Saturday, January 17, 2026

आमदार महेंद्रशेठ थोरवे फाउंडेशन स्वामिनी महिला प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्षा सौ. कांचनताई जाधव यांच्या संकल्पनेतुन महिलांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न.....

 


खोपोली /मानसी कांबळे :- आमदार महेंद्रशेठ थोरवे फाउंडेशन स्वामिनी महिला प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्षा सौ. कांचनताई जाधव यांच्या संकल्पनेतुन स्वराज्य जननी थोर राजमाता जिजाऊ तसेच भारतीय समाजसुधारक पहिल्या शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने महिलांचा सन्मान सोहळा सायन्स क्लब खोपोली, जुना मुंबई-पुणे हायवे खोपोली येथे पार पडला.


यावेळी खोपोली शहरात महिलांसाठी नेहमी कार्यरत असणाऱ्या नगरसेविका सुवर्णा मोरे यांना राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच शिक्षिका सावित्री जाधव यांना सावित्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे मा. श्री. कुलदीपकभाई शेंडे (नगराध्यक्ष खो.न.प.), नगरसेवक अनिल सानप, दिनेश थोरवे, नगरसेविका सुवर्णा मोरे, श्रुती पालांडे ,वंदनाताई मोरे ताराराणी ब्रिगेड महिला प्रदेश अध्यक्ष, नगरसेविका सानिया शेख, केविना ताई गायकवाड तसेच खोपोली शहरातील अनेक नवनिर्वाचित नगरसेविका उपस्थित होत्या. यावेळी महिलांची असंख्य उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली. तसेच हळदी कुंकू समारंभ पार पडला.


आमदार महेंद्रशेठ थोरवे फाउंडेशन स्वामिनी महिला प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्षा सौ. कांचनताई जाधव, शितल डोखले,उज्ज्वला वाघेला, आशा जाधव,सावित्री जाधव, संध्या जाधव यांच्या मेहनतीने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.






के.एम.सी. कॉलेज खोपोली येथे वैद्यकीय एचआयव्ही तपासणी शिबिराचे आयोजन....

 


खोपोली /खलील सुर्वे :-  शिबिर इनर व्हील क्लब ऑफ खोपोली तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने एचआयव्ही तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन के .एम.सी. कॉलेज खोपोली येथे करण्यात आले. एनसीसी युनिटअंतर्गत वैद्यकीय एचआयव्ही तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. एचआयव्हीबाबत जनजागृती करणे व वेळेवर तपासणीचे महत्त्व पटवून देणे हा शिबिराचा मुख्य उद्देश होता.


के.एम.सी. कॉलेजच्या प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली केटीएसपी मंडळाचे सदस्य संतोष जंगम सर, दिलीप पोरवाल सर तसेच सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने शिबिर आयोजित करण्यात आले, ज्यामुळे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे योगदान लाभले. हा कार्यक्रम एएनओ कॅप्टन शीतल कृष्णा गायकवाड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. त्यांनी एनसीसी कॅडेट्सना एचआयव्ही संदर्भात आवश्यक माहिती देत मार्गदर्शन केले.


शासकीय रुग्णालयातील प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी पूर्ण काळजी व गोपनीयता राखून तपासणी केली. के.एम.सी. कॉलेजचे उपाध्यक्ष पोरवाल सर यांनी कार्यक्रमाच्या सुरळीत आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वी संचालनात डॉ. शाह मॅडम, सिस्टर ताईडे मॅडम तसेच इनर व्हील क्लब खोपोलीच्या अध्यक्षा व सदस्या शाह मॅडम आणि पाटील मॅडम यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले.


या शिबिरात ३८ एनसीसी कॅडेट्सनी शिस्तबद्ध व सक्रिय सहभाग घेतला. तसेच इनर व्हील क्लबच्या वतीने जनजागृतीसाठी गायन व भाषण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. हे शिबिर विद्यार्थी व कर्मचारी वर्गासाठी अत्यंत उपयुक्त व यशस्वी ठरले.

डाक विभागाकडून जीवन विमा योजनेअंतर्गत विमा सल्लागारच्या भरतीसाठी मुलाखती.....

 


नांदेड/प्रतिनिधी :- नांदेड डाक विभागाकडून डाकजीवनविमा (पीएलआय) आणि ग्रामीण डाक जीवन विमा (RPLI) योजनेअंतर्गत "डायरेक्ट एजंट" (विमा सल्लागार) च्या भरतीकरिता मुलाखती घेण्यात येत आहेत. सदरील अर्ज अधिक्षक डाकघर कार्यालय नांदेड विभाग नांदेड येथे उपलब्ध आहेत. सर्व इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून शुक्रवार 23 जानेवारी 2026 रोजी कार्यालयीन वेळत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अधिक्षक डाकघर कार्यालय नांदेड विभाग नांदेड 431601 येथे थेट मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे व सोबत बियोडाटा मूळ कागदपत्र, प्रमाणपत्र / अनुभव प्रमाणपत्र घेऊन येणे आवश्यक आहे, असे आवाहन अधिक्षक डाकघर नांदेड विभाग नांदेड यांनी केले आहे.


पात्रता व मापदंड :- वयोमर्यादा: उमेदवाराचे वय मुलाखतीच्या दिवशी कमीत कमी १८ वर्ष असावे. शैक्षणिक पात्रता: अर्जदार हा केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे मान्यताप्राप्त बोर्डाची १० वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा. 


श्रेणी : - बेरोजगार/स्वयंबेरोजगार, माजी विमा सल्लागार, कोणत्याही विमा कंपनीचा माजी विमा एजंट, माजी सैनिक, सेवानिवृत्त शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ते, महिला मंडळ कार्यकर्ते, ग्राम प्रधान, ग्राम पंचायत सदस्य ई. टपाल जीवन विमा प्रतिनिधी साठी थेट असे अर्ज करू शकतात.


उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे होईल. यात व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, जीवन विमा बाबतचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान, स्थानिक भागाची माहिती इ. बाबीवर चाचणी होईल. निवड झालेल्या उमेदवारास 5 हजार रुपये एवढी रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवावी लागेल. जी NSC/KVP च्या स्वरूपात असेल.


रुपये 5 हजार एवढी रक्कमेची NSC/KVP अधीक्षक डाकघर यांच्या नावाने प्लेज केल्यावर एजंट आयडी प्रदान करण्यात येईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपात परवाना देण्यात येईल. जो IRDA ची परवाना परीक्षा पास केल्यानंतर कायम स्वरूपाच्या परवाना मध्ये रुपांतरीत केली जाईल. सदर परीक्षा 3 वर्षाच्या आत उत्तीर्ण करणे अनिवार्य राहील. नियुक्ती ही लायसन्स आणि कमिशन तत्वावर राहील असेही आवाहन अधिक्षक डाकघर नांदेड विभाग नांदेड यांनी केले आहे.

Friday, January 16, 2026

हाळ खुर्द गावातील मुस्लिम व आदिवासी समाजाला कबरस्तान कधी ?

