Saturday, January 17, 2026

आमदार महेंद्रशेठ थोरवे फाउंडेशन स्वामिनी महिला प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्षा सौ. कांचनताई जाधव यांच्या संकल्पनेतुन महिलांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न.....

 


खोपोली /मानसी कांबळे :- आमदार महेंद्रशेठ थोरवे फाउंडेशन स्वामिनी महिला प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्षा सौ. कांचनताई जाधव यांच्या संकल्पनेतुन स्वराज्य जननी थोर राजमाता जिजाऊ तसेच भारतीय समाजसुधारक पहिल्या शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने महिलांचा सन्मान सोहळा सायन्स क्लब खोपोली, जुना मुंबई-पुणे हायवे खोपोली येथे पार पडला.


यावेळी खोपोली शहरात महिलांसाठी नेहमी कार्यरत असणाऱ्या नगरसेविका सुवर्णा मोरे यांना राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच शिक्षिका सावित्री जाधव यांना सावित्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे मा. श्री. कुलदीपकभाई शेंडे (नगराध्यक्ष खो.न.प.), नगरसेवक अनिल सानप, दिनेश थोरवे, नगरसेविका सुवर्णा मोरे, श्रुती पालांडे ,वंदनाताई मोरे ताराराणी ब्रिगेड महिला प्रदेश अध्यक्ष, नगरसेविका सानिया शेख, केविना ताई गायकवाड तसेच खोपोली शहरातील अनेक नवनिर्वाचित नगरसेविका उपस्थित होत्या. यावेळी महिलांची असंख्य उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली. तसेच हळदी कुंकू समारंभ पार पडला.


आमदार महेंद्रशेठ थोरवे फाउंडेशन स्वामिनी महिला प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्षा सौ. कांचनताई जाधव, शितल डोखले,उज्ज्वला वाघेला, आशा जाधव,सावित्री जाधव, संध्या जाधव यांच्या मेहनतीने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.






के.एम.सी. कॉलेज खोपोली येथे वैद्यकीय एचआयव्ही तपासणी शिबिराचे आयोजन....

 


खोपोली /खलील सुर्वे :-  शिबिर इनर व्हील क्लब ऑफ खोपोली तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने एचआयव्ही तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन के .एम.सी. कॉलेज खोपोली येथे करण्यात आले. एनसीसी युनिटअंतर्गत वैद्यकीय एचआयव्ही तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. एचआयव्हीबाबत जनजागृती करणे व वेळेवर तपासणीचे महत्त्व पटवून देणे हा शिबिराचा मुख्य उद्देश होता.


के.एम.सी. कॉलेजच्या प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली केटीएसपी मंडळाचे सदस्य संतोष जंगम सर, दिलीप पोरवाल सर तसेच सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने शिबिर आयोजित करण्यात आले, ज्यामुळे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे योगदान लाभले. हा कार्यक्रम एएनओ कॅप्टन शीतल कृष्णा गायकवाड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. त्यांनी एनसीसी कॅडेट्सना एचआयव्ही संदर्भात आवश्यक माहिती देत मार्गदर्शन केले.


शासकीय रुग्णालयातील प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी पूर्ण काळजी व गोपनीयता राखून तपासणी केली. के.एम.सी. कॉलेजचे उपाध्यक्ष पोरवाल सर यांनी कार्यक्रमाच्या सुरळीत आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वी संचालनात डॉ. शाह मॅडम, सिस्टर ताईडे मॅडम तसेच इनर व्हील क्लब खोपोलीच्या अध्यक्षा व सदस्या शाह मॅडम आणि पाटील मॅडम यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले.


या शिबिरात ३८ एनसीसी कॅडेट्सनी शिस्तबद्ध व सक्रिय सहभाग घेतला. तसेच इनर व्हील क्लबच्या वतीने जनजागृतीसाठी गायन व भाषण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. हे शिबिर विद्यार्थी व कर्मचारी वर्गासाठी अत्यंत उपयुक्त व यशस्वी ठरले.

डाक विभागाकडून जीवन विमा योजनेअंतर्गत विमा सल्लागारच्या भरतीसाठी मुलाखती.....

