तहसिलदार साहेब ! माजी सैनिकाला न्याय द्याल का ?
* वर्षभरापासून अवैध भराव, झाडे तोडल्याबद्दल लढा सुरु
*नायब तहसिलदार राठोड यांच्याकडून तक्रारदाराची माहिती उघड
* तत्कालिन मंडळ अधिकारी गणेश मुंडे यांच्याकडून अरेरावी
* मार्च 2024 पासून वन विभागाकडे तक्रार पण कार्रवाई नाही
* खालापूर तहसिलदार यांच्याकडून लोकशाही दिनाचा पर्याय
* माजी सैनिकाला जीवे मारण्याची धमकी तरीही पोलिस प्रशासन धिम्म
खालापूर / विशेष प्रतिनिधी :- तालुक्यातील कलोते रयती येथील रहिवासी तुषार तुळशीदास येरूणकर हे माजी सैनिक असून 17 वर्ष त्यांनी भारतीय सेनेत सेवा दिली आहे. अन्यायाविरूध्द पेटून उठायचे...देशाला सर्वोच्च प्राधान्य द्यायचे...देश व समाजाच्या शत्रूंविरोधात जिवाची पर्वा न करता लढा द्यायचा, असे बाळकडू त्यांना सैनिक जिवनात मिळाले आहे आणि त्याच तत्व व मूल्याच्या अनुषंगाने सन 2024 पासून अवैध भराव, उत्खनन व झाडे तोडल्याबद्दल ते लढा देत आहेत, पण खालापूर तहसिल (महसूल), वन विभाग व पोलिस प्रशासनाकडून 'तारीख पे तारीख' देत वेळकाढूपणा केला जात असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, तहसिलदार अभय चव्हाण यांच्या केबीनबाहेर माजी सैनिकांना प्राधान्य दिले जाईल, असा भला मोठा फलक लावला आहे. पण जानेवारी 2024 पासून माजी सैनिकाचा लढा सुरू आहे आणि अजून न्याय मिळालेला नाही, तरी फलकावर लिहलेल्या ओळी प्रत्यक्षात उतरतील का ? खालापूर तहसिलदार अभय चव्हाण माजी सैनिकाला न्याय देतील का ? असा प्रश्न स्वत: माजी सैनिक येरूणकर यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, माजी सैनिक तुषार येरूणकर यांनी 19 मार्च 2024 रोजी चौक मंडळ अधिकारी यांना कलोते रयती सर्वे नं. 10 मध्ये अवैध मातीचा भराव सुरू असल्याबाबत तक्रार अर्ज दिला होता. त्या अनुषंगाने 20 मार्च 2024 रोजी मंडळ अधिकारी व तलाठी सदर ठिकाणी पंचनामा करण्यासाठी आले. यावेळी त्यांनी तक्रारदार माजी सैनिक येरूणकर यांना बोलावून घेतले. येरूणकर सदर जागी पोहचल्यावर अरूण आबा येरूणकर, यशवंत आबा येरूणकर, अश्विनी अरूण येरूणकर यांनी माजी सैनिकाला शिवीगाळ देण्यास सुरूवात केली. माजी सैनिकाला मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यासमोर जिवंत गाडण्याची व संध्याकाळी बघून घेण्याची धमकी देण्यात आली.
दरम्यान, या प्रकरणी माजी सैनिक येरूणकर यांनी खालापूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. परंतु पोलिसांनी परस्पर बोलावून प्रकरण निकाली काढले होते. माजी सैनिकाला आपली बाजू मांडण्याची संधी देखील देण्यात आली नव्हती. अखेर 13 ऑगस्ट 2024 रोजी माजी सैनिक येरूणकर यांनी रायगड जिल्हा पोलिस अधिक्षक यांना लेखी निवेदन देवून पोलिस संरक्षणाची मागणी केली होती. 20 एप्रिल 2024 रोजी माजी सैनिकाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तसेच अवैध भराव व झाडे तोडणाऱ्या धनदांडग्यावर खालापूर पोलिस स्टेशनला भारतीय दंड संहिता 1860 नुसार कलम 504, 506 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पण जवळजवळ एक वर्ष उलटला तरी कार्रवाई करण्यात आलेली नाही. आजही माजी सैनिक येरूणकर व त्यांचे कुटुंब दहशतीखाली वावरत आहेत तर दुसरीकडे धमकी देणारा मदमस्त आयुष्य जगत आहे... सर्रासपणे अवैध कामे करीत आहे.
