Thursday, January 8, 2026

कुलदीपक शेंडे यांनी स्विकारला खोपोली नगराध्यक्षपदाचा पदभार


मंगेश काळोखे हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर साधेपणात पदग्रहण ; विकासाभिमुख कामांचा निर्धार

खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचा पदभार कुलदीपक शेंडे यांनी आज औपचारिकरीत्या स्विकारला. सामाजिक कार्यकर्ते मंगेश काळोखे यांच्या नुकत्याच झालेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर हा पदग्रहण सोहळा अत्यंत साधेपणाने पार पडला. यावेळी मुख्याधिकारी पंकज पाटील यांच्या हस्ते कुलदीपक शेंडे यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी प्रमुख उपस्थितांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, भाजप नेते दीपक बेहरे, शिवसेना नेते विजय पाटील व प्रसाद थोरवे यांचा समावेश होता. माजी उपनगराध्यक्ष मोहन औसरमल हेही व्यासपीठावर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करीत नव्या नेतृत्वाला शुभेच्छा दिल्या.

यावेळी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे व मुख्याधिकारी पंकज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

नगराध्यक्ष शेडें यांनी आपल्या भाषणात मंगेश काळोखे यांच्या दुर्दैवी हत्येमुळे हा सोहळा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. आमदार महेंद्र थोरवे तसेच शिवसेना पक्षाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. नागरिकांच्या प्रश्नांवर सर्वपक्षीय नगरसेवकांनी राजकीय भेद बाजूला ठेवून काम करावे, असे आवाहन करताना “राजकीय चपला बाहेर ठेवून शहराच्या विकासासाठी एकत्र काम करू या,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आगामी काळातील प्राधान्यक्रम सांगताना नगराध्यक्ष यांनी शहरातील दवाखाना सर्व सोयींनी युक्त करणे, शिवजयंतीपर्यंत नाट्यगृह उपलब्ध करून देणे, तसेच नवीन सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारणे या कामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला. पुढील पाच वर्षे विकासकामांसाठी कटीबद्ध राहण्याचा संकल्प त्यांनी यावेळी जाहीर केला.

सोहळ्याची सांगता मंगेश काळोखे यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तातडीच्या बैठकीसाठी आमदार महेंद्र थोरवे मुंबईस गेल्यामुळे ते या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र सर्वपक्षीय नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नूतन नगराध्यक्ष, नगरसेवक व नगरसेविकांना शुभेच्छा दिल्या.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home