कर्जत आमराई येथील शौचालयाची अवस्था बिकट
* अस्वच्छताच...अस्वच्छता
* स्वच्छतागृहाचे दरवाजे तुटले
* पाण्याच्या अभावाने दुर्गंधी
* नागरिकांचे आरोग्य धोक्यात
कर्जत / नरेश जाधव :- स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ कर्जत...सुंदर कर्जतचा नारा देण्यात येत असला तरी लाखों रुपये खर्च करूनही कर्जतकरांना चांगल्या सुविधा व स्वच्छ, सुंदर, आरोग्यदायक सुविधा मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
कर्जत नगर परिषद हद्दीतील वॉंर्ड क्रमांक 3 मधील आमराई परिसरात नागरीकांसाठी शौचालय बनविण्यात आले असून या शौचालयातील अतिशय दुरावस्था झाली आहे. गेलेल्या अनेक महिन्यांपासून सुविधांपासून वंचित असलेल्या या शौचालयाबाबत ठेकेदार, आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी सर्वच उदासिन असल्याचे दिसून येत आहे. गुगल मॅपवर शौचालयांची माहिती देण्यात आल्याचा डंका पिटण्यात आला असला तरी प्रत्यक्षात या शौचालयात सुविधा देणेच कर्जत नगर परिषद प्रशासन विसरले असल्याचे दिसून येत आहे.
येथील स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, या शौचालयातील अनेक स्वच्छतागृहांचे दरवाजे तुटले आहेत, गेल्या अनेक महिन्यापासून या ठिकाणी पाणी नाही, पाईप फुटल्यानंतर कठडे तोडण्यात आले होते परंतु पाईप दुरूस्तीनंतर सदर कठडा बनविण्यात आला नाही. तो ज्या पध्दतीने तोडण्यात आला होता, तसाच आजही आहे. सदर शौचालय उल्हास नदीच्या किनाऱ्यावर आहे, त्यामुळे यातील घाण या नदीपात्रात जात असल्याचे नागरीकांनी सांगितले.
स्वच्छता कर्मचारी या शौचालयाकडे ढुंकून सुध्दा पाहत नाहीत. गेल्या अनेक महिन्यापासून या भागात झाडझुड अथवा स्वच्छता झालेली नाही. पाणी नसल्याने कधी-कधी दुर्गंधी देखील पसरते. या भागातील नागरीकांच्या आरोग्याबाबत कर्जत नगर परिषद प्रशासन उदासिन असल्याचे दिसून येत आहे. तरी या शौचालयाची लवकरात लवकर दुरूस्ती करण्यात यावी, शौचालयात पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, डागडुजी गरज असलेल्या ठिकाणी डागडुजी करून पडझड रोखावी...त्याच प्रमाणे आमराई परिसरातील या शौचालयाच्या दुरूस्ती व देखभालीची जबाबदारी स्थानिक नागरीक किवा युवकांवर देण्यात यावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते, युवा नेतृत्व अविनाश संजय जाधव यांनी केले आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home