 


शंभर वर्षांपासून वंचित समाजांचा जिल्हाधिकाऱ्यांना सवाल

* जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालयाकडून कागदपत्रांवर टाळाटाळीचा आरोप

खालापूर / के. डी. सुर्वे :- रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेल्या हाळ खुर्द ग्रामपंचायतीतील मुस्लिम व आदिवासी (कातकरी) समाज गेल्या शंभर वर्षांहून अधिक काळापासून दफनभूमी (कब्रस्थान) व स्मशानभूमीपासून वंचित असल्याची धक्कादायक बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. या दोन्ही समाजांना मूलभूत मानवी हक्क असलेली अंत्यविधीसाठीची जागा मिळावी, याबाबत प्रशासनाकडून होत असलेली दिरंगाई व टाळाटाळ पाहता ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

* शासकीय जमिनीबाबत प्रस्ताव असूनही प्रक्रिया रखडली :- या प्रकरणात 30 जून 2025 रोजी निवासी उपजिल्हाधिकारी, रायगड (अलिबाग) यांच्याकडून पत्र देण्यात आले होते. त्यामध्ये मौजे हाळ खुर्द, ता. खालापूर, जि. रायगड येथील स. नं. 38 (1), क्षेत्र 5.77.00 हेक्टर आर या गायरान (गुरचरण) शासकीय जमिनीपैकी 0.40 हेक्टर क्षेत्र स्मशानभूमीसाठी (ग्रामपंचायतीस) 0.80 हेक्टर क्षेत्र मुस्लिम समाजाच्या दफनभूमीसाठी देण्याची विनंती करण्यात आली होती. या मागणीच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी, कर्जत यांचा स्थळपाहणी अहवाल तयार करून 13 मार्च 2024 रोजी शासनाकडे अहवाल सादर केल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, त्या गायरान जमिनीवर हाळ कातकरीवाडीची प्राथमिक शाळा, अंगणवाडी, समाज मंदिर व सार्वजनिक शौचालय आधीच अस्तित्वात असल्याचेही अहवालात नमूद आहे.


* परवानग्यांचे अभिलेख मागवले ; पण अहवालच नाही :- या पार्श्वभूमीवर कोकण विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषद प्रशासनाला, सदर गायरान जमिनीवर शाळा, अंगणवाडी, समाज मंदिर व शौचालय बांधताना शासनाची पूर्वपरवानगी घेतली होती का, याबाबत सविस्तर अभिलेख व कागदपत्रांसह अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद (अलिबाग) यांना पत्र पाठविण्यात आले. मात्र, सहा महिने उलटूनही आवश्यक अहवाल व कागदपत्रे अद्याप सादर न झाल्याचा आरोप ग्रामस्थ व अर्जदारांकडून केला जात आहे.


* फाईल पुढेच सरकत नाही - कार्यालयीन विस्कळीत कारभार ? :- या संदर्भात जिल्हा परिषद कार्यालयातील रूपाली पाटील मैडम यांना पत्रकारांनी विचारणा केली असता, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यापर्यंत हे पत्र पोहोचले नसल्यामुळे फाईल पुढे पाठवली गेली नाही, असे उत्तर देण्यात आले. त्यानंतर पत्रकारांनी प्रत्यक्ष कार्यालयात भेट दिली असता, मॅडम आज उपस्थित नाहीत, ग्रामपंचायत विभागातील अधिकाऱ्यांना भेटा, असे सांगण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांनी पुढे असे सांगितले की, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (Deputy CEO) विशाल तनपुरे यांची सही झालेली नाही. साहेब मुंबईला गेले आहेत. सही झाली की फाईल पुढे पाठवू, या प्रकारामुळे फाईल जिल्हा परिषद कार्यालयातच धूळ खात पडून आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.


* संतप्त सवाल : प्रशासनाला गांभीर्य नाही का ? :- हाळ खुर्द गावातील ग्रामस्थांनी संतप्त सवाल उपस्थित केले आहेत की, सहा महिने उलटूनही अहवाल सादर का केला जात नाही ? मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना या दोन समाजांच्या मूलभूत गरजांचे गांभीर्य नाही का ? ज्या गावात शंभर वर्षांपासून अंत्यविधीसाठी जागा नाही, ती खाजगी जमिनीत किंवा नगर परिषद हद्दीत करावी लागते, ही बाब प्रशासनासाठी लाजीरवाणी नाही का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


* आंदोलनाचा इशारा :- ग्रामस्थांचा इशारा आहे की, जर आता देखील जागा दिली गेली नाही, तर रस्त्यावर उतरून आंदोलन, उपोषण, जलसमाधी, आत्मदहनासारखे टोकाचे मार्ग अवलंबावे लागतील. तेव्हाच ही बाब जगासमोर येईल का ? 


* गायरान जमिनीवर अतिक्रमण ; पुढाऱ्यांचा डल्ला ? :- दरम्यान, कर्जत - खालापूर तालुक्यात गायरान जमिनींवर अतिक्रमण व बेकायदेशीर प्लॉटिंग झाल्याच्या बातम्या आधीच प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झाल्या आहेत. अंदाजे 99.80 हेक्टर शासकीय जमिनीवर अतिक्रमण असून, प्रति गुंठा 2 ते 5 लाख रुपये दराने विक्री व्यवहार झाल्याचा आरोप आहे. यातून गावपुढाऱ्यांनी कोट्यवधी रुपये कमावल्याचा संशय व्यक्त होत आहे.


* अखेर प्रश्न तोच :- हाळ खुर्द गावाच्या गायरान जमिनीतून दोन समाजांना कब्रस्थान व स्मशानभूमीसाठी जागा मिळणार का ? की शासकीय जमिनी विक्री व्यवहारांसाठीच राखून ठेवल्या जाणार ? हा प्रश्न आज हाळ खुर्दच्या ग्रामस्थांसह संपूर्ण खालापूर तालुक्यात चर्चेचा विषय ठरला असून प्रशासन आता काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




Thursday, January 15, 2026

खालापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल..

 


सह निवडणूक निर्णय अधिकारी अभय चव्हाण यांच्याकडून निवडणूक कार्यक्रम, आरक्षण व तारखांची सविस्तर माहिती

खालापूर / सुधीर माने :- राज्यातील 12 जिल्हा परिषदांअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक 2026 चा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर, खालापूर तालुक्यातील निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी सहनिवडणूक निर्णय अधिकारी व खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण यांच्या दालनात गुरुवार, 15 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12.30 वाजता पत्रकार परिषद संपन्न झाली.

ही पत्रकार परिषद निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन कासार यांच्या आदेशानुसार घेण्यात आली. यावेळी तहसीलदार अभय चव्हाण यांनी खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक विभागांची रचना, आरक्षण, तसेच संपूर्ण निवडणूक वेळापत्रक याबाबत पत्रकारांना सविस्तर माहिती दिली.

* खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषद गट व आरक्षण :- खालापूर तालुक्यात ४ जिल्हा परिषद गट असून

गट क्र. 15 - चौक : अनुसूचित जमात (स्त्री)

गट क्र. 16 - वासांबे : सर्वसाधारण

गट क्र. 17 - सावरोली : सर्वसाधारण

गट क्र. 18 - आतकर गाव : सर्वसाधारण (स्त्री).

* पंचायत समिती गण व आरक्षण :- खालापूर तालुक्यातील 8 पंचायत समिती गणांवर आरक्षण लागू आहे.

गण क्र. 29 - चौक : अनुसूचित जमात (स्त्री)

गण क्र. 30 - हाळ खुर्द : अनुसूचित जमात

गण क्र. 31 - वासांबे : नागरिकांचा मागास प्रवर्ग

गण क्र. 32 - रिस : सर्वसाधारण

गण क्र. 33 - शिवली : नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)

गण क्र. 34 - सावरोली : सर्वसाधारण (स्त्री)

गण क्र. 35 - खानाव : सर्वसाधारण

गण क्र. 36 - आतकर गाव : सर्वसाधारण (स्त्री)

* निवडणूक वेळापत्रक :- तहसीलदार अभय चव्हाण यांनी जाहीर केलेले निवडणूक वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. 

- नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा कालावधी : 16 जानेवारी ते 20 जानेवारी 2026

- 18 जानेवारी (रविवार) सार्वजनिक सुट्टी असल्याने

21 जानेवारी 2026 (बुधवार) सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्विकारण्यात येणार आहे.

- नामनिर्देशन पत्रांची छाननी : 22 जानेवारी 2026, सकाळी 11 वाजल्यापासून

- छाननीनंतर तात्काळ, उमेदवारांची यादी प्रसिद्ध,

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी : 23 ते 27 जानेवारी 2026 (सकाळी 11 ते दुपारी 3)

- 25 जानेवारी (रविवार) सार्वजनिक सुट्टी असल्याने त्या दिवशी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया होणार नाही

- 27 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3.30 नंतर अंतिम उमेदवारांची यादी व निशाणी वाटप

* मतदान व मतमोजणी :- गुरुवार, 5 फेब्रुवारी 2026, सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान.

शनिवार, 7 फेब्रुवारी 2026, सकाळी 10 वाजेनंतर मतमोजणी.

* आदर्श आचारसंहितेचे पालन बंधनकारक :- या पत्रकार परिषदेत तहसीलदार अभय चव्हाण यांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याचे स्पष्ट केले. निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व उमेदवार, राजकीय पक्ष व नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.





अखेर खोपोलीत ‘साबळे पॅटर्न’

 


 विक्रम साबळे उपनगराध्यक्ष ; दिनेश थोरवे, डॉं. सुनील गोटीराम पाटील व अश्विनीताई अत्रे स्वीकृत नगरसेवक

खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी विक्रम यशवंत साबळे यांची निवड झाल्याने शहराच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात पुन्हा एकदा अनेक वर्षानंतर ‘साबळे पॅटर्न’ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सुप्रसिद्ध युवा उद्योजक, विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात प्रभावी ठसा उमटविणारे विक्रम साबळे यांच्या निवडीमुळे विशेषतः युवक वर्गांत नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. दूरदृष्टी, कार्यक्षमता आणि सामाजिक बांधिलकी यांचा समतोल साधणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असून, नगर परिषदेच्या कारभारात सकारात्मक ऊर्जा संचारेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


याचवेळी खोपोली नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी शहरातील सुप्रसिद्ध व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते दिनेश थोरवे (सुरभी ज्वेलर्सचे संचालक), सामाजिक जाणिवा जपणारे माजी नगराध्यक्ष डॉं. सुनील गोटीराम पाटील तसेच लोकोपयोगी कार्यात सातत्याने अग्रभागी असणाऱ्या अश्विनीताई अत्रे यांची निवड झाल्याने नगर परिषदेच्या कामकाजात अनुभवी, अभ्यासू व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्वांचा प्रभावी सहभाग वाढला आहे.


* अनुभव, अभ्यास आणि समाजाभिमुखतेचा संगम :- विक्रम साबळे, दिनेश थोरवे, डॉं. सुनील पाटील व अश्विनीताई अत्रे ही सर्व मान्यवर व्यक्तिमत्त्वे गेल्या अनेक वर्षांपासून खोपोली शहरात सामाजिक, धार्मिक व विकासात्मक उपक्रमांत सक्रिय आहेत. गरजू नागरिकांना मदतीचा हात, विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन, तसेच शहराच्या विकासाशी संबंधित प्रश्नांवर ठाम व सातत्यपूर्ण भूमिका ही त्यांची ओळख आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेतच विक्रम साबळे यांची उपनगराध्यक्षपदी, तर उर्वरित तिघांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाल्याचे बोलले जात आहे.


* नागरिक व संघटनांकडून अभिनंदनाचा वर्षाव :- या निवडीबद्दल नागरिक, व्यापारी वर्ग, युवक कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांकडून उपनगराध्यक्ष विक्रम साबळे व तिन्ही स्वीकृत नगरसेवकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सर्वांच्या अनुभवाचा व सामाजिक जाणिवेचा खोपोलीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी पत्रकार बांधव व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


निवडीनंतर प्रतिक्रिया देताना विक्रम साबळे म्हणाले की, खोपोली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच पारदर्शक व लोकाभिमुख कारभारासाठी मी प्रामाणिकपणे काम करत राहीन. तसेच, सर्वच राजकीय पक्षांची समंजस भूमिका आणि खोपोलीकरांचे प्रेम यामुळेच हा विश्वास शक्य झाला. सर्वांचे मनःपूर्वक आभार, असे भावनिक उद्गार यशवंत लक्ष्मणशेठ साबळे यांनी व्यक्त केले.


विक्रम साबळे यांच्यासह दिनेश थोरवे, डॉं. सुनील पाटील व अश्विनीताई अत्रे यांच्या निवडीमुळे खोपोली नगर परिषदेच्या कामकाजाला नवी दिशा मिळून शहराच्या विकासाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.



Wednesday, January 14, 2026

शिवसेनेचे दिनेश थोरवे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉं. सुनील गोटीराम पाटील व भाजपच्या अश्विनीताई अत्रे यांचा समावेश

 



खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी शहरातील सुप्रसिद्ध व्यवसायिक व सामाजिक कार्यकर्ते, सुरभी ज्वेलर्सचे संचालक दिनेश थोरवे यांची निवड करण्यात आली आहे. याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉं. सुनील गोटीराम पाटील आणि भारतीय जनता पक्षाकडून अश्विनीताई अत्रे यांचीही स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाल्याने नगर परिषदेच्या कामकाजात अनुभवी व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सहभाग वाढला आहे.


दिनेश थोरवे हे गेल्या अनेक वर्षांपासून खोपोली शहरात सामाजिक, धार्मिक व विकासात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत. गरजू नागरिकांना मदतीचा हात, विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन तसेच शहराच्या विकासाशी संबंधित प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे नेतृत्वशील व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेतच त्यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाल्याचे बोलले जात आहे.


