बारामतीवर आभाळ फाटलं!
भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन
* राजकारणातील 'दादा' पर्वाचा करुण अंत ; महाराष्ट्राला मोठा धक्का
बारामती, खोपोली, मुंबई, पुणे / मानसी कांबळे :- महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एका मोठ्या अध्यायाचा आज अकाली शेवट झाला. बारामती विमानतळावर सकाळी झालेल्या भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमानातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामतीकडे येत असताना हे विमान लँडिंगच्या वेळी धावपट्टीवर कोसळले. विमानाचे दोन तुकडे झाले आणि लगेचच आग लागली. या करुण घटनेने संपूर्ण महाराष्ट्र दुःखाच्या सागरात बुडाला आहे.
* लँडिंगवेळी तांत्रिक बिघाड ; विमान धावपट्टीवरून घसरले :- मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अजित पवार यांच्या विमानाने मुंबईहून बारामतीकडे प्रस्थान केले होते. सकाळी बारामती विमानतळावर लँडिंग करतांना विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने ते धावपट्टीवरून बाजूला घसरले. विमानाच्या दोन भागांत विभागणी झाली आणि लगेचच आग लागली. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, पण विमानातील सर्व प्रवाशांनी आपला जीव गमावला.
पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी सांगितले की, विमानाचे प्रचंड नुकसान झाले आहे. आतापर्यंत तीन मृतदेह सापडले असून ते शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले आहेत. उर्वरित मृतदेहांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे. तांत्रिक चौकशी आणि DGCA च्या अहवालानंतर अपघाताचे नेमके कारण समजेल.
* विमानात कोण कोण होते ? :- अपघातावेळी विमानात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे सहकारी विदीप जाधव, पिंकी माळी, सुरक्षा रक्षक आणि क्रू मेंबर्स, पायलट कॅप्टन सुमित कुपूर, सह-पायलट कॅप्टन शांभवी पाठ आदी होते. सर्वांचा मृत्यू घटनास्थळीच झाल्याचे सांगितले जात आहे.
* राजकीय कारकीर्दीचा करुण अंत :- अजित पवार यांनी साडेचार दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणावर अमिट ठसा उमटविला. काका शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवत सहकार क्षेत्रातून राजकारणात आलेले अजित पवार 1991 पासून बारामती विधानसभा मतदारसंघाचे अविभाज्य प्रतिनिधी होते. सलग सात वेळा आमदार म्हणून निवडून येणे, अर्थ, नियोजन, जलसंपदा, ऊर्जा अशा प्रमुख खात्यांची जबाबदारी सांभाळणे आणि सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्रीपद भूषवणे हे त्यांच्या राजकीय सामर्थ्याचे पुरावे होते. सध्या महायुती सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठीच ते बारामतीकडे निघाले होते. मात्र, ही त्यांची शेवटची यात्रा ठरली.
* एकनाथ शिंदेंची भावुक प्रतिक्रिया :- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मनाला वेदना आणि चटका देणारी घटना आहे. अजित दादा इतक्या लवकर आपल्याला सोडून जातील असा विचारही कुणी केला नसेल. ते परखड, स्पष्टवक्ते आणि प्रशासनावर दांडगी पकड असलेले नेते होते. मी मुख्यमंत्री असताना त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून टीमवर्कने काम केले. एकदा ठरवले की ते करायचेच. आज सकाळी जेव्हा ही बातमी कळली, तेव्हा परवाच्या भेटीचे दृश्य डोळ्यासमोर येत होते. एक मोठा भाऊ हरपल्याची भावना आहे. महाराष्ट्राला अपूरणीय नुकसान झाले आहे.
* पंतप्रधान मोदींचा शोक संदेश :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करतांना म्हटले की, श्री अजित पवारजी हे जनतेचे नेते होते. तळागाळातील लोकांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. महाराष्ट्राच्या सेवा कार्यात अग्रेसर असलेले मेहनती नेते होते. त्यांचे अकाली निधन धक्कादायक आहे. कुटुंबीय आणि चाहत्यांना मी सहवेदना व्यक्त करतो. ओम शांती.”
* बारामतीत शोककळा :- बारामती शहरात शोककळा पसरली आहे. वैद्यकीय महाविद्यालयाबाहेर आणि अजित पवार यांच्या निवासस्थानी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक जमा झाले आहेत. राज्यभरातील राजकीय पक्षांनी शोक व्यक्त केला असून, अनेक ठिकाणी शोकसभांचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्राने एका धाडसी, स्पष्टवक्ते आणि कणकणीत प्रशासकाला गमावले आहे. 'दादा' यांच्या अकाली जाण्याने राज्याच्या राजकीय क्षितिजावर निर्माण झालेली पोकळी किती काळ भरून निघेल, हे सांगणे कठीण आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home