्यामुळे नागरिकांच्या कराचे 70 लाख रुपये वाया गेले आहे. तरी खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉं. पंकज पाटील यांनी आपल्या खिशातून 70 लाख रुपये परत करावे अथवा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आम आदमी पार्टीतर्फे भारतरत्न डॉं. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
उच्च न्यायालयाने खोपोली नगर परिषदेला दणका दिला असून सदर कामावर स्थगिती लावली आहे. मुख्याधिकारी यांनी केलेले बांधकाम हे अनियमित असून अनधिकृत आहे व त्यांनी सदर कामाची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा, अशी मागणी आम आदमी पार्टीचे खोपोली शहर अध्यक्ष ग्यासुद्दीन खान यांनी केली.
आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही सोमवार, 4 ऑगस्ट 2025 रोजी रायगड जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करणार आहोत व तेथे सुद्धा न्याय न मिळाल्यास आझाद मैदानावर आंदोलन करू, असे आम आदमी पार्टी प्रदेश संघटन सचिव डॉं. रियाज पठाण यांनी सांगितले.
या आंदोलनात आम आदमी पार्टी खोपोली शहर उपाध्यक्ष विवेक वाघमारे, शहर सचिव चंद्रप्रकाश उपाध्याय, खालापूर तालुका उपाध्यक्ष कस्तुरचंद राठोड, शहर उपाध्यक्ष परमेश्वर कट्टीमनी, प्रभाग क्रमांक पाच अध्यक्ष भगवान पवार, सुमित नांगरे, राम पवार, जितेश सुतार यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home