कोकणातील पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार - रवी गिते
* न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी व राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्वे यांनी घेतली कोकण विभागीय माहिती उपसंचालक यांची भेट
नवी मुंबई / प्रतिनिधी :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील वरिष्ठ अधिकारी रवी गिते यांनी नुकताच कोकण विभागीय माहिती उपसंचालक या पदाचा कार्यभार स्विकारला आहे. दरम्यान, न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष तथा दैनिक कोकण प्रदेश न्यूजचे मुख्य संपादक फिरोज पिंजारी, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा साप्ताहीक खालापूर वादळचे मुख्य संपादक खलील सुर्वे यांनी नुकतीच नवनियुक्त कोकण विभागीय माहिती उपसंचालक रवी गिते यांची भेट घेत न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन संघटनेच्या वतीने त्यांचा शाल व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देत कोकणात स्वागत व पदोन्नती मिळाल्याबद्दल सत्कार केला.
याप्रसंगी कोकण विभागीय माहिती उपसंचालक रवी गिते यांच्याशी संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी यांनी पत्रकारांच्या विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. रायगडासह कोकणातील विविध समस्या, अडचणींची त्यांनी माहिती दिली. दरम्यान, कोकणासह राज्यातील सर्व जिल्हा माहिती कार्यालयात साप्ताहीक, दैनिक, मासिक या वृत्तपत्रांची व त्यांच्या प्रतिनिधींची जशी नोंद केली जाते. तशीच नोंद त्या त्या जिल्ह्यातील वेब पोर्टल, ब्लॉग स्पॉट, युट्युब व तत्सम डिजीटल मिडीयाशी संबधित पत्रकार व त्यांच्या माध्यमांची देखील नोंद घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
जिल्हा माहिती कार्यालयाला डिजिटल मिडीयाच्या पत्रकारांना सोयीसुविधा देता येत नसल्या तरी कमीत कमी त्यांची नोंद जिल्हा माहिती कार्यालयात झाल्यास कोणत्या जिल्ह्यात कोणते डिजीटल माध्यम आहे व त्याचा प्रतिनिधी कौन आहे? याचा तपशील तरी जिल्हा माहिती कार्यालय व राज्य शासनाकडे उपलब्ध राहील, अशी प्रतिक्रिया फिरोज पिंजारी यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्वे यांनी देखील पत्रकारांच्या न्याय हक्काबाबत चर्चा केली. दरम्यान, यावर कोकण विभागीय माहिती गिते म्हणाले की, डिजिटल मिडीयाच्या पत्रकारांच्या नोंदणीचा विषय हा वरीष्ठ स्तरावरील आहे. पण आपण तसे निवेदन दिल्यास आम्ही देखील वरिष्ठ स्तरावर हा विषय मांडू तसेच कोकणातील पत्रकारांच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन, असे आश्वासन नवनियुक्त कोकण विभागीय माहिती उपसंचालक रवी गिते यांनी दिले.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home