* नागरिक व संघटनांकडून अभिनंदन :- या निवडीबद्दल नागरिक, व्यापारी वर्ग, युवक कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांकडून दिनेश थोरवे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच डॉं. सुनील गोटीराम पाटील आणि अश्विनीताई अत्रे यांच्या निवडीचेही सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत असून, तिन्ही स्वीकृत नगरसेवकांच्या अनुभवाचा व सामाजिक जाणिवेचा उपयोग शहराच्या सर्वांगीण विकासासाठी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


* पत्रकार संघटनांकडून सत्कार :- निवडीच्या पार्श्वभूमीवर न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन व व्हॉईस ऑफ मीडिया, खालापूर तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने दिनेश थोरवे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पत्रकार बांधव व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच डॉं. सुनील पाटील आणि अश्विनीताई अत्रे यांचेही अभिनंदन करण्यात आले. 


आपल्या निवडीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना दिनेश थोरवे म्हणाले की, खोपोली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि पारदर्शक व लोकाभिमुख कारभारासाठी मी नेहमीप्रमाणे प्रामाणिकपणे काम करत राहीन.


दिनेश थोरवे यांच्यासह डॉ. सुनील गोटीराम पाटील व अश्विनीताई अत्रे यांच्या निवडीमुळे खोपोली नगर परिषदेच्या कामकाजाला नवी दिशा मिळेल आणि शहराच्या विकासाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.




Monday, January 12, 2026

इनरव्हील क्लब खोपोली व ब्राम्हणसभा खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने ओवीरंग कार्यक्रम उत्साहात संपन्न....

 


 खालापुर कर्जत / सुधीर देशमुख :-भारतीय संस्कृती व परंपरा जपण्यासाठी ओवी रंग या माध्यमातून समाजातील नवीन पिढीला 50 वर्षा पूर्वी भारतातील खेड्या पाड्यातील घरामधील ज्या महिला वर्ग होत्या त्या आपल्या घरातील दळण जात्यावर दळत असताना ओव्या म्हणत आपली कामे करत असत ,पाट्यावर वाटण वाटणे, उखळीतून भात सडून त्यापासून तांदूळ बनवणे या प्रकाराची कामे महिला करत आपली संस्कृतीचे जतन करत होत्या. आता ती संस्कृती लोप पावत चालली आहे ती आजच्या ए आय च्या युगातील नवीन पिढीला 50 वर्षा पूर्वी महिला वर्ग कशी कामे करायची याची माहिती ओवी रंग या माध्यमातून लेखक व दिग्दर्शन ज्योती शिंदे, निर्मिती व सूत्रधार सुहासिनी घोरपडे, संगीत दिग्दर्शक सुखदा भावे -दाबके या तिघींनी मिळून सादर केला अतिशय सुंदर असा कार्यक्रम खोपोलीत नाट्य रसिकाना ब्राम्हण सभा हॉल मधे पहायला मिळाला हा कार्यक्रम आता शाळा व कॉलेज मध्ये होणे गरजेचे आहे असे संजय पाटील यांनी आपल्या अभिप्राय मधे दिला.


या कार्यक्रम प्रसंगी इनरव्हील क्लब खोपोली च्या अध्यक्ष दिना शहा,सेक्रेटरी मधुमिता पाटील व सर्व सदस्य तसेच ब्राम्हण सभा खोपोली चे अध्यक्ष राजेंद्र पेठे, सेक्रेटरी वृषाली बेलसरे ,ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रवींद्र घोडके सर, लायन्स क्लब खोपोली चे अध्यक्ष अविनाश राऊत,रोटरी क्लब खोपोली चे माजी अध्यक्ष संजय पाटील,सह सेक्रेटरी संजय बोंडारडे व ब्राम्हण सभा खोपोली चे सर्व सदस्य उपस्थित होते.

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अश्वपरीस फाऊंडेशनतर्फे आनंद शाळेतील विद्यार्थ्यांना मदत....

 


विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी भरण्यात आली....

 खालापुर कर्जत/सुधीर देशमुख :- राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त समाजातील गरजू घटकांसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या अश्वपरीस फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रथमच आनंद शाळा, खोपोली – शीळ फाटा येथे एक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने आनंद शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी भरण्यात आली.


आपण समाजाचे देणे लागतो ही भावना मनात ठेवून, ही शैक्षणिक फी पूर्णतः आपल्याच समाजातील मदतीच्या हातांनी भरण्याचा प्रयत्न करण्यात आला. समाजातील विविध घटकांनी दिलेल्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. मदत ही केवळ जबाबदारी नसून, समाजाप्रती असलेली जाणीव व कर्तव्य आहे, या विचारातून हा उपक्रम राबविण्यात आला. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस बळ मिळावे आणि आत्मविश्वास निर्माण व्हावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.


विद्यार्थ्यांना शुभेच्छा व प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने तसेच भविष्यातही अशाच गरजवंत विद्यार्थ्यांसाठी आणि समाजातील दुर्बल घटकांसाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. राष्ट्राला सक्षम बनविण्यासाठी शिक्षण हे प्रभावी माध्यम आहे या ध्येयाने अश्वपरीस फाऊंडेशन सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे.


या कार्यक्रमास आनंद शाळेच्या आसावरी दंडवते मॅडम, मुख्याध्यापिका सीमा त्रिपाठी मॅडम, तसेच अश्वपरीस फाऊंडेशनच्या बनिता सहा, सुरेखा नायकर, कार्तिक नायकर, निजल खान व मुस्तफा खान यांची उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करून अशा सामाजिक कार्याची आवश्यकता अधोरेखित केली.


अश्वपरीस फाऊंडेशनतर्फे भविष्यातही शिक्षण, आरोग्य व सामाजिक सशक्तीकरणाच्या क्षेत्रात असेच उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Sunday, January 11, 2026

साप्ताहिक खालापुर वार्ता व न्युज जर्नालिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांचा सन्मान सोहळा

 


 खालापुर कर्जत /सुधीर देशमुख:-   साप्ताहिक खालापुर वार्ता दिनदर्शिका प्रकाशन सोहळा ५ वर्ष पुर्ण व न्युज जर्नालिस्ट असोसिएशन ह्या पत्रकारांच्या संघटनेचे प्रथम वर्धापन आणि दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान सोहळा खोपोली येथे पार पडला.

यावेळी खोपोली चे नगराध्यक्ष श्री कुलदिपक शेंडे व माजी नगराध्यक्ष श्री सुनील पाटील, तसेच कार्यक्रम अध्यक्ष मा.डाॅ.शरीफ बागवान, मा.श्री संतोष दादा चौधरी ,मा.श्री फिरोज पिंजारी,‍ रविंद्र घोडके, कु.सागरिका शेखर जांभळे,सौ.सुप्रिया साळुंखे,सौ.दिना शहा,श्री संदीप पाटील,श्री संतोष गुरव,सौ.ईशिका शेलार, नगरसेवक श्री राहुल गायकवाड, नगरसेविका सौ सुवर्णा मोरे ह्या सर्व मान्यवरांनी पत्रकारांचा सन्मान करुन त्यांना पुढील काळात पत्रकार भवनासाठी आम्ही एकत्रित पणे प्रयत्न करु असे आश्वासन देऊन त्यांचा गौरव केला.


