गुंडगे येथे महिलांसाठी उद्योग मार्गदर्शन शिबीर उत्साहात संपन्न...
आधार जनसेवा सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम उद्योजकतेकडे महिलांचा वाढता कल; मोठी उपस्थिती
नरेश जाधव / कर्जत :- आधार जनसेवा सामाजिक संस्थेच्या वतीने महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने कर्जत शहरातील गुंडगे येथील बुद्ध विहार हॉल (समाज मंदिर) येथे रविवार, दि. ५ एप्रिल २०२६ रोजी महिलांसाठी मोफत उद्योजक कौशल्य विकास व उद्योग मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिराला गुंडगे परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शिबिरामध्ये शासकीय योजनांअंतर्गत उपलब्ध विविध उद्योग, त्यासाठी मिळणारे अनुदान, उद्योग उभारताना येणाऱ्या अडचणी तसेच प्रभावी मार्केटिंग आणि नेटवर्किंग कसे करावे याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
यासोबतच महिलांच्या कौशल्य विकासाचे महत्त्व अधोरेखित करत शिवणकाम, अन्नप्रक्रिया उद्योग, घरगुती व्यवसाय, ऑनलाईन विक्री, डिजिटल पेमेंट्स, स्वयंसहाय्यता गट (Self Help Group) यांसारख्या क्षेत्रांमध्ये उपलब्ध संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महिलांनी लघुउद्योगाच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन मिळवावे, स्वतःचा व्यवसाय उभा करून कुटुंबाच्या उत्पन्नात हातभार लावावा, यासाठी प्रेरणा देण्यात आली.
या शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून रायगड कृषी उद्योग विभागाचे जिल्हास्तरीय प्रशिक्षक दयानंद चतुर तसेच नवी मुंबई येथील संवेदना सामाजिक फाउंडेशनच्या मोहिनी बागडे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. त्यांनी महिलांना स्वावलंबी बनण्यासाठी विविध उद्योग संधींची माहिती देत प्रत्यक्ष व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहित केले.
कार्यक्रमाचे आयोजन आधार जनसेवा सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. संस्थेच्या रायगड जिल्हा महिला अध्यक्षा मीनाक्षी भवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. संस्थापक अध्यक्ष गणेश कांबळे व कार्याध्यक्ष राजेंद्र जंगम यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सतीश बर्गे, तालुका सचिव तुषार कांबळे, खजिनदार संगीता कांबळे, उपाध्यक्ष संदीप पावसकर, कांता काळे, प्रणाली मोरे, अशोक कांबळे, महेंद्र बनसोडे, प्रसाद कांबळे, रश्मी कांबळे, दीपाली रोकडे, यशोदा भालेराव, सारिका माने, संतोष भवार, सुरज यादव, सामाजिक कार्यकर्ते उमेश गायकवाड आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, नगरसेविका हर्षाली गायकवाड यांच्या वतीने अल्पोहाराचे आयोजन करण्यात आले.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी अशा प्रकारचे कौशल्य विकास उपक्रम अत्यंत महत्त्वाचे ठरत असून भविष्यातही अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Comments
Post a Comment