* नायब तहसिलदार सुधाकर राठोड यांनी पुरवली माहिती :-
कलोते रयती येथे शनिवार, 22 मार्च 2025 रोजी संध्याकाळी 5 नंतर जेसीबी व ट्रकच्या सहाय्याने रात्री 8.30 ते 9 वाजेपर्यंत मातीचा भराव सुरू होता. या घटनेची माहिती माजी सैनिक तुषार येरूणकर यांनी तलाठी यांना फोनवरून दिली. त्यानुसार रविवार, 23 मार्च 2025 रोजी तलाठी यांनी सदर जागेवर भेट दिली. तलाठी यांना याबाबत माहिती विचारली असता ते म्हणाले की, शेततळ्याचे काम सुरू आहे. दुसरीकडे कृषी विभागाकडे विचारणा केली असता, त्याने फक्त ऑनलाईन अर्ज केला आहे, अद्याप मंजुरी मिळालेली नाही. तसेच ऑनलाईन अर्ज केलेला सर्वे व प्रत्यक्षात काम सुरू असलेला सर्वे यात तफावत आहे. सरकारी सुट्टी असल्याने कुणीही बाधा घालणार नाही... परवानगीची विचारणा करणार नाही, याची जाणीव असल्याने किंवा तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याशी सुत जुळल्याने त्यांनीच आयडीया दिली असू शकते, असा आरोप माजी सैनिक येरूणकर यांनी केला आहे. ऐवढेच नव्हे तर सदर जागेचा मालक एक व्यक्ती असून काम वेगळीच व्यक्ती करीत आहे, असा अर्ज माजी सैनिक तुषार येरूणकर यांनी 25 मार्च 2025 रोजी खालापूर तहसिलदार यांच्या नावाने अर्ज केला होता. परंतु याबाबत अद्याप कार्रवाई करण्यात आलेली नाही.
दरम्यान, 23 मार्च 2025 रोजी संध्याकाळी 7 वाजता माजी सैनिक तुषार येरूणकर यांनी खालापूरचे निवासी नायब तहसिलदार सुधाकर राठोड यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर मेसेज करीत संध्याकाळी 5 ते रात्री 8.30 ते 9 वाजेपर्यंत भराव चालू होता, तरी याबाबत कार्रवाई करावी अशी मागणी केली. परंतु कार्रवाई न करता निवासी नायब तहसिलदार राठोड यांनी सदर व्यक्तीला मेसेज फॉरवर्ड केला. सदर मेसेज उत्खनन व भराव करणाऱ्या व्यक्तीला मिळाल्याने माजी सैनिक येरूणकर यांचा जीव दुसऱ्यांदा धोक्यात आला आहे. ऐवढेच नव्हे तर अवैध भराव व उत्खनन करणाऱ्याने आपल्यावर कार्रवाई होवू नये यासाठी संबधित कुटुंबातील महिलेने पोलिस अधीक्षक, सैनिक कल्याण बोर्ड अलिबाग यांना तक्रार केली आहे की, तुषार येरूणकर माजी सैनिक असल्याचा फायदा घेत असून आम्हाला त्रास देत आहे...त्याच्यापासून माझ्या पतीच्या जीवाला धोका आहे, असा अर्ज केला आहे. निवासी नायब तहसिलदार सुधाकर राठोड यांनी सदर मेसेज फॉरवर्ड केल्यामुळेच सदर महिलेने माझ्या विरोधात तक्रार केली आहे, असा आरोप माजी सैनिक तुषार येरूणकर यांनी केला आहे.
चोर तर चोर वर शिरजोर असा प्रकार सध्या खालापूर तालुक्यात सुरू आहे. तर दुसरीकडे निवासी नायब तहसिलदार सुधाकर राठोड यांनी आपली जबाबदारी न निभावता उलट तक्राराचा जीव धोक्यात घातला आहे. माजी सैनिक येरूणकर यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या तसेच गुप्त माहिती, तक्रार व तक्राराची माहिती गुन्हा करणाऱ्यापर्यंत पोहचविणाऱ्या राठोड यांच्यावर कार्रवाई करावी, अशी मागणी माजी सैनिक तुषार येरूणकर यांनी केली आहे.