 


नांदेड/प्रतिनिधी :- नांदेड डाक विभागाकडून डाकजीवनविमा (पीएलआय) आणि ग्रामीण डाक जीवन विमा (RPLI) योजनेअंतर्गत "डायरेक्ट एजंट" (विमा सल्लागार) च्या भरतीकरिता मुलाखती घेण्यात येत आहेत. सदरील अर्ज अधिक्षक डाकघर कार्यालय नांदेड विभाग नांदेड येथे उपलब्ध आहेत. सर्व इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून शुक्रवार 23 जानेवारी 2026 रोजी कार्यालयीन वेळत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अधिक्षक डाकघर कार्यालय नांदेड विभाग नांदेड 431601 येथे थेट मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे व सोबत बियोडाटा मूळ कागदपत्र, प्रमाणपत्र / अनुभव प्रमाणपत्र घेऊन येणे आवश्यक आहे, असे आवाहन अधिक्षक डाकघर नांदेड विभाग नांदेड यांनी केले आहे.


पात्रता व मापदंड :- वयोमर्यादा: उमेदवाराचे वय मुलाखतीच्या दिवशी कमीत कमी १८ वर्ष असावे. शैक्षणिक पात्रता: अर्जदार हा केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे मान्यताप्राप्त बोर्डाची १० वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा. 


श्रेणी : - बेरोजगार/स्वयंबेरोजगार, माजी विमा सल्लागार, कोणत्याही विमा कंपनीचा माजी विमा एजंट, माजी सैनिक, सेवानिवृत्त शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ते, महिला मंडळ कार्यकर्ते, ग्राम प्रधान, ग्राम पंचायत सदस्य ई. टपाल जीवन विमा प्रतिनिधी साठी थेट असे अर्ज करू शकतात.


उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे होईल. यात व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, जीवन विमा बाबतचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान, स्थानिक भागाची माहिती इ. बाबीवर चाचणी होईल. निवड झालेल्या उमेदवारास 5 हजार रुपये एवढी रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवावी लागेल. जी NSC/KVP च्या स्वरूपात असेल.


रुपये 5 हजार एवढी रक्कमेची NSC/KVP अधीक्षक डाकघर यांच्या नावाने प्लेज केल्यावर एजंट आयडी प्रदान करण्यात येईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपात परवाना देण्यात येईल. जो IRDA ची परवाना परीक्षा पास केल्यानंतर कायम स्वरूपाच्या परवाना मध्ये रुपांतरीत केली जाईल. सदर परीक्षा 3 वर्षाच्या आत उत्तीर्ण करणे अनिवार्य राहील. नियुक्ती ही लायसन्स आणि कमिशन तत्वावर राहील असेही आवाहन अधिक्षक डाकघर नांदेड विभाग नांदेड यांनी केले आहे.

Friday, January 16, 2026

हाळ खुर्द गावातील मुस्लिम व आदिवासी समाजाला कबरस्तान कधी ?

 


शंभर वर्षांपासून वंचित समाजांचा जिल्हाधिकाऱ्यांना सवाल

* जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालयाकडून कागदपत्रांवर टाळाटाळीचा आरोप

खालापूर / के. डी. सुर्वे :- रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेल्या हाळ खुर्द ग्रामपंचायतीतील मुस्लिम व आदिवासी (कातकरी) समाज गेल्या शंभर वर्षांहून अधिक काळापासून दफनभूमी (कब्रस्थान) व स्मशानभूमीपासून वंचित असल्याची धक्कादायक बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. या दोन्ही समाजांना मूलभूत मानवी हक्क असलेली अंत्यविधीसाठीची जागा मिळावी, याबाबत प्रशासनाकडून होत असलेली दिरंगाई व टाळाटाळ पाहता ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

* शासकीय जमिनीबाबत प्रस्ताव असूनही प्रक्रिया रखडली :- या प्रकरणात 30 जून 2025 रोजी निवासी उपजिल्हाधिकारी, रायगड (अलिबाग) यांच्याकडून पत्र देण्यात आले होते. त्यामध्ये मौजे हाळ खुर्द, ता. खालापूर, जि. रायगड येथील स. नं. 38 (1), क्षेत्र 5.77.00 हेक्टर आर या गायरान (गुरचरण) शासकीय जमिनीपैकी 0.40 हेक्टर क्षेत्र स्मशानभूमीसाठी (ग्रामपंचायतीस) 0.80 हेक्टर क्षेत्र मुस्लिम समाजाच्या दफनभूमीसाठी देण्याची विनंती करण्यात आली होती. या मागणीच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी, कर्जत यांचा स्थळपाहणी अहवाल तयार करून 13 मार्च 2024 रोजी शासनाकडे अहवाल सादर केल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, त्या गायरान जमिनीवर हाळ कातकरीवाडीची प्राथमिक शाळा, अंगणवाडी, समाज मंदिर व सार्वजनिक शौचालय आधीच अस्तित्वात असल्याचेही अहवालात नमूद आहे.


