खोपोलीत मटका जुगारावर LCB ची कारवाई; आरोपी रंगेहात पकडला...
खालापूर/ नरेश जाधव :- खालापूर तालुक्यातील खोपोली बाजारपेठ परिसरात सुरू असलेल्या मटका जुगारावर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग (LCB), रायगड यांनी धडक कारवाई करत एका आरोपीस रंगेहात अटक केली आहे.
दि. २ एप्रिल २०२६ रोजी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ११६/२०२६ नोंदविण्यात आला असून, महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खोपोली बाजारपेठ (ता. खालापूर, जि. रायगड) येथे संबंधित आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी नागरिकांकडून पैसे स्वीकारून ‘कल्याण’ नावाचा मटका जुगार चालवत होता. याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.
कारवाईदरम्यान पोलिसांनी एकूण ३,०४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, त्यामध्ये विविध दरांच्या भारतीय चलनी नोटा तसेच मटका जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य समाविष्ट आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे तसेच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या पथकात सपोनि मानसिंग पाटील, सहायक फौजदार संदीप पाटील, पोलीस हवालदार प्रतीक सावंत, रवी मुंडे, रणजितसिंह खराडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप खरात यांनी सहभाग घेतला. पेट्रोलिंगदरम्यान रणजितसिंह खराडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही यशस्वी कारवाई करण्यात आली.

Comments
Post a Comment