ह्या कार्यक्रमाचे आयोजक श्री सुधीर माने(संपादक, प्रदेश अध्यक्ष) श्री खलील सुर्वे (राष्ट्रीय अध्यक्ष) कु.मानसी कांबळे (राष्ट्रीय महासचिव) श्री संजय पाटील (कार्यकारी संपादक) यांच्या अथक परिश्रमाने हा सोहळा संपन्न झाला.


या कार्यक्रमासाठी खोपोली चे नगराध्यक्ष श्री कुलदिपक शेंडे व माजी नगराध्यक्ष श्री सुनील पाटील, तसेच कार्यक्रम अध्यक्ष मा.डाॅ.शरीफ बागवान, मा.श्री संतोष दादा चौधरी ,मा.श्री फिरोज पिंजारी,‍कु.सागरिका शेखर जांभळे,सौ.सुप्रिया साळुंखे,सौ.दिना शहा,श्री संदीप पाटील,श्री संतोष गुरव,सौ.ईशिका शेलार, नगरसेवक श्री राहुल गायकवाड, नगरसेविका सौ सुवर्णा मोरे, पत्रकार प्रमोद जाधव कृषिवल, जावेद अहमद नांदेड, नरेश जाधव,जयेश जाधव, प्रविण जाधव,आकाश जाधव, तय्यब खान, सुधीर देशमुख, संतोषी म्हात्रे, एस टी पाटील, रविंद्र जाधव, पंकेश जाधव, परमेश्वर कट्टीमणी, प्रविण कोल्हे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

Saturday, January 10, 2026

खोपोलीमध्ये पत्रकार भवन उभारा!

 


* पत्रकारांची नवनियुक्त नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांच्याकडे मागणी 

* सा. खालापूर वार्ता व न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनतर्फे पत्रकारांचा गौरव 

* दर्पण दिन, मराठी पत्रकार दिन व संघटनेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य कार्यक्रम

खोपोली / मानसी कांबळे :- खोपोलीसह खालापूर तालुक्यातील पत्रकारांसाठी एक सुसज्ज पत्रकार भवन उभारण्यात यावे तसेच पत्रकारांच्या आरोग्यासाठी नगर परिषद प्रशासनाकडून उपक्रम राबविला जावा, अशी मागणी आज सा. खालापूर वार्ता व न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनतर्फे आयोजित कार्यक्रमात करण्यात आली. दरम्यान, नूतन नगराध्यक्ष कुलदिपक शेंडे व माजी नगराध्यक्ष डॉं. सुनील पाटील या दोघांनी 'पत्रकार भवन' उभारण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. 


दर्पण दिन, मराठी पत्रकार दिन तसेच न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त साप्ताहिक खालापूर वार्ता आणि न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, 10 जानेवारी 2026 रोजी ज्येष्ठ नागरिक सभागृह, खोपोली (ता. खालापूर, जि. रायगड) येथे पत्रकार गौरव व दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 


या कार्यक्रमास न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय संयोजक डॉं. शरीफ बागवान, ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष पत्रकार रविंद्र घोडके, पोलीस मित्र संघटना नवी दिल्लीचे संस्थापक अध्यक्ष संतोषदादा चौधरी, न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी, खोपोली नगर परिषदेचे नवनियुक्त नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, माजी नगराध्यक्ष डॉं. सुनील पाटील, शिवसेना उत्तर रायगड महिला जिल्हा प्रमुख सुप्रिया साळुंखे, न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्वे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नगरसेविका सुवर्णा मोरे, अपक्ष नगरसेवक राहुल गायकवाड, शिवसेना खोपोली शहर अध्यक्ष नगरसेवक संदीप पाटील, खालापूर राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष संतोष गुरव, न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन महिला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा इशिका शेलार, सहज सेवा फाउंडेशनच्या सागरिका शेखर जांभळे, पत्रकार जयेश जाधव यांच्यासह राजकीय, सामाजिक, प्रशासकीय व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर मोठ्या उपस्थित होते.


* दिनदर्शिका प्रकाशन व मान्यवरांचा सन्मान :- कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. याप्रसंगी साप्ताहिक खालापूर वार्ता दिनदर्शिका 2026 चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकार व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यात आदर्श पत्रकार प्रमोद जाधव (कृषीवल), आकाश जाधव (बहुजन संकल्प), तय्यब खान, प्रसाद अटक, शिवाजी जाधव, प्रविण जाधव (पी.एम. न्यूज), राजेंद्र जाधव तर आदर्श शिक्षिका प्रतिभा मंडावळे, घोसाळकर मॅडम व जीवन गौरव पुरस्कार माजी नगराध्यक्ष रामदास कोंडू शेंडे, गोविंद बैलमारे, रविंद्र घोडके यांना देण्यात आला.


* सामाजिक उपक्रम व संघटनात्मक नियुक्त्या :- या कार्यक्रमात आदिवासी महिलांना डस्टबिनचे वाटप करून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनमध्ये करुणा कदम - खालापूर तालुका महिला अध्यक्ष, संजय पाटील - रायगड जिल्हा उपाध्यक्ष तर रविंद्र घोडके - रायगड जिल्हा सचिव यांचा समावेश होता.


या गौरवशाली कार्यक्रमास खोपोली नगर परिषदेचे नगराध्यक्ष, नगरसेवक, पत्रकार संघटनांचे पदाधिकारी, ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सोहळा पत्रकारितेच्या मूल्यांना अभिवादन करणारा, सन्मान व सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा ठरला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुधीर गोविंद माने (मुख्य संपादक - खालापूर वार्ता), राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्वे (संपादक - खालापूर वादळ), राष्ट्रीय महासचिव मानसी गणेश कांबळे (संपादक - माय कोकण न्यूज 24) आणि रायगड जिल्हा उपाध्यक्ष संजय सदानंद पाटील (कार्यकारी संपादक - सा. खालापूर वार्ता) यांच्या पुढाकारातून करण्यात आले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील व फिरोज पिंजारी यांनी केले. उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी अनेक वक्त्यांनी पत्रकारितेची सामाजिक भूमिका, निर्भीड लेखन आणि लोकशाहीतील माध्यमांचे महत्त्व अधोरेखित करीत खालापूर वार्ता व न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Thursday, January 8, 2026

लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट, कर्जत येथे कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र वितरण सोहळा....