* परवानग्यांचे अभिलेख मागवले ; पण अहवालच नाही :- या पार्श्वभूमीवर कोकण विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषद प्रशासनाला, सदर गायरान जमिनीवर शाळा, अंगणवाडी, समाज मंदिर व शौचालय बांधताना शासनाची पूर्वपरवानगी घेतली होती का, याबाबत सविस्तर अभिलेख व कागदपत्रांसह अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद (अलिबाग) यांना पत्र पाठविण्यात आले. मात्र, सहा महिने उलटूनही आवश्यक अहवाल व कागदपत्रे अद्याप सादर न झाल्याचा आरोप ग्रामस्थ व अर्जदारांकडून केला जात आहे.


* फाईल पुढेच सरकत नाही - कार्यालयीन विस्कळीत कारभार ? :- या संदर्भात जिल्हा परिषद कार्यालयातील रूपाली पाटील मैडम यांना पत्रकारांनी विचारणा केली असता, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यापर्यंत हे पत्र पोहोचले नसल्यामुळे फाईल पुढे पाठवली गेली नाही, असे उत्तर देण्यात आले. त्यानंतर पत्रकारांनी प्रत्यक्ष कार्यालयात भेट दिली असता, मॅडम आज उपस्थित नाहीत, ग्रामपंचायत विभागातील अधिकाऱ्यांना भेटा, असे सांगण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांनी पुढे असे सांगितले की, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (Deputy CEO) विशाल तनपुरे यांची सही झालेली नाही. साहेब मुंबईला गेले आहेत. सही झाली की फाईल पुढे पाठवू, या प्रकारामुळे फाईल जिल्हा परिषद कार्यालयातच धूळ खात पडून आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.


* संतप्त सवाल : प्रशासनाला गांभीर्य नाही का ? :- हाळ खुर्द गावातील ग्रामस्थांनी संतप्त सवाल उपस्थित केले आहेत की, सहा महिने उलटूनही अहवाल सादर का केला जात नाही ? मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना या दोन समाजांच्या मूलभूत गरजांचे गांभीर्य नाही का ? ज्या गावात शंभर वर्षांपासून अंत्यविधीसाठी जागा नाही, ती खाजगी जमिनीत किंवा नगर परिषद हद्दीत करावी लागते, ही बाब प्रशासनासाठी लाजीरवाणी नाही का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


* आंदोलनाचा इशारा :- ग्रामस्थांचा इशारा आहे की, जर आता देखील जागा दिली गेली नाही, तर रस्त्यावर उतरून आंदोलन, उपोषण, जलसमाधी, आत्मदहनासारखे टोकाचे मार्ग अवलंबावे लागतील. तेव्हाच ही बाब जगासमोर येईल का ? 


* गायरान जमिनीवर अतिक्रमण ; पुढाऱ्यांचा डल्ला ? :- दरम्यान, कर्जत - खालापूर तालुक्यात गायरान जमिनींवर अतिक्रमण व बेकायदेशीर प्लॉटिंग झाल्याच्या बातम्या आधीच प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झाल्या आहेत. अंदाजे 99.80 हेक्टर शासकीय जमिनीवर अतिक्रमण असून, प्रति गुंठा 2 ते 5 लाख रुपये दराने विक्री व्यवहार झाल्याचा आरोप आहे. यातून गावपुढाऱ्यांनी कोट्यवधी रुपये कमावल्याचा संशय व्यक्त होत आहे.


* अखेर प्रश्न तोच :- हाळ खुर्द गावाच्या गायरान जमिनीतून दोन समाजांना कब्रस्थान व स्मशानभूमीसाठी जागा मिळणार का ? की शासकीय जमिनी विक्री व्यवहारांसाठीच राखून ठेवल्या जाणार ? हा प्रश्न आज हाळ खुर्दच्या ग्रामस्थांसह संपूर्ण खालापूर तालुक्यात चर्चेचा विषय ठरला असून प्रशासन आता काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




Thursday, January 15, 2026

खालापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल..

 


सह निवडणूक निर्णय अधिकारी अभय चव्हाण यांच्याकडून निवडणूक कार्यक्रम, आरक्षण व तारखांची सविस्तर माहिती

खालापूर / सुधीर माने :- राज्यातील 12 जिल्हा परिषदांअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक 2026 चा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर, खालापूर तालुक्यातील निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी सहनिवडणूक निर्णय अधिकारी व खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण यांच्या दालनात गुरुवार, 15 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12.30 वाजता पत्रकार परिषद संपन्न झाली.

