Wednesday, April 30, 2025

पावसाळ्यापूर्वी दरडग्रस्त सुभाषनगर परिसर संरक्षित करा !

 



* भूस्खलनापासून सुभाषनगरच्या बचावासाठी उपाययोजना करण्याची माजी नगरसेवक मंगेश दळवी यांची मागणी


खोपोली / मानसी कांबळे :- मे महिना सुरू झाला आहे. मान्सून एका महिन्यांवर येवून ठेपला आहे. पावसाळा जसजसा जवळ येतो, तसतसा सुभाषनगरांचा जीव टांगणीला लागतो. मागील अनेक वर्षापासून मृत्यूला सुभाष नगरकर हुलकावणी देत आहेत, पण यंदा काय होईल ? दरड कोसळेल का ? सुभाषनगरची इर्शाळवाडी, तळई, माळीण होईल का ? असे विविध प्रश्न मनात पिंगा घालत असतात. यंदाही अशीच भिती उद्भवत असून पावसाळ्यापूर्वी दरडग्रस्त सुभाषनगर परिसरात संरक्षण उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे. 


खोपोली नगर परिषदेचे माजी सभापती तथा प्रभाग क्रमांक 1 चे नेते मंगेश दळवी यांनी खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉं. पंकज पाटील यांना या संदर्भात निवेदन दिले असून निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, रायगड जिल्ह्यातील खोपोली नगर परिषद हद्दीतील सुभाषनगर वस्ती डोंगराच्या पायथ्याशी वसली आहे. सरासरी 3000 ते 3500 लोकवस्ती असलेल्या या परिसरात दर पावसाळ्यात भितीचे वातावरण असते. खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथील घटनेनंतर लोकांच्या मनात भिती अधिकच गडद झाली आहे. संरक्षण भिंत उभारावी अशी मागणी होत आहे. यासाठी निधी देखील मंजूर झाल्याचे समजते. परंतु अद्याप कामाला सुरूवात झालेली नाही आणि पावसाळा 1 महिन्यांवर येवून ठेपला आहे. अशा परिस्थितीत सुभाषनगर येथील नागरिकांच्या सुरक्षेसाठी तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना करण्यात याव्यात. डोंगराळ भागात मागे ज्या पध्दतीने खड्डा खोदण्यात आला होता, तसा खड्डा खोदण्यात यावा. जेणे करून डोंगरातून येणारे दगड व माती त्या खड्ड्यात पडेल व नागरीकांना धोका कमी पोहचेल. तसेच ज्या भागातील खडक ठिसूळ झाला आहे, त्या भागात संरक्षण जाळी मारण्यात यावी. जेणे करून डोंगरातून येणारे दगड त्यात अडकतील व नागरीकांच्या घरांना कमी धोका पोहचेल, यासोबतच पावसाळ्यात या डोंगराळ भागात बांबू लागवड करण्यात यावी. बांबू लागवड करण्यात आल्यास डोंगरावरील माती खचणार नाही तसेच परिसरात हिरवळ देखील राहिल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 


त्याचप्रमाणे पावसाळ्यापूर्वी महिंद्रा कंपनीच्या इमारतीचे नुतनीकरण करून त्या ठिकाणी स्थलांतर संदर्भात योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात. या संदर्भातील पत्रव्यवहार तसेच परवानग्या या पावसाळ्यापूर्वी घेण्यात याव्यात. त्याचप्रमाणे सुभाषनगर परिसरातील नाले, गटारी यातील गाळ पावसाळ्यापूर्वी काढण्यात यावा, जेणे करून डोंगरातून येणारे पाणी तुंबणार नाही व नागरीकांना समस्यांचा सामना करावा लागणार नाही. आजूबाजूच्या झाडांची छाटणी देखील करण्यात यावी, तरी संबधित उपाययोजना नगर परिषद पातळीवर करण्याबाबत योग्य ते निर्देश देण्यात यावेत, असे आवाहन माजी नगरसेवक मंगेश दळवी यांनी केले आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home