खोपोली शिळफाटा : छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर भीषण अपघात!
हैड्रा क्रेनची रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीस जोरदार धडक, जागीच मृत्यू ; अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
खोपोली / खलील सुर्वे :- खोपोली शिळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर गुरुवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. मुंबई–पुणे राष्ट्रीय महामार्गांवर रस्ता ओलांडत असलेल्या एका व्यक्तीस भरधाव वेगात येणाऱ्या हैड्रा क्रेनने जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,
पेणहून खोपोलीकडे भरधाव वेगात येत असलेल्या हैड्रा क्रेनसमोर एक व्यक्ती रस्ता ओलांडत होता. मात्र, रस्त्यावर लावण्यात आलेल्या लोखंडी बॅरिगेडमुळे तो नीट रस्ता पार करू शकला नाही आणि तोल जाऊन थेट क्रेनच्या चाकाखाली गेला. धडक एवढी भीषण होती की, व्यक्ती काही मीटर दूर फेकला गेला आणित्याचा जागीच मृत्यू झाला.
मृत व्यक्तीची ओळख पटली - माजी सैनिक विजय गुंडू परब :- या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव विजय गुंडू परब असे असून ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर, शहाणे आळी, शिळफाटा, खालापूर (खोपोली) येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. ते भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त सैनिक (माजी सैनिक) असल्याचे देखील समजते. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शिळफाटा परिसरातील रस्ता अरुंद - नागरिकांच्या जिवाला सतत धोका :- खोपोली शिळफाटा येथील वन विभाग चेकनाक्यापासून गाजीबाबा दर्ग्यापर्यंतचा रस्ता अत्यंत अरुंद आहे. या रस्त्यालगत वाईन शॉप्स, पानटपरी, किराणा दुकाने, हातगाड्या आणि
वाहनांची बेशिस्त पार्किंग यामुळे रस्ता कायमस्वरूपी अडलेला असतो. त्यातच दररोज शेकडो जड वाहने या मार्गांवरून जात असल्याने वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका वाढला आहे. शाळकरी विद्यार्थी, नोकरीसाठी जाणारे नागरिक आणि व्यावसायिक यांना कोंडीचा त्रास सहन करावा लागतो.
“नो-एंट्री” झोनमध्ये भरधाव वाहनांचा प्रवेश :- दररोजच्या वाहतूक कोंडीतून सुटका मिळवण्यासाठी अनेक वाहनचालक शॉर्टकट म्हणून नो-एंट्री झोनमध्ये प्रवेश करतात. भरधाव वेगात जाणाऱ्या या वाहनांमुळे पादचारींच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करीत म्हटले आहे की, रस्ता आधीच अरुंद आहे, त्यात अतिक्रमण, हातगाड्या आणि पार्किंगमुळे मोठ्या अपघातांना आमंत्रण दिले जात आहे. प्रशासनाने वेळेत उपाययोजना केल्या नाहीत, तर लवकरच मोठी दुर्घटना होईल.
रस्ता रुंदीकरण आणि अतिक्रमणावर तातडीने कारवाईची मागणी :- नागरिकांच्या म्हणण्यानुसार,
एमएसआरटीसी तसेच खोपोली नगर परिषद प्रशासनाने या ठिकाणचा रस्ता तातडीने रुंद करावा.
रस्त्यालगत वाढलेल्या अतिक्रमणावर हातोडा चालवावा.
रस्त्यावर नियमबाह्य पार्किंग, हातगाड्या आणि दुकाने हटवून वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित करण्यासाठी कायमस्वरूपी नियोजन करण्याची मागणी होत आहे.
मोठा अपघात होण्याआधी जागे व्हा ! :- या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, दररोज होणाऱ्या कोंडी आणि वेगवान वाहनांच्या दहशतीमुळे जनतेचा जीव धोक्यात आहे.
जवळच शाळा, बाजार, धार्मिक स्थळे आहेत. एखाद्या दिवशी मुलांच्या वा नागरिकांच्या जीवावर बेतणारा मोठा अपघात होऊ नये, यासाठी तातडीने कारवाई करा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home