ही पत्रकार परिषद निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन कासार यांच्या आदेशानुसार घेण्यात आली. यावेळी तहसीलदार अभय चव्हाण यांनी खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक विभागांची रचना, आरक्षण, तसेच संपूर्ण निवडणूक वेळापत्रक याबाबत पत्रकारांना सविस्तर माहिती दिली.

* खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषद गट व आरक्षण :- खालापूर तालुक्यात ४ जिल्हा परिषद गट असून

गट क्र. 15 - चौक : अनुसूचित जमात (स्त्री)

गट क्र. 16 - वासांबे : सर्वसाधारण

गट क्र. 17 - सावरोली : सर्वसाधारण

गट क्र. 18 - आतकर गाव : सर्वसाधारण (स्त्री).

* पंचायत समिती गण व आरक्षण :- खालापूर तालुक्यातील 8 पंचायत समिती गणांवर आरक्षण लागू आहे.

गण क्र. 29 - चौक : अनुसूचित जमात (स्त्री)

गण क्र. 30 - हाळ खुर्द : अनुसूचित जमात

गण क्र. 31 - वासांबे : नागरिकांचा मागास प्रवर्ग

गण क्र. 32 - रिस : सर्वसाधारण

गण क्र. 33 - शिवली : नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)

गण क्र. 34 - सावरोली : सर्वसाधारण (स्त्री)

गण क्र. 35 - खानाव : सर्वसाधारण

गण क्र. 36 - आतकर गाव : सर्वसाधारण (स्त्री)

* निवडणूक वेळापत्रक :- तहसीलदार अभय चव्हाण यांनी जाहीर केलेले निवडणूक वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. 

- नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा कालावधी : 16 जानेवारी ते 20 जानेवारी 2026

- 18 जानेवारी (रविवार) सार्वजनिक सुट्टी असल्याने

21 जानेवारी 2026 (बुधवार) सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्विकारण्यात येणार आहे.

- नामनिर्देशन पत्रांची छाननी : 22 जानेवारी 2026, सकाळी 11 वाजल्यापासून

- छाननीनंतर तात्काळ, उमेदवारांची यादी प्रसिद्ध,

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी : 23 ते 27 जानेवारी 2026 (सकाळी 11 ते दुपारी 3)

- 25 जानेवारी (रविवार) सार्वजनिक सुट्टी असल्याने त्या दिवशी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया होणार नाही

- 27 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3.30 नंतर अंतिम उमेदवारांची यादी व निशाणी वाटप

* मतदान व मतमोजणी :- गुरुवार, 5 फेब्रुवारी 2026, सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान.

शनिवार, 7 फेब्रुवारी 2026, सकाळी 10 वाजेनंतर मतमोजणी.

* आदर्श आचारसंहितेचे पालन बंधनकारक :- या पत्रकार परिषदेत तहसीलदार अभय चव्हाण यांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याचे स्पष्ट केले. निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व उमेदवार, राजकीय पक्ष व नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.





अखेर खोपोलीत ‘साबळे पॅटर्न’

 


 विक्रम साबळे उपनगराध्यक्ष ; दिनेश थोरवे, डॉं. सुनील गोटीराम पाटील व अश्विनीताई अत्रे स्वीकृत नगरसेवक

खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी विक्रम यशवंत साबळे यांची निवड झाल्याने शहराच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात पुन्हा एकदा अनेक वर्षानंतर ‘साबळे पॅटर्न’ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सुप्रसिद्ध युवा उद्योजक, विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात प्रभावी ठसा उमटविणारे विक्रम साबळे यांच्या निवडीमुळे विशेषतः युवक वर्गांत नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. दूरदृष्टी, कार्यक्षमता आणि सामाजिक बांधिलकी यांचा समतोल साधणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असून, नगर परिषदेच्या कारभारात सकारात्मक ऊर्जा संचारेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


याचवेळी खोपोली नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी शहरातील सुप्रसिद्ध व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते दिनेश थोरवे (सुरभी ज्वेलर्सचे संचालक), सामाजिक जाणिवा जपणारे माजी नगराध्यक्ष डॉं. सुनील गोटीराम पाटील तसेच लोकोपयोगी कार्यात सातत्याने अग्रभागी असणाऱ्या अश्विनीताई अत्रे यांची निवड झाल्याने नगर परिषदेच्या कामकाजात अनुभवी, अभ्यासू व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्वांचा प्रभावी सहभाग वाढला आहे.


