Sunday, April 27, 2025

खोपोलीतील गरुड झेप अभ्यासिका दुर्लक्षित

 


* शिळफाटा येथे असणाऱ्या विद्यार्थी अभ्यासिका येथील विद्यार्थी वर्गांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष


* खोपोली-खालापूर तालुका संघर्ष समिती करणार पाठपुरावा

खोपोली / प्रतिनिधी :- रायगडचे तत्कालीन जिल्हाधिकारी तथा कोकण आयुक्त महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतुन खोपोली शिळफाटा येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी वर्गासाठी गरूड झेप अभ्यासिकेचा आरंभ करण्यात आला होता. खालापूरचे तत्कालीन तहसिलदार अय्युब तांबोळी यांच्या कल्पक मार्गदर्शनाखाली सदर अभ्यासिका चांगल्या प्रकारे कार्यरत होती. आजपर्यंत साधारण 23 विद्यार्थी प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत, हे या अभ्यासिकेचे यश आहे.

परंतु गेल्या एक ते दीड महिन्यापासून विद्यार्थी असुविधेचा सामना करीत आहेत.अनेक वेळा अर्ज करूनही प्रशासन या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. अभ्यासिकेत अभ्यास करणारे विद्यार्थी हे समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थी आहेत. नोकरी करून पुढील शिक्षण घेणारे विद्यार्थी हे या अभ्यासिकेतील वाढीव वेळ मिळावा यासाठी आग्रही असुन पिण्याचे पाणी याची गैरसोय असून स्वछतागृहाची स्वछता विद्यार्थीच करीत असतात व सदर ठिकाणी वायफाय (Wi-Fi) ची व्यवस्था सुध्दा विद्यार्थी स्वत: पदरमोड करून करीत आहेत.


यातुन मार्ग निघत नसल्याने विद्यार्थी वर्गांने खोपोली खालापूर तालुका संघर्ष समितीकडे 27 एप्रिल 2025 रोजी याकडे लक्ष द्यावे, अशी लेखी विनंती केली आहे. त्यानंतर खोपोली खालापूर तालुका संघर्ष समितीच्या वतीने डॉं. शेखर जांभळे व मोहन केदार यांनी सदर ठिकाणी जावून पाहणी करून विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. विद्यार्थी वर्गांने यावर मार्ग काढल्यास अभ्यासात अधिक लक्ष देता येईल हे वास्तव सत्य मांडले आहे.


सदर अभ्यासिका चांगल्या प्रकारे कार्यरत असून शासनाने अधिक लक्ष देऊन विद्यार्थ्यांना सोयी उपलब्ध करून द्याव्या यासाठी शासन दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून प्रसंगी न्याय मिळविण्यासाठी आंदोलन करण्याची तयारी असल्याचे खोपोली खालापूर तालुका संघर्ष समितीच्या वतीने डॉं. शेखर जांभळे व मोहन केदार यांनी सांगितले आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home