कौशल्य आत्मसात करीत आयुष्याला ध्येयापर्यंत पोहचवा!
* कर्जत येथील लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात मान्यवरांचे विद्यार्थ्यांना आवाहन
कर्जत / प्रतिनिधी :- कर्जत येथील 'लाईट ऑफ लाईफ' ट्रस्टचा प्रमाणपत्र वितरण समारंभ मंगळवार, 29 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता कर्जत शहरातील सेंटरमध्ये विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध कौशल्य आत्मसात करीत आयुष्याला ध्येयापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन याप्रसंगी मान्यवरांनी केले.
याप्रसंगी कृषी संशोधन केंद्र कर्जत येथील एक्स्टेंशन एज्युकेशन सायंटिस्ट डॉं. रवींद्र मर्दाने, केजीकेसी महाविद्यालयाचे प्रो. डॉं. उपाध्ये, दै. कोकण प्रदेश न्यूजचे मुख्य संपादक तथा स्वदेश न्यूजचे महाराष्ट्र हेड रिपोर्टर फिरोज पिंजारी, शारदा एज्युकेशन इन्स्टिट्यूट डायरेक्टर महेश साळवी, लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट जागृती प्रकल्प डिव्हिजन हेड गौतम कनोजे, प्लेसमेंट को ऑर्डिनेटर तानाजी मिणमिणे, महिला अर्थसहाय्य संयोजक रजनी शाम पत्रे, इलेक्ट्रिशियन ट्रेनर सुनील जाधव आदी उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या वतीने प्रमुख पाहुणे व मान्यवरांचा स्वागत समारंभ पार पडला. यावेळी मार्गदर्शन करतांना कर्जत येथील एक्स्टेंशन एज्युकेशन सायंटिस्ट डॉं. रवींद्र मर्दाने म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पहावी आणि ती साकार करण्यासाठी प्रयत्नशील रहावे. केजीकेसी महाविद्यालयाचे प्रो. डॉं. उपाध्ये यांनी कौशल्य आत्मसात करण्याबरोबरच आत्मविश्वास वृद्धिंगत करण्याचे महत्त्व समजावून सांगितले.
दै. कोकण प्रदेश न्यूजचे मुख्य संपादक तथा स्वदेश न्यूजचे महाराष्ट्र हेड रिपोर्टर फिरोज पिंजारी यांनी कौशल्य शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करीत प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्याला रोजीरोटीसाठी घडविणाऱ्या लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचे उपकार मानून जास्तीत जास्त तरूणापर्यंत ट्रस्टची माहिती पोहचवावी. ट्रस्टच्या विविध कोर्सला विद्यार्थी कसे येतील, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. शारदा एज्युकेशन इन्स्टिट्यूट डायरेक्टर महेश साळवी यांनी योग्य कोर्स निवडीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचा समारोप व विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे कार्य लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट जागृती प्रकल्प डिव्हिजन हेड गौतम कनोजे यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. यावेळी प्लेसमेंट को-ऑर्डिनेटर तानाजी मिणमिणे, इलेक्ट्रिशियन ट्रेनर सुनील जाधव व महिला अर्थसहाय्य संयोजक रजनी शाम पत्रे यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात संस्थेचा उद्देश, प्रशिक्षणाचे महत्त्व आणि ट्रस्टचे कार्य प्रभावीपणे सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मनोगतातून स्वतःमध्ये झालेला सकारात्मक बदल शेअर केला. प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेंटर को ऑर्डिनेटर सागर खंडागळे यांनी केले. शेवटी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांना किट (साहित्य) वितरण करण्यात आले. राजू ढोले यांनी आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home