 


विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन

* विविध कोर्स पूर्ण करणाऱ्यांचा यशोचित सन्मान


कर्जत / प्रतिनिधी :- 8 जानेवारी 2026 रोजी लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट, कर्जत सेंटर येथे कौशल्य प्रशिक्षण कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. विविध व्यावसायिक कोर्स पूर्ण करून रोजगारक्षम बनलेल्या विद्यार्थ्यांचा या प्रसंगी सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमास संस्थेचे जनसंपर्क अधिकारी विद्यानंद ओव्हाळ, इलेक्ट्रीशियन कोर्सचे प्रशिक्षक सुनील जाधव, टेलरिंग कोर्सच्या प्रशिक्षिका वर्षा खोब्रागडे, ECCE कोर्सच्या शिक्षिका वृषाली घारे, प्लेसमेंट को-ऑर्डिनेटर सागर खंडागळे, कम्युनिटी मोबिलायझर राजू ढोले तसेच विशेष पाहुणे शैलेश खोब्रागडे उपस्थित होते.


कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. सूत्रसंचालन वृषाली घारे मॅडम यांनी केले, तर प्रास्ताविक सागर खंडागळे सर यांनी मांडले. त्यांनी लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या कौशल्य विकास उपक्रमांची माहिती देत, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला.


कार्यक्रमात उपस्थित सर्व प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना, कौशल्य हीच आजच्या काळातील खरी ताकद असून सातत्य, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश निश्चित मिळते, असे मत व्यक्त केले. प्रशिक्षण काळात मिळवलेली कौशल्ये प्रत्यक्ष कामात उपयोगात आणण्याचे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.


कार्यक्रमाच्या शेवटी राजू ढोले सर यांनी उपस्थित मान्यवर, प्रशिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले. या प्रमाणपत्र वितरण समारंभामुळे विद्यार्थ्यांमध्ये नव्या उमेदीने पुढील वाटचाल करण्याचा आत्मविश्वास निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसून आले. हा सोहळा कौशल्य विकास, रोजगारनिर्मिती आणि सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



खालापुर नायब तहसीलदारांना रायगड स्वाभिमान दिनदर्शिका २०२६ सादर करण्यात आले

 



खालापुर/सुधीर देशमुख :- दैनिक रायगड स्वाभिमान ३ रे वर्धापन दिनानिमित्त प्रकाशित झालेल्या दिनदर्शिका २०२६ यांचे वितरण खालापुर तालुक्याचे नायाब तहसीलदार मा.श्री सुधाकर राठोड साहेब यांना श्री सुधीर देशमुख (प्रतिनिधी रायगड स्वाभिमान) यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.यावेळी तहसील कार्यालयातील वरीष्ठ अधिकारी व कर्मचारी मान्यवर मंडळी उपस्थित होती. 


या प्रसंगी नायब तहसीलदार यांनी प्रशासन व जनता यांच्यात चांगले संबंध व विकास कामांचे समन्वय साधण्यासाठी दैनिक व साप्ताहिक अशी माध्यम असते फार गरजेचे आहे.त्यामुळे जनता व प्रशासन यांच्यात दुवा साधण्याचा काम पत्रकार हे करत असतात.विचारांची देवाणघेवाण हि विकास कामातुन जाणिव करुन देण्याचा काम हे दैनिकाच्या माध्यमातून जनते पुढे मांडण्यासाठी पत्रकारांनी चांगले काम करावे हि अपेक्षा व शुभेच्छा नायाब तहसीलदार यांनी व्यक्त केली.

इनरव्हील क्लब खोपोलीतर्फे पत्रकार दिन सन्मानाने साजरा


* ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव ; लोकशाहीच्या चौथ्यास्तंभाला मानाचा मुजरा

खोपोली / प्रतिनिधी :- लोकशाहीच्या चौथ्यास्तंभाचा गौरव करणारा पत्रकार दिन इनरव्हील क्लब खोपोलीच्या वतीने अत्यंत सुसंस्कृत, सन्माननीय आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. बुधवार, 7 जानेवारी 2026 रोजी सहकार नगर येथील रोटरी क्लब हॉल, खोपोली येथे आयोजित या कार्यक्रमाने समाज आणि माध्यमांमधील नातेसंबंध अधिक दृढ केले.


या विशेष प्रसंगी अल्टा कंपनीचे मॅनेजर बाळासाहेब म्हात्रे यांच्या शुभहस्ते खोपोलीतील ज्येष्ठ व अनुभवी पत्रकार जयवंत माडपे, नितीन भावे, सुधीर माने, प्रशांत गोपाळे, संजय पाटील आणि एस. टी. पाटील यांचा त्यांच्या दीर्घकालीन, निष्ठावान व समाजोपयोगी पत्रकारितेची दखल घेत प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.


कार्यक्रमात बोलतांना इनरव्हील क्लब खोपोलीच्या अध्यक्षा दिना शाह यांनी सांगितले की, पत्रकार हे समाजाच्या विचारप्रवाहाचे मार्गदर्शक असतात. सत्यनिष्ठा, पारदर्शकता आणि सामाजिक बांधिलकी जपत केलेली पत्रकारिता समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्लबच्या सेक्रेटरी मधुमिता पाटील, खजिनदार दीपिका कोठारी, आय.एस.ओ. वर्षा शिवलकर, एडिटर भदोरिया यांच्यासह इनरव्हील क्लबच्या सर्व सदस्यांचे मोलाचे योगदान लाभले. सन्मान, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम ठरलेला हा पत्रकार दिन सोहळा उपस्थितांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहील, असा भावनिक व प्रेरणादायी ठसा उमटवून गेला.

साप्ताहिक खालापूर वार्ता व न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनतर्फे पत्रकार गौरव व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा

 


* दर्पण दिन व मराठी पत्रकार दिनानिमित्त 10 जानेवारीला खोपोलीत भव्य कार्यक्रम

खोपोली / प्रतिनिधी :- आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण दिनानिमित्त व मराठी पत्रकार दिन तसेच न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त साप्ताहिक ‘खालापूर वार्ता’ आणि न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य पत्रकार गौरव व दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, 10 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता, ज्येष्ठ नागरिक सभागृह, हस्तीमल मॉलसमोर, खोपोली (ता. खालापूर, जि. रायगड) येथे संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन कर्जत - खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थान न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय संयोजक डॉं. शरीफ बागवान भूषविणार आहेत. कार्यक्रमास पोलिस मित्र संघटना, नवी दिल्लीचे संस्थापक अध्यक्ष संतोषदादा चौधरी, न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी, खोपोली नगर परिषदेचे नवनियुक्त नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, खालापूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा रोशना मोडवे, खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉं. सुनील पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, शिवसेना उत्तर रायगड महिला जिल्हा प्रमुख सुप्रिया साळुंखे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अंकित साखरे, शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार गोविंद बैलमारे, जेष्ठ नगरसेवक मंगेश दळवी, सहज सेवा फाउंडेशनच्या सागरिका शेखर जांभळे, खालापूर तहसीलदार अभय चव्हाण, खोपोली पोलिस निरीक्षक सचिन हिरे, खालापुर पोलिस निरीक्षक सचिन पवार, खोनपा मुख्याधिकारी पंकज पाटील, न्युज जर्नालिस्ट असोसिएशन महिला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा इशिका शेलार, हेल्प फाउंडेशनच्या भक्ती साठेलकर, राष्ट्रवादी काँग्रेस युवती विभागीय अध्यक्ष अभिलाषा रोकडे यांच्यासह राजकीय, सामाजिक, प्रशासकीय व पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


* पत्रकार व मान्यवरांचा गौरव :- या सोहळ्यात समाजासाठी निष्ठेने कार्य करणाऱ्या पत्रकारांचा तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. याशिवाय खोपोलीतील नवनिर्वाचित नगरसेवकांचाही यावेळी विशेष सन्मान केला जाणार आहे.


