Thursday, August 14, 2025

कर्जत रेल्वे पोलिसांची प्रामाणिक कामगिरी

 


हरवलेली पिशवी व 21 हजार रुपये प्रवाशाला परत

नरेश जाधव / कर्जत: - प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेचा उत्तम आदर्श घालून देत कर्जत रेल्वे पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी हरवलेली पिशवी व त्यातील 21 हजार रुपये मालकाला सुखरूप परत केले. या कामगिरीबद्दल प्रवाशांनी कर्जत रेल्वे पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले.


मिळालेल्या माहितीनुसार, दि. 14 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9.00 ते रात्री 9.00 या वेळेत कर्जत रेल्वे स्टेशनवर दिवसपाळी ड्युटी सुरु असताना CRO मार्फत कळविण्यात आले की, मुंबईहून कर्जतला येणाऱ्या सकाळी 11.55 वाजताच्या लोकलच्या CSMT बाजूच्या चौथ्या जनरल डब्यात एक काळ्या रंगाची प्लास्टिक पिशवी राहिली आहे.

त्यानुसार पोलिस शिपाई (ब.क्र. 373) गोरख मासाळ, महिला होमगार्ड मोहिनी जाधव, कल्याणी काळेकर आणि प्रणाली गोळे यांनी तत्काळ गाडी तपासून पिशवी शोधून काढली. पिशवीत महत्त्वाची कागदपत्रे व रोख 21,000 रुपये सापडले.


यानंतर ठाणे अंमलदार महिला पोलिस हवालदार (ब.क्र. 2262) सुमित्रा दोंदे यांनी पिशवीतील तपशीलावरून बदलापूर, जिल्हा ठाणे येथील 69 वर्षीय प्रवासी सय्यद जावेद जफर आबीदी (मो. 8369163873) यांच्याशी संपर्क साधला. चौकशीअंती पिशवी व त्यातील रोकड त्यांना प्रत्यक्ष सुपूर्द करण्यात आली.


आपले हरवलेले पैसे व कागदपत्रे सुखरूप परत मिळाल्याबद्दल सय्यद आबीदी यांनी कर्जत रेल्वे पोलिसांचे कौतुक करत आभार मानले. या संपूर्ण कारवाईत कर्जत रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पोलिस व होमगार्ड यांनी प्रामाणिकपणे काम पार पाडले.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home