रायगड जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सज्ज
अक्षय तृतीयेला विशेष दक्षता
रायगड / प्रतिनिधी :- राज्यातील ग्रामीण व आदिवासी भागांमध्ये विशेषतः अक्षय तृतीयेसारख्या शुभमुहूर्तावर बालविवाहांचे प्रमाण वाढते. त्यामुळे जिल्ह्यात यंदा बालविवाह होऊ नये म्हणून सर्व संबंधित यंत्रणांना सतर्कतेचा बाळगावी तसेच दुर्गम भागात जनजागृती करावी अश्या सूचना अपर जिल्हादंडाधिकारी सुनील थोरवे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत दिल्या.
विविध यंत्रणांनी आतापर्यंत घेतलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ अन्वये मुलीचे वय १८ वर्षे व मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण असावे लागते. अन्यथा संबंधितांवर एक लाख रुपये दंड व दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा होऊ शकते. विवाह सोहळ्यात सहभागी पुरोहित, मंडप व्यावसायिक, वर-वधूंचे पालक तसेच ग्रामसेवक, पोलिस पाटील, सरपंच यांच्यावरही कारवाईची तरतूद आहे.
अक्षय तृतीया सण ३० एप्रिल २०२५ रोजी असल्याने त्यादिवशी विशेषतः धार्मिक स्थळे, मंगल कार्यालये, बीचवरील हॉटेल्स यावर लक्ष ठेवण्यात येईल. गावांमध्ये विवाह कार्यक्रम होत असल्यास सरपंच, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका आणि ग्रामसेवक यांनी मुला-मुलींच्या वयाची शहानिशा करावी, असे आदेश अपर जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले.
ग्राम बाल संरक्षण समित्यांच्या माध्यमातून बालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात. आदिवासी प्रकल्प विभागाला किशोरवयीन मुलामुलींची माहिती घेऊन स्थानिक यंत्रणांना पाठपुरावा करण्याच्या सूचना दिल्या.
रायगड जिल्ह्यातील पेण, पनवेल, उरण, सुधागड पाली आणि कर्जत तालुक्यात विशेष लक्ष देण्यात येणार असून, गावांमध्ये बैठका घेऊन बालविवाह प्रतिबंधासाठी प्रभावी पावले उचलली जाणार आहेत.
बालविवाहासारख्या अघोरी प्रथेला आळा घालण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे आणि रायगड जिल्ह्याला बालविवाहमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
१०९८ टोल फ्री क्रमांक :- जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी १०९८ या टोल फ्री क्रमांक माहिती द्यावी. या क्रमांकावर माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.
.jpeg)

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home