* खालापूर वार्ताची सामाजिक भूमिका :- साप्ताहिक ‘खालापूर वार्ता’ हे वृत्तपत्र गेल्या पाच वर्षांपासून कर्जत - खालापूर तालुक्यातील उपेक्षित समाजघटक, शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी तसेच शासकीय कार्यालयांतील गैरव्यवहार यांसारख्या प्रश्नांना वाचा फोडून शासन दरबारी न्याय मिळवून देण्याचे कार्य सातत्याने करीत आहे.तर न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन ही संघटना पत्रकारांच्या हक्कांसाठी व सुरक्षिततेसाठी कार्यरत असून पत्रकारांना संघटित करण्याचे महत्त्वपूर्ण काम करीत आहे.


या कार्यक्रमाचे आयोजन न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा ‘खालापूर वार्ता’चे मुख्य संपादक सुधीर गोविंद माने, न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन राष्ट्रीय अध्यक्ष तथा साप्ताहीक खालापूर वादळचे मुख्य संपादक खलील सुर्वे, राष्ट्रीय महासचिव मानसी गणेश कांबळे आणि साप्ताहीक खालापूर वार्ताचे कार्यकारी संपादक संजय सदानंद पाटील यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे. मराठी पत्रकारितेच्या इतिहासाला अभिवादन करणारा, पत्रकारांच्या हक्कांचा आणि सामाजिक बांधिलकीचा जागर करणारा हा सोहळा पत्रकार व समाज यांच्यातील नातेसंबंध अधिक दृढ करणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

कुलदीपक शेंडे यांनी स्विकारला खोपोली नगराध्यक्षपदाचा पदभार


मंगेश काळोखे हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर साधेपणात पदग्रहण ; विकासाभिमुख कामांचा निर्धार

खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचा पदभार कुलदीपक शेंडे यांनी आज औपचारिकरीत्या स्विकारला. सामाजिक कार्यकर्ते मंगेश काळोखे यांच्या नुकत्याच झालेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर हा पदग्रहण सोहळा अत्यंत साधेपणाने पार पडला. यावेळी मुख्याधिकारी पंकज पाटील यांच्या हस्ते कुलदीपक शेंडे यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी प्रमुख उपस्थितांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, भाजप नेते दीपक बेहरे, शिवसेना नेते विजय पाटील व प्रसाद थोरवे यांचा समावेश होता. माजी उपनगराध्यक्ष मोहन औसरमल हेही व्यासपीठावर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करीत नव्या नेतृत्वाला शुभेच्छा दिल्या.

यावेळी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे व मुख्याधिकारी पंकज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

नगराध्यक्ष शेडें यांनी आपल्या भाषणात मंगेश काळोखे यांच्या दुर्दैवी हत्येमुळे हा सोहळा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. आमदार महेंद्र थोरवे तसेच शिवसेना पक्षाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. नागरिकांच्या प्रश्नांवर सर्वपक्षीय नगरसेवकांनी राजकीय भेद बाजूला ठेवून काम करावे, असे आवाहन करताना “राजकीय चपला बाहेर ठेवून शहराच्या विकासासाठी एकत्र काम करू या,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आगामी काळातील प्राधान्यक्रम सांगताना नगराध्यक्ष यांनी शहरातील दवाखाना सर्व सोयींनी युक्त करणे, शिवजयंतीपर्यंत नाट्यगृह उपलब्ध करून देणे, तसेच नवीन सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारणे या कामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला. पुढील पाच वर्षे विकासकामांसाठी कटीबद्ध राहण्याचा संकल्प त्यांनी यावेळी जाहीर केला.

सोहळ्याची सांगता मंगेश काळोखे यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तातडीच्या बैठकीसाठी आमदार महेंद्र थोरवे मुंबईस गेल्यामुळे ते या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र सर्वपक्षीय नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नूतन नगराध्यक्ष, नगरसेवक व नगरसेविकांना शुभेच्छा दिल्या.

Monday, January 5, 2026

चिंचवली शेकीन येथे श्री मांढरदेवी काळूबाई छबीना उत्सव धुमधडाक्यात संपन्न.....

 


खालापूर प्रतिनिधी: - खालापूर तालुक्यातील चिंचवली शेकीन येथे श्री मांढरदेवी काळूबाई छबीना उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. देवीच्या कृपेने आणि गुरुवर्य मधुकर मांडे यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम पार पडला.

शुकवार, 3 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत ज्ञानेश्वर हरिपाठ भजनी मंडळ, वरची खोपोली यांचे भजन झाले. त्यानंतर 6 ते 7 वाजेपर्यंत जोगेश्वरी महिला हरिपाठ मंडळ, हलीवली यांचा हरिपाठ झाला. सायंकाळी 7 वाजता देवीचा अभिषेक, होम हवन श्री भालचंद्र पटवर्धन गुरुजी आत्करगाव यांनी केले. सायंकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत चिंचवली येथील माऊली भजनी मंडळ, गायक ज्ञानेश्वरी कूडपाने यांचे भजन झाले.


रविवार, 4 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत काळुबाई देवीचा छबिना सोहळा व ग्राम प्रदक्षिणा फटाक्यांच्या आतिष बाजीत व ढोल ताशाच्या गजरात संपन्न झाला. दुपारी 2 वाजता देवीच्या आरतीचा मान सौ. सुवर्णा सुधीर माने व श्री. सुधीर गोविंद माने, राष्ट्रीय कोषाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, न्युज जर्नलिस्ट असोसिएशन यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. या वेळी चिंचवली, शेडवली, लौजी खोपोली, बदलापूर, अंबरनाथ वावर्ले येथील अनेक भाविकांनी सहभाग घेतला.

यावेळी ग्रामस्थ महिला मंडळ चिंचवली शेकिन, शेडवली लौजी येथील भाविक भक्त उपस्थित होते. अन्नदाते सुधीर माने, गोविंद वाल्को धारवे, विनोद जाधव सर, अजय मांडे, मनोर लांबे, संतोष घोलप, भगवान जाधव, अरुण गंभीर, प्रमोद जाधव, रमण जाधव, सचिन कदम, बबलू धनवडे, रवींद्र पार्टी, अक्षय घोलप, सिंधुताई मांडे, कुमार पाटील इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Sunday, January 4, 2026

खोपोलीत पत्रकार क्रिकेट संघाच्या खुल्या स्पर्धेत शिक्षकांची बाजी

 


* जिल्हा परिषद शिक्षक संघाने शानदार कामगिरी करीत प्रथम क्रमांक पटकाविला 

खालापूर / प्रतिनिधी :- खोपोली पत्रकार क्रिकेट संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेली खुली क्रिकेट स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडली. पंत पाटणकर मैदान, खोपोली येथे झालेल्या या स्पर्धेत जिल्हा परिषद शिक्षक संघाने दमदार आणि शिस्तबद्ध खेळाचे प्रदर्शन करीत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले, त्यामुळे शिक्षक क्रिकेट रसिकांसाठी हा दिवस खास ठरला.


