Tuesday, January 20, 2026

नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींच्या तत्परतेने प्रकाशनगरचा रस्ता प्रश्न मार्गी

 


* प्रशासकीय रिक्ततेतही नगराध्यक्ष व नगरसेवकांचा पुढाकार ; सहा महिन्यांत डीपी रोड पूर्ण करण्याचे आश्वासन

खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली नगर परिषदेच्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी पदभार स्विकारताच जनहिताच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेत आपल्या कार्यक्षमतेची चुणूक दाखवून दिली आहे. पंचायत समिती निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू असल्याने आणि अनेक अधिकारी निवडणूक ड्युटीवर असल्यामुळे प्रशासनात रिक्ततेची स्थिती असतानाही, प्रभाग क्रमांक 3 मधील प्रकाशनगर येथील रस्त्याचा दीर्घकालीन प्रश्न लोकप्रतिनिधींच्या पुढाकारामुळे मार्गी लागला आहे.


* नेमका वाद काय होता ? :- प्रभाग क्रमांक 3 मधील प्रकाशनगरकडे जाणारा सध्याचा रस्ता नगर परिषदेच्या अधिकृत विकास आराखड्यात (डीपी) समाविष्ट नसला, तरी गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिक याच मार्गाचा वापर करीत आहेत. संबंधित खाजगी जागा मालक शिवराज वरगणे यांनी त्यांच्या मालकीतील काही जागा आधीच मंजूर डीपी रोडसाठी नगर परिषदेला दिली आहे. मात्र उर्वरित जागेत बांधकाम सुरू केल्यामुळे नागरिक वापरत असलेला पर्यायी रस्ता बंद होण्याची शक्यता निर्माण झाली होती. यामुळे परिसरात तीव्र असंतोष पसरला होता.


* नागरिकांचा मोर्चा ; लोकप्रतिनिधींची यशस्वी मध्यस्थी :- रस्त्याचा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी प्रकाशनगरच्या नागरिकांनी आज नगर परिषद कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, प्रभाग 3 चे नगरसेवक अनिल पुंडलिक सानप, सुवर्णा संतोष मोरे तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन औसरमल यांनी नागरिकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले.


त्यानंतर जागा मालक शिवराज वरगणे यांना तातडीने चर्चेसाठी बोलाविण्यात आले. कायदेशीर मर्यादा लक्षात घेऊनही, लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक हिताचा विचार करीत मानवीय दृष्टिकोनातून त्यांना विनंती केली. जोपर्यंत अधिकृत डीपी रोडचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत सध्या वापरात असलेला पर्यायी रस्ता नागरिकांसाठी खुला ठेवावा, अशी मागणी करण्यात आली.


* सहा महिन्यांत डीपी रोड पूर्ण करण्याचे आश्वासन :- लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीला सकारात्मक प्रतिसाद देत शिवराज वरगणे यांनी पर्यायी रस्ता तात्पुरता खुला ठेवण्यास सहमती दर्शवली. त्यानंतर नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. या चर्चेतून प्रकाशनगरकडे जाणारा 60 फुटी मंजूर डीपी रोड येत्या सहा महिन्यांत पूर्ण केला जाईल, असे ठोस आश्वासन देण्यात आले.


प्रशासकीय अडथळे, अधिकारी वर्गाची अनुपस्थिती आणि आचारसंहितेचा काळ असूनही नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी दाखविलेल्या तत्परतेमुळे हा प्रश्न मार्गी लागल्याने प्रकाशनगरच्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. जनतेशी थेट संवाद साधत समस्या सोडविण्याची ही कार्यपद्धत खोपोली नगर परिषदेच्या कामकाजाला नवी दिशा देणारी ठरेल, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.



0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home