Monday, September 29, 2025

कर्जत मध्ये सुसज्ज BPHU युनिटचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न....

 

कर्जत/नरेश जाधव :- आज दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी कर्जत तालुक्यातील आरोग्य सेवेच्या बळकटीसाठी एक महत्वाचे पाऊल उचलत उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट (BPHU) उभारण्यात आले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान व १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून साकारलेल्या या युनिटचे उद्घाटन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले. आरोग्य सेवा पुरवणे, सार्वजनिक आरोग्यासाठी उपाययोजना करणे, प्रयोगशाळा बळकट करणे आणि तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून उत्तम उपचार उपलब्ध करून देणे हे या युनिटचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

या प्रसंगी आमदार महेंद्र थोरवे म्हणाले की, “कर्जत तालुक्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी हे युनिट महत्वाची भूमिका बजावणार आहे. अनुभवी डॉक्टरांच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर दर्जेदार सेवा दिली जाणार असून, डॉक्टरांनी आपल्या अडचणी वेळेत प्रशासनासमोर मांडल्यास त्या दूर करून अधिक प्रभावी सेवा देता येईल.” त्यांनी ‘स्वस्थ नारी–सशक्त परिवार’ सारख्या उपक्रमांचे कौतुक करत महिलांच्या सशक्तीकरणासाठी आरोग्यसेवा हा महत्त्वाचा आधार असल्याचेही सांगितले.

उद्घाटन कार्यक्रमास भाजपाचे सरचिटणीस दीपक बेहेरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय मस्कर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन गुरव, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण शिंदे, शासकीय रुग्णालय कशेळे येथील डॉ. बालाजी फाळके, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, रायगड मेडिकल कॉलेजचे व्यवस्थापक कुशाग्र पटेल यांच्यासह आशा वर्कर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या युनिटच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळून ग्रामीण भागातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला नवीन बळ मिळणार आहे.


0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home