Tuesday, February 3, 2026

छत्रपती शाहू महाराज शाळेत पार पडला ''हॅपी स्कुल " चा अनोखा उपक्रम...

 



खालापुर कर्जत/सुधीर देशमुख :- छत्रपती शाहू महाराज शाळेला "हॅपी स्कूल" म्हणून सजवण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन इनरव्हिल क्लबच्या जिल्हा अध्यक्षा डॉ. सावित्री रघुपती यांनी केले.


शाळेतील 10 वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी कशी करावी याचे प्रशिक्षण हिंदवी शाह यांनी दिले. कार्यक्रमात 150 विद्यार्थ्यांना पेन व बिस्किटे वाटण्यात आली. शाळेला स्पोर्ट्सचे साहित्य, पुस्तके, 2 व्हाईट बोर्ड आणि बोलक्या भिंती रंगवून देण्यात आल्या.


ही सेवा इनरव्हिल क्लब खोपोलीच्या सदस्या आणि क्लबच्या डोनेशनमधून करण्यात आली.  कार्यक्रमाला अध्यक्ष दिना शाह, आयपीपी जयश्री कलोशी, सेक्रेटरी मधुमिता पाटील, डॉ. सावित्री रघुपती, आयएसओ वर्षा शिवलकर, दिव्या मश्रू, रमिला पटेल, सारिका धोत्रे, डॉ. अर्चना जाखोटिया, अरुणा, तारा आणि मनीषा उपस्थित होत्या. शाळेचे मुख्याध्यापक बिचकर सर आणि शिक्षकही उपस्थित होते.

एक भावूक निरोप : लोकनेत्याच्या स्मृतींना खोपोलीकरांचे अभिवादन

 


खोपोली / मानसी कांबळे :- आजचा दिवस खालापूर तालुक्यासाठी अत्यंत जड अंतःकरणाचा आणि भावूक करणारा ठरला. जनसामान्यांचे नेते, स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अस्थिकलश आज दर्शनासाठी खालापूर तालुक्यातील विविध गावांतून फिरवण्यात आला. ज्या हातांनी विकासाची गंगा घराघरांत पोहोचवली, आज त्याच नेतृत्वाच्या पवित्र स्मृतींचे दर्शन घेतांना प्रत्येकाचे डोळे पाणावले होते.


* खोपोलीत जनसागराची श्रद्धांजली :- आज खोपोली शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात हा अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा मुजरा देण्यासाठी सकाळपासूनच खोपोलीकरांनी गर्दी केली होती. कार्यालयाचा परिसर केवळ एका राजकीय पक्षाचे कार्यालय न राहता, आदरांजली वाहणाऱ्या एका विशाल कुटुंबाचे केंद्र बनले होते.


* राजकारण पलीकडची आदरांजली :- उपमुख्यमंत्री अजितदादांचे व्यक्तिमत्व हे केवळ एका पक्षापुरते मर्यादित नव्हते, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. याप्रसंगी खोपोली शहरातील सर्वच राजकीय पक्षांचे ज्येष्ठ नेते, खोपोली नगर परिषदेचे सर्व पक्षांचे नगरसेवक व नगरसेविका, तसेच नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांनी आवर्जून उपस्थित राहून दादांच्या पवित्र स्मृतींना पुष्पहार अर्पण केला





Monday, February 2, 2026

खोपोली नगर परिषदेत वयोवृद्धांची गांधीगिरी!

 


* 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने बांधकाम अभियंता अनिल वाणींच्या दारात अर्धनग्न आक्रोश

* प्रशासनाच्या मुजोरीला कंटाळून शासकीय कार्यालयात न्यायासाठी कपडे काढले

* पाच वर्षांपासून गटाराच्या प्रलंबित कामासाठी 100+ फेऱ्या मारूनही दुर्लक्ष

* पोटं भरत नसतील तर आमचे कपडे घ्या, पण काम करा - संतप्त वृद्धाचा भावुक उद्गार


खोपोली / मानसी कांबळे - खलील सुर्वे :- एका 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला न्याय मिळविण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले, तेही अर्धनग्न होऊन...खोपोली नगर परिषदेच्या ढिसाळ, निष्क्रिय आणि अमानवी कारभाराने एका वयोवृद्धाला अक्षरशः गांधीगिरीचा मार्ग अवलंबवा लागला. ही घटना केवळ एका व्यक्तीची व्यथा नाही, तर संपूर्ण शहरातील प्रशासकीय उदासीनतेचे आणि बेजबाबदारपणाचे जिवंत उदाहरण आहे.


खोपोली येथील रहिवासी कस्तुरचंद चुनाजी राठोड (वय 67) हे गेल्या पाच वर्षांपासून आपल्या घरासमोरील गटार बांधकामाच्या प्रलंबित कामासाठी नगर परिषदेचे उंबरठे झिजवत आहेत. तब्बल शंभराहून अधिक फेऱ्या मारूनही नगर अभियंता अनिल वाणी आणि संबंधित प्रशासनाने त्यांच्या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.


