Monday, April 21, 2025

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा खेळखंडोबा

 


* कर्जत आरोग्य विभागाकडून शासनाची फसवणूक

*अधिकाऱ्यांनी विधान परिषदेला दिली खोटी माहिती

 * कोऱ्या कागदावर कुणी महिलेने सही करून देवू नये!

* दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कार्रवाईची मागणी 

* राज भवनाबाहेर एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन

कर्जत / प्रतिनिधी :- कर्जत तालुका आरोग्य खात्याने प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ मिळण्यापासून जवळपास 5 हजारांपेक्षा जास्त महिलांना वंचित ठेवल्याचा मुद्दा विधान परिषदेत ‍मांडण्यात आला. यासाठी विधान परिषदेत विचारण्यात आलेल्या तारांकित प्रश्नाला कर्जत आरोग्य खात्याकडून चक्क खोटी ‍माहिती पुरविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार माहितीच्या अधिकारात उघड झाला आहे. 

एकीकडे तालुका आरोग्य अधिकारी डॉं. नितीन गुरव यांनी जिल्हा आरोग्य विभागास लिहीलेल्या पत्रामध्ये लिहीले आहे की, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेची कसलीच ‍माहिती त्यांच्याकडे नाही. तर दुसरीकडे, तालुक्यात अनेक गोरगरीब व आदिवासी महिला योजनेच्या लाभापासून वंचित असताना आणि प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेची कसलीच माहिती कार्यालयात नसताना या योजनेमध्ये कोणताही गैरप्रकार झालेला नाही, असे उत्तर आरोग्य खात्याकडून विधान परिषदेला देण्यात आले आहे. कर्जत तालुका आरोग्य अधिकारी यांनी दोषी कर्मचारी प्रविण भोईर याला वाचविण्यासाठी शासनाची आणि जनतेची फसवणूक चालवली आहे, असा आरोप आंदोलक पत्रकार राजेंद्र जाधव व आदिवासी समाज कार्यकर्ती सुचिता लोहोकरे यांनी केला आहे. 

कंत्राटी समूह संघटक शीतल चौधरी यांनी आशा सेविकांकडील प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेसाठी लाभार्थी महिलांची नाव नोंदविलेल्या रजिस्टर मधल्या आकड्यांची दोन वेळा लेखी खोटी माहिती देऊन खोटे सरकारी दस्तऐवज तयार करण्याचा गंभीर गुन्हा केला आहे. तर तालुका लेखापाल अनिता महाडिक ह्यांनी स्वत:ची आणि कंत्राटी डाटा एंट्री ऑपरेटरची खोटी फिरती बील पास करुन आतापर्यंत हजारों रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार केला आहे, असे ही आंदोलक पत्रकार राजेंद्र जाधव व आदिवासी समाज कार्यकर्ती सुचिता लोहोकरे यांनी सांगितले. 

दरम्यान, ही माहिती माहितीच्या अधिकारात उघड होऊन पण आणि वारंवार तक्रारी करून सुद्धा या तिन्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांविरुद्ध कोणत्याही वरिष्ठ अधिकारी अथवा प्रशासनाने अजूनपर्यंत काहीच कारवाई केलेली नाही. त्यामुळे तालुका आरोग्य खाते आणि जिल्हा परिषदेने या कंत्राटी कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न चालविलेला आहे हे उघड होत आहे. या कर्मचाऱ्यांवर व त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे. 

पत्रकार राजेंद्र शिवाजी जाधव व आदिवासी समाज कार्यकर्ती सुचिता लोहोकरे यांनी कर्जत तालुक्यातील सर्वच महिलांना मातृत्व वंदना योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी केली आहे. यासाठी सर्व कागदपत्रे गोळा करीत त्यांनी प्रधानमंत्री कार्यालयासह राज्यपाल व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केली असून पाठपुरावा सुरू आहे. या योजनेची चौकशी कासवगतीने सुरू असल्याबद्दल पत्रकार जाधव व लोहोकरे यांनी संताप व्यक्त केला असून मातृत्व वंदना योजना अपहाराबद्दल शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार राजेंद्र जाधव व आदिवासी समाज कार्यकर्ती सुचिता लोहोकरे यांच्यासह न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनची टीम महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या निवासाबाहेर एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन करणार आहे, तसे निवेदन संबधित विभागाकडे देण्यात आले आहे. 

कर्जत तालुका आरोग्य खात्याकडून ज्या महिलांना योजनेचा लाभ मिळालेला नाही, त्यांच्याकडून कोऱ्या कागदावर सह्या घेण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. तसेच कर्जत तालुका आरोग्य खात्याकडून सर्व महिलांकडून त्यांची कागदपत्रे फॉर्म अपडेट करण्याच्या नावाखाली गोळा केली जात आहेत. सर्व महिलांना पत्रकार राजेंद्र जाधव व आदिवासी समाज कार्यकर्ती सुचिता लोहोकरे यांनी जाहीर आवाहन केले आहे की, त्यांनी आशा सेविकांना कोऱ्या कागदावर किवा रजिस्टरवर सह्या देऊ नये आणि फॉर्म अपडेट करण्यासाठी जर कागदपत्रे घेतली असतील तर अपडेट केलेल्या फॉर्मची प्रिंट आशा सेविकांकडून घ्यावी व त्यामध्ये बाळाची जन्मतारीख तपासून बघावी. बाळाची जन्म तारीख सरकारी पोर्टलवर ऑनलाईन चुकीची भरली तर पुढे समस्या निर्माण होऊ शकते म्हणून फॉर्ममध्ये आपल्या बाळाची जन्मतारीख चुकीची असली तर याची माहिती आम्हाला 9923221188, 7844863333, 82751 50331या दुरध्वनी क्रमांकावर द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home