* तत्कालिन मंडळ अधिकारी गणेश मुंडे यांच्याकडून अरेरावी :-
20 एप्रिल 2024 रोजी तक्रारीची चौकशी करण्यासाठी आलेल्या तत्कालिन मंडळ अधिकारी गणेश मुंडे यांनी देखील आपले कर्तव्य न निभावता उलट माजी सैनिक तुषार येरूणकर यांना अरेरावी केली होती. येरूणकर यांनी शासनाची होत असलेली फसवणूक रोखण्यासाठी फोन केला होता तसेच तसा अर्ज केला होता पण शासनाची मदत करणाऱ्या व्यक्तीवरच शासकीय अधिकारी असलेले...आपली जबाबदारी, कर्तव्याकडे दुर्लक्ष करीत असलेले गणेश मुंडे व तलाठी माधव कावरखे यांनी कार्रवाईचे नाटक केले होते.
* मार्च 2024 पासून वन विभागाकडे तक्रार पण कार्रवाई नाही :-
सर्वे नंबर 10/1 आणि 15 मध्ये नोव्हेंबर - डिसेंबर 2023 काळात झाडे तोडण्यात आली होती. ही झाडे परवानगी घेवून तोडण्यात आली का ? याबाबत 8 जानेवारी 2024 माजी सैनिक तुषार येरूणकर यांनी माहिती अधिकार कायद्यांत अर्ज केला होता, परंतु माहिती मिळाली नाही. प्रथम अपिल केल्यानंतर वन विभागाने 18 मार्च 2024 जनमाहिती अधिकारी तथा वन परिक्षेत्र अधिकारी खालापूर यांनी कलोते रयती सर्वे नंबर 10/1 व 15 मधील कोणत्याही प्रकारची झाडे तोडण्याची परवानगी देण्यात आलेले नाही, असे सांगितले.
दरम्यान, संबधित झाडे तोडणाऱ्यावर कार्रवाई करावी अशी मागणी करणारा अर्ज 19 मार्च 2024 रोजी माजी सैनिक तुषार येरूणकर यांनी केला होता. परंतु याबाबत वारंवार अर्ज करूनही कार्रवाई करण्यात आलेली नाही. नेमके वन अधिकारी झाडे तोडणाऱ्यांना का वाचवत आहेत ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. ऐवढेच नव्हे तर येरूणकर म्हणाले की, खोटा पंचनामा करीत फसवणूक करण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोन वेळा कार्रवाई करण्याचे आदेश देवूनही कार्रवाई करण्यात आलेली नाही.
* खालापूर तहसिलदार यांच्याकडून लोकशाही दिनाचा पर्याय :-
माजी सैनिक तुषार येरूणकर यांनी 22 एप्रिल 2025 रोजी खालापूर तहसिलदार अभय चव्हाण यांची भेट घेतली व 25 मार्च 2025 च्या अर्जाबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच 2024 पासून सुरू असलेल्या लढ्याबाबत देखील येरूणकर यांनी आपबिती सांगितली. दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिन खालापूर तहसील कार्यालयात राबविला जातो. तरी आपण या लोकशाही दिनात अर्ज करावा, तुमच्या तक्रारीला प्राधान्य देवू असे सांगितले. तुम्ही माजी सैनिक असल्याचा अद्याप फायदा घेतलेला नाही तरी आम्ही आपणांस फायदा देवू, असे तहसिलदार अभय चव्हाण यांनी माजी सैनिक तुषार येरूणकर यांना सांगितले.
परंतु लोकशाही दिनात तक्रार केल्यावरच कार्रवाई होईल का ? मागील एक वर्षापासून माजी सैनिक तुषार येरूणकर लढत आहेत. वारंवार अर्ज, तक्रारी करीत आहेत...पाठपुरावा करीत आहेत, तहसील कार्यालयात वारंवार येरझाऱ्या मारत आहेत. तहसील कार्यालय, वन विभाग, पोलिस प्रशासन यांच्याशी संपर्कात आहेत. पण त्यांच्या तक्रारीवर तत्काळ कार्रवाई न करता आता लोकशाही दिनाचा पर्याय सुचविण्यात आला तरी प्रशासन अजुन किती दिवस या प्रकरणाचे भिजत घोंगडे ठेवणार आहे. आंदोलन, उपोषण केल्यावरच न्याय मिळणार का ? असा प्रश्न उपस्थित करून गरज पडल्यास आपण महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या मुंबई येथील निवासाबाहेर कुटुंबासह उपोषणाला बसू असा, इशारा माजी सैनिक तुषार येरूणकर यांनी दिला आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home