पावसाळ्यातील पाणी साचणे, दुर्गंधी, आरोग्य धोका हे सर्व सहन करीत - करीत अखेर त्यांची सहनशक्ती संपली. सोमवार, 2 फेब्रुवारी 2026 रोजी नगर परिषदेच्या कार्यालयात थेट अनिल वाणी यांच्या समोर जाऊन राठोड यांनी अर्धनग्न होत आंदोलन केले. हातात फलक घेऊन, भावुक होऊन त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना विचारले की, “अधिकाऱ्यांची पोटं भरत नसतील तर आमचे कपडे घ्या... पण आमचे काम तरी करा!”


हा आक्रोश ऐकून उपस्थित नागरिकांच्या डोळ्यांत पाणी आले. एका वयोवृद्धाला अशा टोकाच्या पावलापर्यंत आणणाऱ्या प्रशासनाच्या मुजोरीबद्दल संताप व्यक्त होत आहे. “हे गांधीजींच्या सत्याग्रहासारखे आहे, अन्यायाविरुद्ध अहिंसक लढा, पण प्रशासनाने तरी जाग यावी!” अशी प्रतिक्रिया शहरवासीयांकडून येत आहे.


या घटनेनंतरही नगर परिषद प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. गटार काम सुरू होईल की नाही, याकडे आता संपूर्ण खोपोलीचे लक्ष लागले आहे. नागरिकांनी जोरदार मागणी केली आहे की, संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई व्हावी. राठोड यांच्या घरासमोरील गटार बांधकाम तातडीने सुरू व्हावे, नगर परिषदेच्या ढिसाळ कारभाराची चौकशी व्हावी.


खोपोली प्रशासनाने आता तरी जाग व्हावे...एका वयोवृद्ध नागरिकाच्या अश्रू आणि आक्रोशाने शहर जागे झाले आहे. अन्याय सहन करण्याची मर्यादा ओलांडली की, गांधीगिरीही टोकाची होते हे या घटनेने सिद्ध झाले. आता फक्त शब्द नाहीत, कृती हवी, अशी प्रतिक्रिया खोपोलीतून उमटत आहेत. खोपोलीचे मुख्याधिकारी डॉं. पंकज पाटील, नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, बांधकाम सभापती अनिल सानप सह खोपोलीतील सर्वपक्षीय नेते, लोकप्रतिनिधी वयोवृध्द कस्तुरचंद चुनाजी राठोड यांना न्याय देणार का ? की आमरण उपोषण, आंदोलन केल्याशिवाय राठोड यांना न्याय मिळणार नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.



Sunday, February 1, 2026

खोपोली नगर परिषदेचे 6 आरटीआय अर्ज फेटाळल्याने खळबळ

 


माहिती लपवली जात आहे का ? डॉं. रियाज पठाण यांचा गंभीर सवाल

* केंद्रीय माहिती आयोगाच्या आदेशांकडे दुर्लक्षाचा आरोप


खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली नगर परिषद यांनी केंद्रीय माहिती आयोगाच्या स्पष्ट आदेशांचा योग्य अभ्यास न करता तब्बल सहा आरटीआय अर्ज थेट फेटाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे नगर परिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शहरात एकच खळबळ उडाली आहे.


या प्रकरणावर तीव्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत डॉं. रियाज पठाण यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. नगर परिषद माहिती का लपवत आहे ? नेमके कोणते घोटाळे झाकण्याचा प्रयत्न सुरू आहे ? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आरटीआय अर्ज फेटाळण्यामागील कारणे संशयास्पद असून यातून काहीतरी दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.


माहिती अधिकार कायद्यानुसार नागरिकांना सार्वजनिक माहिती मिळणे हा मूलभूत हक्क आहे, असे असतांना केंद्रीय माहिती आयोगाचे आदेश डावलून आरटीआय अर्ज नाकारणे म्हणजे कायद्याचा अवमान असून लोकशाही व्यवस्थेलाच धक्का देणारी बाब असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.


डॉं. रियाज पठाण यांनी पुढे स्पष्ट केले की, या संपूर्ण प्रकरणाची सखोल, पारदर्शक व निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे. अन्यथा नगर परिषद प्रशासनातील संभाव्य गैरप्रकार कधीच जनतेसमोर येणार नाहीत. पूर्ण चौकशीशिवाय हे प्रकरण शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.


दरम्यान, या प्रकरणामुळे खोपोलीतील प्रशासकीय वर्तुळात अस्वस्थता निर्माण झाली असून नगर परिषद प्रशासन यावर कोणती भूमिका घेते, दोषींवर कारवाई होते का, की प्रकरण दडपले जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. आरटीआय अर्ज फेटाळण्यामागील नेमकी कारणे स्पष्ट करणे आता नगर परिषदेपुढील मोठे आव्हान ठरणार आहे.