Saturday, January 24, 2026

प्रजासत्ताक दिनाच्या सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे जुना महामार्ग 'हाऊसफुल्ल'

 


* खोपोलीत वाहतुकीचा प्रचंड खोळंबा

* खंडाळा घाट चढणीत किलोमीटरचे जाम

खोपोली / मानसी कांबळे :- प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर (26 जानेवारी) सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांचा (24 ते 26 जानेवारी) वीकेंड आल्याने मुंबईकरांनी पर्यटनासाठी लोणावळा - खंडाळा - माथेरान या ठिकाणांकडे मोठ्या प्रमाणात धाव घेतली आहे. परिणामी, मुंबई-पुणे जुना राष्ट्रीय महामार्ग (NH-4) आज शनिवारपासूनच 'हाऊसफुल्ल' झाला असून, खोपोली शहरात वाहतुकीचा पूर्ण चक्काजाम झाला आहे. खंडाळा घाटाच्या चढणीत आणि खोपोलीतील मुख्य रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, प्रवासाचा वेळ दुप्पट ते तिप्पट होत आहे.


* खोपोलीत 'चक्काजाम'; शहराबाहेर पडणेही जिकिरीचे :- खंडाळा घाटाच्या पायथ्याशी असलेल्या खोपोली शहरात परिस्थिती सर्वाधिक गंभीर आहे. पुण्याकडे जाणाऱ्या पर्यटक वाहनांची संख्या इतकी प्रचंड आहे की, शहरातील मुख्य चौक, सिग्नल पॉइंट्स आणि महामार्गांवरील प्रवेशद्वारांवर वाहने थांबून राहिली आहेत. अनेक वाहनचालकांना खोपोली शहरातून बाहेर पडण्यासाठीच तासभरापेक्षा जास्त वेळ लागत आहे. घाटातील चढणीतही वाहनांच्या रांगा किलोमीटरच्या अंतरापर्यंत पसरल्या आहेत. या कोंडीमुळे मुंबई-पुणे प्रवास सामान्यतः 3-4 तासांचा असतो, तो आज 6-8 तासांपर्यंत पोहोचला आहे.


* खोपोली पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये :- वाढती वाहतूक कोंडी आणि प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन खोपोली पोलिस प्रशासन पूर्ण सतर्क झाले आहे. खोपोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक सुरळीत करण्यासाठी विशेष नियोजन राबविण्यात आले आहे.

शहरातील मुख्य चौक, महामार्गांवरील संवेदनशील पॉइंट्स आणि घाटाच्या पायथ्याशी पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले आहेत. भर उन्हात रस्त्यावर उतरून वाहतूक नियमन करीत असून, आपत्कालीन वाहनांना (रुग्णवाहिका, अग्निशमन) तात्काळ वाट मिळवून देण्यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे. अनावश्यक हॉर्न वाजवणाऱ्यांवर आणि ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे.


* प्रवाशांसाठी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन :- खोपोली पोलिस ठाण्याने नागरिकांना खास आवाहन केले आहे. जर तुम्हाला तातडीच्या कामासाठी पुण्याला जायचे असेल, तर सद्य:स्थितीतील ट्रॅफिक जाम पाहता जुना महामार्ग (बाय रोड) ऐवजी रेल्वे मार्गांचा (लोहमार्गाचा) पर्याय निवडणे अधिक सोयीचे आणि वेळ वाचविणारे ठरेल. पर्यटकांनी संयम बाळगावा, अनावश्यक गर्दी टाळावी आणि पोलिस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे.


* लोणावळा - खंडाळ्यातही जाम :- प्रजासत्ताक दिनाच्या सुट्ट्यांचा फायदा घेऊन मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे परिसरातील हजारो कुटुंबांनी लोणावळा, खंडाळा, भुशी धरण, राजमाची, एकावीरा देवी मंदिर अशा ठिकाणी भेट देण्याचा बेत आखला आहे. यामुळे जुन्या महामार्गावरील ही गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे. रविवार आणि सोमवारी (प्रजासत्ताक दिन) परततांना पुन्हा एकदा कोंडी होण्याची भीती व्यक्त होत आहे.


पोलिसांनी प्रवाशांना सकाळी लवकर निघण्याचे, रस्त्यावरील अपडेट्ससाठी सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याचे आणि आपत्कालीन स्थितीत 100 किंवा स्थानिक पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home