* विविध विभागांचा सहभाग ; आयोजन यशस्वी :- या स्पर्धेत खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, खालापूर पोलिस ठाणे, खालापूर वकील असोसिएशन, खोपोली - खालापूर डॉंक्टर असोसिएशन, खोपोली पोलिस ठाणे, खोपोली नगर परिषद, हेल्प फाऊंडेशन, खोपोली - खालापूर पत्रकार संघ, खालापूर शिक्षक संघ आदी विविध संघांनी सहभाग नोंदविला. ही स्पर्धा पत्रकार तय्यब खान व पत्रकार आकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली.


* शिस्त, उत्साह आणि दर्जेदार खेळाचे दर्शन :- स्पर्धेदरम्यान शिक्षक संघाने दाखविलेला शिस्तबद्ध, उत्साही व दर्जेदार क्रिकेट हा विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरला. शिक्षक हे केवळ अध्यापनातच नव्हे, तर क्रीडा क्षेत्रातही आदर्श ठरू शकतात, हे या सामन्यांतून ठळकपणे अधोरेखित झाले, असे गौरवोद्गार उपस्थित पत्रकार बंधूंनी काढले.


* वैयक्तिक कामगिरीचा सन्मान :- स्पर्धेतील वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरीबाबत निवड करण्यात आली. उत्कृष्ट फलंदाज - भागिनाथ पोटे सर (शाळा : नारंगी), उत्कृष्ट गोलंदाज दादासाहेब मुंजाळ सर (शाळा : सावरोली). या उल्लेखनीय यशाबद्दल समस्त खालापूर तालुक्यातील शिक्षक बंधू - भगिनी तसेच पंचायत समिती खालापूर यांच्या वतीने विजयी संघाचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. जिल्हा परिषद शिक्षक संघाच्या या विजयाने स्थानिक क्रीडा चळवळीला नवी ऊर्जा मिळाल्याचे चित्र दिसून आले.


Friday, January 2, 2026

दैनिक पुढारीचा आदर्श पत्रकार पुरस्कार नेरळचे पत्रकार आनंद सकपाळ यांना प्रदान....

 


कर्जत/नरेश जाधव :- अलिबाग येथे आयोजित विशेष समारंभात नेरळ येथील पत्रकार आनंद सकपाळ यांना दैनिक पुढारीचा ‘आदर्श पत्रकार पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते गौरवपूर्वक प्रदान करण्यात आला.


  यावेळी दैनिक पुढारीचे निवासी संपादक शशिकांत सावंत तसेच अलिबाग आवृत्तीचे संपादक जयंत धुळप प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान पत्रकारितेतील मूल्यनिष्ठा, सामाजिक बांधिलकी व वस्तुनिष्ठ वार्तांकनासाठी आनंद सकपाळ यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करण्यात आला.

             

नेरळ परिसरातील विविध सामाजिक, ग्रामीण व जनहिताच्या प्रश्नांना सातत्याने व निर्भीडपणे वाचा फोडणाऱ्या आनंद सकपाळ यांच्या पत्रकारितेची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.



  पुरस्कार स्वीकारताना आनंद सकपाळ यांनी दैनिक पुढारी व्यवस्थापन, संपादकीय टीम तसेच वाचकांचे आभार मानले. हा सन्मान अधिक जबाबदारीने व प्रामाणिक पत्रकारिता करण्याची प्रेरणा देणारा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


या प्रसंगी पत्रकार, मान्यवर तसेच विविध क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

घरपट्टी व पाणीपट्टीवर 50 टक्के सवलत 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ

 


मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानाचा कालावधी वाढविण्याचा शासन निर्णय ; ग्रामस्थांना दिलासा

खालापूर / सुधीर देशमुख :- ग्रामीण भागातील नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय घेत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने सन 2025-26 साठी राबविण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानाचा कालावधी वाढविला आहे. या संदर्भातील नवीन शासन निर्णय 31 डिसेंबर 2025 रोजी जारी करण्यात आला असून, त्यानुसार घरपट्टी व पाणीपट्टीवरील 50 टक्के सवलत आता 31 मार्च 2026 पर्यंत लागू राहणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

* सवलतीचा कालावधी वाढल्याने ग्रामस्थांना लाभ :- मूळ शासन निर्णयानुसार या अभियानाचा कालावधी 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025 असा निश्चित करण्यात आला होता. मात्र, राज्यातील विविध परिस्थिती तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमांमुळे अभियानाची अंमलबजावणी अपेक्षित गतीने होऊ शकली नव्हती. या पार्श्वभूमीवर, अधिकाधिक ग्रामपंचायतींना सहभागाची संधी मिळावी आणि नागरिकांना कर सवलतीचा लाभ घेता यावा, यासाठी शासनाने कालावधी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.


* नवीन निर्णयानुसार सुधारित कालावधी :- नवीन शासन निर्णयानुसार ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानाचा कालावधी आता 17 सप्टेंबर 2025 ते 31 मार्च 2026 असा राहणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींना विकासकामे पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळेल, तसेच घरपट्टी व पाणीपट्टीवरील सवलतीचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना मुदतवाढ मिळणार आहे.


* ग्रामपंचायतींच्या सक्षमतेसाठी अभियान :- ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींना अधिक सक्षम स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविले जाते. ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या उत्कृष्ट कामगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी या अभियानांतर्गत तालुका, जिल्हा, महसूल विभाग आणि राज्य अशा चार स्तरांवर मूल्यमापन केले जाते. स्वच्छता, कर संकलन, पाणीपुरवठा, पायाभूत सुविधा, लोकसहभाग आदी बाबींमध्ये प्रभावी काम करणाऱ्या ग्रामपंचायतींचा सन्मानही या अभियानाचा भाग आहे.


* नागरिकांनी सवलतीचा लाभ घ्यावा :- शासन निर्णयामुळे घरपट्टी व पाणीपट्टीत 50 टक्के सवलत मिळत असल्याने ग्रामस्थांनी ही संधी न दवडता 31 मार्च 2026 पूर्वी कर भरणा करून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संबंधित यंत्रणांकडून करण्यात येत आहे. यामुळे ग्रामपंचायतींचे उत्पन्नही वाढेल आणि विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील कर भरणा सुलभ होऊन नागरिक, ग्रामपंचायती आणि शासन या तिन्ही घटकांना लाभ होणार आहे.