* अनुभव, अभ्यास आणि समाजाभिमुखतेचा संगम :- विक्रम साबळे, दिनेश थोरवे, डॉं. सुनील पाटील व अश्विनीताई अत्रे ही सर्व मान्यवर व्यक्तिमत्त्वे गेल्या अनेक वर्षांपासून खोपोली शहरात सामाजिक, धार्मिक व विकासात्मक उपक्रमांत सक्रिय आहेत. गरजू नागरिकांना मदतीचा हात, विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन, तसेच शहराच्या विकासाशी संबंधित प्रश्नांवर ठाम व सातत्यपूर्ण भूमिका ही त्यांची ओळख आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेतच विक्रम साबळे यांची उपनगराध्यक्षपदी, तर उर्वरित तिघांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाल्याचे बोलले जात आहे.


* नागरिक व संघटनांकडून अभिनंदनाचा वर्षाव :- या निवडीबद्दल नागरिक, व्यापारी वर्ग, युवक कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांकडून उपनगराध्यक्ष विक्रम साबळे व तिन्ही स्वीकृत नगरसेवकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सर्वांच्या अनुभवाचा व सामाजिक जाणिवेचा खोपोलीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी पत्रकार बांधव व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


निवडीनंतर प्रतिक्रिया देताना विक्रम साबळे म्हणाले की, खोपोली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच पारदर्शक व लोकाभिमुख कारभारासाठी मी प्रामाणिकपणे काम करत राहीन. तसेच, सर्वच राजकीय पक्षांची समंजस भूमिका आणि खोपोलीकरांचे प्रेम यामुळेच हा विश्वास शक्य झाला. सर्वांचे मनःपूर्वक आभार, असे भावनिक उद्गार यशवंत लक्ष्मणशेठ साबळे यांनी व्यक्त केले.


विक्रम साबळे यांच्यासह दिनेश थोरवे, डॉं. सुनील पाटील व अश्विनीताई अत्रे यांच्या निवडीमुळे खोपोली नगर परिषदेच्या कामकाजाला नवी दिशा मिळून शहराच्या विकासाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.



Wednesday, January 14, 2026

शिवसेनेचे दिनेश थोरवे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉं. सुनील गोटीराम पाटील व भाजपच्या अश्विनीताई अत्रे यांचा समावेश

 



खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी शहरातील सुप्रसिद्ध व्यवसायिक व सामाजिक कार्यकर्ते, सुरभी ज्वेलर्सचे संचालक दिनेश थोरवे यांची निवड करण्यात आली आहे. याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉं. सुनील गोटीराम पाटील आणि भारतीय जनता पक्षाकडून अश्विनीताई अत्रे यांचीही स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाल्याने नगर परिषदेच्या कामकाजात अनुभवी व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सहभाग वाढला आहे.


दिनेश थोरवे हे गेल्या अनेक वर्षांपासून खोपोली शहरात सामाजिक, धार्मिक व विकासात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत. गरजू नागरिकांना मदतीचा हात, विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन तसेच शहराच्या विकासाशी संबंधित प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे नेतृत्वशील व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेतच त्यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाल्याचे बोलले जात आहे.


* नागरिक व संघटनांकडून अभिनंदन :- या निवडीबद्दल नागरिक, व्यापारी वर्ग, युवक कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांकडून दिनेश थोरवे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच डॉं. सुनील गोटीराम पाटील आणि अश्विनीताई अत्रे यांच्या निवडीचेही सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत असून, तिन्ही स्वीकृत नगरसेवकांच्या अनुभवाचा व सामाजिक जाणिवेचा उपयोग शहराच्या सर्वांगीण विकासासाठी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


* पत्रकार संघटनांकडून सत्कार :- निवडीच्या पार्श्वभूमीवर न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन व व्हॉईस ऑफ मीडिया, खालापूर तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने दिनेश थोरवे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पत्रकार बांधव व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच डॉं. सुनील पाटील आणि अश्विनीताई अत्रे यांचेही अभिनंदन करण्यात आले. 


आपल्या निवडीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना दिनेश थोरवे म्हणाले की, खोपोली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि पारदर्शक व लोकाभिमुख कारभारासाठी मी नेहमीप्रमाणे प्रामाणिकपणे काम करत राहीन.


दिनेश थोरवे यांच्यासह डॉ. सुनील गोटीराम पाटील व अश्विनीताई अत्रे यांच्या निवडीमुळे खोपोली नगर परिषदेच्या कामकाजाला नवी दिशा मिळेल आणि शहराच्या विकासाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.