खोपोलीत सहज स्वर्गरथ पुन्हा सेवेत दाखल !
* खोपोली नगरपालिका हद्दीतील निधन झालेल्या व्यक्तींच्या घरापासून ते स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी निःशुल्क सहज सेवा
खोपोली / प्रतिनिधी :- सहज सेवा फाउंडेशन समाजाप्रती सातत्यपूर्ण सेवा कार्य करीत असते. डॉं. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, खोपोली येथे ऍडमिट असणाऱ्या रुग्णांसाठी दोन वेळचे नि:शुल्क जेवण, मृत झालेले नातेवाईक दुरून येणार असतील तर नि:शुल्क शवपेटी व्यवस्था, अल्प काळासाठी लागणारी वैद्यकीय उपकरणे, दरवर्षी पार पडणारा सामुदायिक विवाह सोहळा, शाळा व कॉंलेजमध्ये लैंगिक शिक्षण व सायबर मार्गदर्शन, वैद्यकीय शिबीरे तसेच आदिवासी पाड्यावर जनजागृती यासारखे उपक्रम सातत्याने राबवित असतात. 8 मार्च 2025 पासून खोपोली शहरातील दवाखान्यात कन्येस जन्म देणाऱ्या मातांचा व कन्येचा सन्मान हा उपक्रम समाजाचे आगळे-वेगळे प्रतिनिधित्व करणारा ठरत आहे. संस्थेने विविध उपक्रमातून जागतिक उपक्रम देखील प्रस्थापित केलेले आहेत.
खोपोली शहरातील निधन झाल्यावर होणारी त्रासिक बाब पाहता सहज सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉं. शेखर जांभळे यांनी आपले वडील स्व. तुळशीदास शंकर जांभळे यांच्या स्मरणार्थ 17 सप्टेंबर 2020 रोजी खोपोली शहरात सामाजिक बांधिलकीच्या अनुषंगाने नि:शुल्क तत्वावर स्वर्गरथ सेवा सुरु केली. आजपर्यत 1300 पेक्षा जास्त वेळा ही निःशुल्क सेवा पुरविण्यात आली आहे.
खोपोली शहरात 5 वर्ष सातत्याने ही सेवा सुरु आहे. स्वर्गरथ दुरुस्तीच्या कामासाठी असल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. यासंबंधी सहज सेवा फाउंडेशनने दिलगिरी व्यक्त करून लवकरात लवकर स्वर्गरथ दुरुस्तीचे काम करून घेऊन 1 मे 2025 रोजी नव्याने खोपोलीकरांना सुपूर्द करण्याचा मानस असताना 28 एप्रिल 2025 रोजी खोपोली युवा नेते राहुल जाधव यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याने ही सेवा कोणताही सोपस्कार न करता 28 एप्रिल 2025 पासून सुरु करण्यात आली.
ही सेवा अखंडपणे सुरु राहण्यासाठी नागरिकांनी काही नियम पाळून सहकार्य करावे, अशी विनंती करताना प्रत्येक धर्माच्या रितीप्रमाणे धार्मिक गीताची सोय या स्वर्गरथमध्ये आहे. गरीब ते श्रीमंत सर्वांना सन्मानपूर्वक सेवा चोविस तास दिली जाते. कळत नकळत सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार सहज सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉं. शेखर अलका तुळशीदास जांभळे यांनी मानले आहेत.



0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home