खालापूर टोलनाक्याजवळ वाहनचालकांवर दरोडा टाकणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात
खालापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई
तिघेजण गजाआड, दोन फरार आरोपींचा शोध सुरू!
खालापुर कर्जत / सुधीर देशमुख :- मुंबई–पुणे एक्सप्रेस हायवेवरील खालापूर टोलनाक्याजवळ वाहन चालकांवर दरोडा टाकणाऱ्या टोळीचा खालापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या गुन्ह्यातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, दोन आरोपी फरार आहेत. अटक आरोपींकडून १५ हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. या धाडसी कारवाईने महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीचे वातावरण कमी झाले आहे.
२९ सप्टेंबरच्या पहाटे साडेचारच्या सुमारास फिर्यादी दिनेश बुधाराम गोदारा आणि त्याचा मित्र सुरेंद्र जांगु हे मुंबईकडे जात असताना खालापूर टोलनाक्याजवळील शौचालयाजवळ थांबले. त्याच वेळी झाडीत दबा धरून बसलेल्या पाच चोरट्यांनी त्यांना जबरदस्तीने ओढत नेऊन मारहाण केली. कोयत्याचा धाक दाखवून त्यांनी दोघांकडून एकूण ३६,५०० रुपये रोख आणि ओळखपत्रे जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि अंधारात पसार झाले. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप यांनी रात्री गस्तीदरम्यान घटनास्थळी धाव घेतली. IRB डेल्टा फोर्सचे प्रविण सावंत आणि राजेश शिंदे यांच्या मदतीने हायवेलगत झाडीत संशयास्पद हालचाली दिसताच पोलिसांनी पायपीट करीत सापळा रचला. थोड्याच वेळात चोरट्यांचा गट शेतातून पळताना दिसला. तेव्हा पोलिसांनी अत्यंत शिताफीने पाठलाग करून अनिल अशोक पवार (२५, रा. शिरवली) याला पकडले आणि त्याने चौकशीत त्याच्या साथीदारांची देखील नावे उघड केली. अनिल पवारच्या या कबुलीनंतर किशोर विठ्ठल पवार (२३) आणि गुरुनाथ उर्फ किशोर अशोक पवार (१८) या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. सर्व आरोपी हे खालापूर तालुक्यातीलच असल्याचे निष्पन्न झाले आहे. उर्वरित दोघे आरोपी फरार असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. अटक आरोपींना न्यायालयाने ८ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी दिली असून, त्यांच्या चौकशीत आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी तपासादरम्यान आरोपींकडून लुटलेल्या पैशांपैकी १५,००० रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. आरोपींचा पूर्वीचा गुन्हेगारी इतिहासही उघड झाला असून, त्यांनी यापूर्वी अनेक चोरी, दरोड्याचे गुन्हे केल्याचे नोंदीत आढळले आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल आणि पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी कार्यवाही पथकात पो.उप.नि. अशोक जगताप, पोशि अर्जुन मोरे, शिवाजी लोरे, चालक संदेश कावजी, होमगार्ड गायकवाड यांचा समावेश होता.
*जनतेस पोलिसांचे आवाहन*
वाहनचालकांनी प्रवास करीत असताना एक्सप्रेस हायवेवर केवळ अधिकृत ठिकाणीच वाहन थांबवावे, झाडीझुडपाजवळ किंवा अंधाऱ्या ठिकाणी थांबू नये, संशयास्पद व्यक्ती दिसल्यास ११२ या क्रमांकावर किंवा खालापूर पोलीस ठाणे (०२१९२-२७५०३३) येथे संपर्क साधावा.
*संपर्क क्रमांक*
पो. उपनिरीक्षक अशोक जगताप: ९३२५१३३९२९
खालापूर पोलीस ठाणे: ०२१९२-२७५०३३


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home